Marathi / English

अध्याय २५

॥ श्री एकनाथी भागवत ॥

अध्याय पंचविसावा

श्रीगणेशाय नमः ॥ श्रीकृष्णाय नमः ॥ ॐ नमो देव निर्गुण । म्हणों पाहें तंव न देखें गुण । गुणेंवीण निर्गुणपण । सर्वथा जाण घडेना ॥ १ ॥ सर्वथा न घडे निर्गुणपण । तरी घडों नेदिशी सगुणपण । नातळशी गुणागुण । अगुणाचा पूर्ण गुरुराया ॥ २ ॥ अगुणाच्या विपरीत तूं गुनी । करिसी त्रिगुणगुणां झाडणी । पंचभूतांपासूनी । सोडवितां जनीं जनार्दनू ॥ ३ ॥ ज्याचेनि जनांसी अर्दन । ज्याचेनि लिंगदेहा मर्दन । जो जीवासी जीवें मारी पूर्ण । तो कृपाळु जनार्दन घडे केवीं ॥ ४ ॥ जनार्दनाचें कृपाळूपण । सर्वथा नेणती जन । नेणावया हेंचि कारण । जे देहाभिमान न सांडिती ॥ ५ ॥ जननीजठरीं जन्म जाण । त्या जन्मास्तव म्हणती जन । त्या जनजन्मा करी मर्दन । यालागीं जनार्दन नाम त्यासी ॥ ६ ॥ मरण मारूनि वाढवी जिणें । जीव मारूनि जीवपणें । देहीं नांदवी विदेहपणें । ऐशी जनार्दनें कृपा कीजे ॥ ७ ॥ निजभावार्थें परिपूर्ण । एकाकी देखूनियां दीन । कृपा करी जनार्दन । कृपाळु पूर्ण दीनांचा ॥ ८ ॥ जे जे भावना भावी जन । ते ते पुरवी जनार्दन । जो मागे परम समाधान । त्याचा देहाभिमान निर्दळी ॥ ९ ॥ हो कां जनार्दनासमोर । कैं आला होता अहंकार । मा तेणें घे‌ऊनियां शस्त्र । करी शतचूर निजांगें ॥ १० ॥ जेवीं सूर्याचेनि उजियेडें । अंधारेंसी रात्री उडे । तेवीं जनार्दननामापुढें । अहंकार बापुडें उरे केवी ॥ ११ ॥ ऐकतां गुरुनामाचा गजरू । समूळ विरे अहंकारू । येथ दुःखदायक संसारू । कैसेनि धीरू धरील ॥ १२ ॥ ज्याचें नाम स्मरतां आवडीं । संसारबांदवडी फोडी । जीवाचे जीवबंध सोडी । नामाची गोडी लाजवी मोक्षा ॥ १३ ॥ निजमोक्षाही-वरतें । ज्याचें नाम करी सरतें । त्याच्या कृपाळूपणातें । केवीं म्यां येथें सांगावे ॥ १४ ॥ नामप्रतापा न करवे सीमा । त्या सद्गुरूचा निजमहिमा । कैशापरी आकळे आम्हां । काय निरुपमा उपमावें ॥ १५ ॥ अगाध कीर्ति गुरूची गहन । गुण गणितां अनंतगुण । काय घ्यावें त्याचें आपण । नित्य निर्गुण निजांगें ॥ १६ ॥ धाव घे‌ऊनि त्यापें जावों । तंव त्या नाहीं गांवठावो । त्याचे प्राप्तीसी न चले उपावो । एक सद्भावोवांचूनी ॥ १७ ॥ सद्भावें स्मरतां नामासी । गुरु प्रकटे स्मरणापाशीं । जेवीं सागरू सैंधवासी । ये भेटीसी निजांगें ॥ १८ ॥ सागरा देतां आलिंगन । जेवीं सैंधव होय जीवन । तेवीं वंदितां सद्गुरुचरण । मीतूंपण हारपे ॥ १९ ॥ सद्गुरुकृपा झालिया पूर्ण । जनचि होय जनार्दन । तेव्हां जन वन विजन । भिन्नभिन्न भासेना ॥ २० ॥ जन तेंचि जनार्दन । जनार्दनचि सकळ जन । हेंचि उपनिषत्सार पूर्ण । हे निजखूण जनार्दनीं ॥ २१ ॥ येणेंचि अभिन्नार्थें येथ । सांख्य बोलिला भगवंत । उत्पत्ति-स्थिति-प्रळयांत । वस्तु सदोदित संपूर्ण ॥ २२ ॥ सांख्या ऐकोनियां उद्धवो । विचरी आपुला अभिप्रावो । संसार वाढवी जो अहंभावो । तो अवश्य पहा हो सांडावा ॥ २३ ॥ अहंकार जडला चित्ता । तो सांडितां न वचे सर्वथा । हें पुसों जरी श्रीकृष्णनाथा । तेणें सांख्य या अर्था निरूपिलें ॥ २४ ॥ सकळ प्राप्तीचा अभिप्रावो । सांख्य अनुवादला देवो । अवश्य सांडावा अहंभावो । हेंचि पहा हो दृढ केलें ॥ २५ ॥ माझेनि पराक्रमें तत्त्वतां । माझें मीपण न वचे सर्वथा । लाजिरवाणें कृष्णनाथा । किती आतां पुसावें ॥ २६ ॥ ऐशी उद्धवाची चिंता । कळूं सरली श्रीकृष्णनाथा । बाप कृपाळु निजभक्तां । जेणें निवारे अहंता तें निजवर्म सांगे ॥ २७ ॥ आजि उद्धवाचें भाग्य पूर्ण । जगीं उद्धवचि धन्य धन्य । ज्यासी संतुष्टला श्रीकृष्ण । न करितां प्रश्न निजगुह्य सांगे ॥ २८ ॥ बाळक काय भूक सांगे । मग माता स्तन दे‌ऊं लागे । ते कळवळ्याचे पांगें धांवोनि निजांगें स्तनपाना लावी ॥ २९ ॥ त्याहूनि अति‌आगळा । कृष्णीं उद्धवकळवळा । तो स्वभक्तांची भजनकळा । जाणोनि जिव्हाळा पोखित ॥ ३० ॥ बाळक नेणे आपुली चिंता । परी माता प्रवर्ते त्याच्या हिता । तेवीं उद्धवाचे निजस्वार्था । श्रीकृष्णनाथा कळवळा ॥ ३१ ॥ त्या उद्धवाचें जें जें न्यून । तें तें करावया परिपूर्ण । प्रवर्तलासे श्रीकृष्ण । तो निजनिर्गुण उपदेशी ॥ ३२ ॥ पंचविसावे अध्यायीं जाण । सांगोनि गुणजयोलक्षण । लक्षवील निजनिर्गुण । हेंचि निरूपण निजनिष्ठा ॥ ३३ ॥ प्रकृति-पुरुषविवेक । झालियाही बुद्धिपूर्वक । जंव गुणजयो नाहीं निष्टंक । तंव वाढे सुखदुःख अहंभावो ॥ ३४ ॥ तिहीं गुणांस्तव देह झाला । देही गुणजयो न वचे केला । मूल‍उच्छेदू आपुला । न करवे वहिला कोणासी ॥ ३५ ॥ दांडा जन्मला वृक्षजातीसीं । तो मिळोनियां कुऱ्हाडीसीं । समूळ छेदवी वृक्षासी । तेवीं विवेकासीं सत्त्वगुण ॥ ३६ ॥ विवेका मीनल्या सत्त्वगुण । समूळ उच्छेदी तिनी गुण । सहजें प्रकटे निजनिर्गुण । तेव्हां गुणच्छेदन तें मिथ्या ॥ ३७ ॥ समूळ मिथ्या तिनी गुण । नित्य सत्य निजनिर्गुण । येचि अर्थींचें निरूपण । स्वमुखें श्रीकृष्ण सांगत ॥ ३८ ॥ श्रीभगवानुवाच-गुणानामसमिश्राणां पुमान्येन यथा भवेत्‌ । तन्मे पुरुषवर्येदमुपधारयः शंसतः ॥ १ ॥ ज्याचेनि चरणें पवित्र क्षिती । नामें उद्धरे त्रिजगती । ज्याची ऐकतां गुणकीर्ती । क्षयो पावती महपापें ॥ ३९ ॥ ज्याचें मृदु मधुर अविट नाम । उच्चरितां निववी परम । तो उद्धवासी पुरुषोत्तम । आवडीं परम बोलत ॥ ४० ॥ सत्त्व रज तम तिनी गुण । न मिसळतां भिन्नभिन्न । पुरुषापासीं एकैक गुण । उपजवी चिन्ह तें ऐका ॥ ४१ ॥ निःसंदेह सावधान । निर्विकल्प करूनि मन । ऐकतां माझें वचन । पुरुषोत्तम पूर्ण हो‌इजे स्वयें ॥ ४२ ॥ माझे स्वरूपीं सद्भावता । ते पुरुषाची उत्तमावस्था । माझे वचनीं विश्वासतां । पुरुषोत्तमता घर रिघे ॥ ४३ ॥ ऐशी उत्तमा अति‌उत्तम । निर्गुण पदवी निरुपम । तुज मी अर्पितसें पुरुषोत्तम । माझें वचन परम विश्वासल्या ॥ ४४ ॥ भक्तिभावार्थें परम श्रेष्ठ । वचनविश्वासीं अतिवरिष्ठ । यालागीं उद्धवासी पुरुषश्रेष्ठ । स्वमुखें वैकुंठ संबोधी ॥ ४५ ॥ संसारीं योनि अनेग । त्यामाजीं मनुष्यत्व अतिचांग । तेंहि अविकळ अव्यंग । संपूर्ण सांग निर्दुष्ट ॥ ४६ ॥ सकळ देहांमाजीं जाण । असे पुरुषदेहप्राधान्य । त्याहीमाजीं विवेकसंपन्न । वेदशास्त्रज्ञ मुमुक्षू ॥ ४७ ॥ वेदशास्त्रविवेकसंपन्न । त्याहीमाजीं ज्या माझें भजन । भजत्यांमाजीं अनन्य शरण । सर्वस्वें जाण मजलागीं ॥ ४८ ॥ सर्वस्वें जे अनन्य शरण । तेथ माझी कृपा परिपूर्ण । माझें कृपें माझें ज्ञान । पावोनि संपन्न मद्भजनीं ॥ ४९ ॥ येंहीं गुणीं विचारितां लोक । आथिला दिसे उद्धव एक । त्यालागीं यदुनायक । पुरुषवर्याभिषेक वचनें करी ॥ ५० ॥ ऐसें संबोधूनि उद्धवासी । त्रिगुणगुणस्वभावांसी । सांगतां प्रथम सत्त्वासी । हृषीकेशी उपपादी ॥ ५१ ॥ उदंड सत्त्वाचीं लक्षणें । त्यांत पंधरा बोलिलीं श्रीकृष्णें । तेंचि ऐका कोणकोणें । निजनिरूपणें हरि सांगे ॥ ५२ ॥ शमो दमस्तितिक्षेक्षा तपः सत्यं दया स्मृतिः । तुष्टिस्त्यागोऽस्पृहा श्रद्धा हीर्दयादिः स्वनिर्वृतिः ॥ २ ॥ आपुली जे चित्तवृत्ती । सांडूनि बाह्यस्फूर्ती । अखंड राखणें आत्मस्थिती । शम निश्चितीं या नांव ॥ ५३ ॥ बाह्य इंद्रियांची चडफड । शमेंसीं करावा गलजोड । निग्रहणें विषयचाड । दमाचें कोड या नांव ॥ ५४ ॥ जेणें हरिखें साहणें सुख । त्याचि वृत्तीं साहणें दुःख । तितिक्षा या नांव देख । शुद्धसत्त्वात्मक उद्धवा ॥ ५५ ॥ मी कोण कैंचा किमात्मक । निष्कर्म कीं कर्मबद्धक । करणें निजात्मविवेक । ईक्षापरिपाक या नांव ॥ ५६ ॥ जागृतिस्वप्रसुषुप्ती‌आंत । भगवत्प्राप्तीलागीं चित्त । झुरणीमाजीं पडे नित्य । तप निश्चित या नांव ॥ ५७ ॥ आवडीं जेवीं नेघवे विख । तेवी प्राणांतें न बोले लटिक । साचचि बोलणें निष्टंक । हें सत्य देख सात्त्विका ॥ ५८ ॥ भूतांवरी कठिणपण । जो स्वप्नीं न देखे आपण । भूतदया ते संपूर्ण । उद्धवा जाण निश्चित ॥ ५९ ॥ माझा मुख्य निजस्वार्थ कोण । मी काय करितों कर्माचरण । ऐसें जें पूर्वानुस्मरण । स्मृति जाण या नांव ॥ ६० ॥ न करितां अति‌आटाटी । यथालाभें सुखी पोटीं । या नांव गा निजसंतुष्टी । जाण जगजेठी उद्धवा ॥ ६१ ॥ जे मिळाले जीविकाभाग । त्यांतही सत्पात्रीं दानयोग । विषयममता सांडणें सांग । त्या नांव त्याग उद्धवा ॥ ६२ ॥ अर्थस्वार्थीं इच्छा चढे । अर्थ जोडतां अधिक वाढे । ते इच्छा सांडणे निजनिवाडें । निस्पृहता घडे ते ठायीं ॥ ६३ ॥ जेथ निस्पृहता समूळ सांग । त्याचि नांव दृढ वैराग्य । हें परमार्थाचें निजभाग्य । येणें श्रीरंग सांपडे ॥ ६४ ॥ जो गुरुवाक्यविश्वासी । सबाह्य विकला सर्वस्वेंसीं तोचि भावार्थ द्विजदेवांसी । श्रद्धा त्यापाशीं समूळ नांदे ॥ ६५ ॥ नरदेहीं लाभे परब्रह्म । तदर्थ न करूनि सत्कर्म । विषयार्थ करी धर्माधर्म । ते लज्जा परम अतिनिंद्य ॥ ६६ ॥ जेणें दुःखी हो‌ईजे आपणें । तें पुढिलासी नाहीं करणें । दुःख नेदूनि सुख देणें । दे दया म्यां श्रीकृष्णें वंदिजे ॥ ६७ ॥ पुढिलासी नेदूनि दुःख । स्वयें भूतमात्रीं देणें सुख । हेचि दया पारमार्थिक । दुसरेनि देख यालागीं सांगे ॥ ६८ ॥ खातां नाबदेपुढें पेंड जैसी । तैसें गौण देखोनि विषयांसी । जो विनटला ब्रह्मसुखासी । स्वनिवृत्ति त्यासी बोलिजे ॥ ६९ । रंक बैसल्या पालखीसी । उपेक्षी पूर्वील सुडक्यासी । तेवीं उपेक्षूनि विषयांसी । जो ब्रह्मसुखासी पकडला ॥ ७० ॥ कणाची वाढी भुसापाशीं । कण निडारे भुसेंसीं । तो कण यावया हातासी । सांडिती भुसासी पाखडूनी ॥ ७१ ॥ तेवीं ब्रह्मसुखाचिये पाडें । नरदेहाचा पांगडा पडे । तें ब्रह्मसुख जैं हाता चढे । तैं देहींचें नावडे विषयभूस ॥ ७२ ॥ तेवीं सांडूनि विषयप्रीती । ज्यासी ब्रह्मसुखीं सुखप्राप्ती । याचि नांव स्वनिवृत्ती । जाण निश्चितीं उद्धवा ॥ ७३ ॥ या पंधरा लक्षणांची स्थिती । वर्ते तो शुद्ध सत्त्वमूर्ती । शोधितसत्त्वाची सत्त्ववृत्ती । ‘आदि’ शब्दें श्रीपती सांगत ॥ ७४ ॥ सर्व भूतीं अकृत्रिमता । देखे भगवद्भावें तत्त्वतां । या नांव शोधितसत्त्वता । गुणावस्थाछेदक ॥ ७५ ॥ ऐशियापरी सत्त्वगुण । सत्त्विकापासीं वर्ते पूर्ण । आतां रजाचें लक्षण । स्वयें श्रीकृष्ण सांगत ॥ ७६ ॥ काम ईहा मदस्तृष्णा स्तम्भ आशीर्भिदा सुखम्‌ । मदोत्साहो यशः प्रीतिर्हास्यं वीर्यं बलोद्यमः ॥ ३ ॥ काम म्हणीजे विषयसोसू । जेवीं इंधनीं वाढे हुताशू । तेवीं पुरवितां कामाभिलाषू । कामासोसू पैं वाढे ॥ ७७ ॥ या नांव काम जाण । कामक्रिया ते ईहा पूर्ण । झाले विद्योचा दर्प गहन । मदाचें लक्षण या नांव ॥ ७८ ॥ झालिया अर्थप्राप्ती । वासनेसी नव्हे तृप्ती । चढतीवाढती आसक्ती । तृष्णा निश्चितीं या नांव ॥ ७९ ॥ अतिगर्वें जे स्तब्धता । कोणा दृष्टीं नाणी सर्वथा । या नांव स्तंभावस्था । जाण तत्त्वतां उद्धवा ॥ ८० ॥ अर्थप्राप्तीकारणें । इष्टदेवता प्रार्थणें । प्रापंचिक सुख मागणें । आशा म्हणणें य नांव ॥ ८१ ॥ भिदा म्हणिजे भेद जाण । स्फुरद्रूप प्रपंचभान । माझें तुझें प्रपंचवचन । भिदालक्षण या नांव ॥ ८२ ॥ राजसमुखाच नवलभाग । विषयसुखभोग जो साङ्ग । तेंचि सुख मानिंती चांग । सुखप्रयोग या नांव ॥ ८३ ॥ रणीं उत्साह शूरासी । कां पुत्रोत्साह नरासी । विवाहोत्साह सुहृदांसी । महोत्साह त्यासी बोलिजे ॥ ८४ ॥ शास्त्रविवादीं जयो घेणें । कां युद्धीं शूर पराभवणें । तेणें ख्याति वाढविणें । यश मिरवणें या नांव ॥ ८५ ॥ बंदिजनांहातीं कीर्ती । स्वयें वाखाणवी दिगंतीं । या नांव यशःप्रीती । जाण निश्चितीं उद्धवा ॥ ८६ ॥ ऐकोनि वचनोक्ति छंदोबद्ध । उपहासीं अतिविनोद । तेथ राजसा हास्य विशद । जाण प्रसिद्ध उद्धवा ॥ ८७ ॥ वीर्य म्हणीजे केवळ । बळाढ्यता अतिप्रबळ । दाखवणें शारीरबळ । या नांव शीळ वीर्याचें ॥ ८८ ॥ राजबळें उद्यमव्यवहार । आंगदटा जो व्यापार । न्याय सांडूनि स्वार्थ फार । बलोद्यमप्रकार या नांव ॥ ८९ ॥ हीं पंधराही लक्षणें । ज्यापें नांदती संपूर्णें । तो राजस वोळखणें जीवेंप्राणें निश्चित ॥ ९० ॥ केवळ अविवेकसंपत्ती । तामसाची तमोवृत्ती । सोळा लक्षणें त्याची स्थिती । ऐक तुजप्रती सांगेन ॥ ९१ ॥ क्रोधो लोभोऽनृतं हिंसा याञ्चा दम्भः क्लमः कलिः । शोकमोहौ विषादार्ती । निद्राऽऽशाभीरनुद्यमः ॥ ४ ॥ क्रोध कामाची पूर्णावस्था । लोभ म्हणीजे अतिकृपणता । अनृत म्हणिजे असत्यता । हिंसा ते तत्त्वतां परपीडा ॥ ९२ ॥ याञ्चा म्हणीजे लोलंगता । दंभ म्हणिजे अतिमान्यता । क्लमनामें अति‌आयासता । व्यर्थ कलहता कलि जाण ॥ ९३ ॥ शोक म्हणिजे हाहाकारू । मोह म्हणिजे भ्रमाचा पूरू । विषाद म्हणीजे दुःखसंचारू । अभ्यंतरू जेणें पोळे ॥ ९४ ॥ अर्ति म्हणिजे अतिसंताप । निंदा म्हणिजे असदारोप । आशा म्हणिजे अतिलोलुप्य । महाभयकंप भीशब्दीं ॥ ९५ ॥ ऐक निद्रेचें निजवर्म । जें आळसाचें निजधाम । जाड्यता सोलींव परम । ते निद्रा निःसीम तामसी ॥ ९६ ॥ सांडूनियां सर्व कर्म । स्तब्धता राहे परम । या नांव अनुद्यम । सुखावलें तम ठायीं वसे ॥ ९७ ॥ या तमोगुणाच्या सोळा कळा । ज्याचे अंगीं बाणती सकळा । तो तमोरात्रींची चंद्रकळा । अविवेक आंधळा तामसू ॥ ९८ ॥ सत्त्वरजतमोगुण । यांचे ओळखीलागीं जाण । केलें भिन्नभिन्न निरूपण । अतां मिश्रलक्षण तें ऐक ॥ ९९ ॥ सत्त्वस्य रजसश्चैतास्तमसश्चानुपूर्वशः । वृत्तयो वर्णितप्रायाः सन्निपातमथो श्रृणु ॥ ५ ॥ सांगीतली त्रिगुणस्थिती । त्या एक‌एकाच्या अनंत वृत्ती । त्याही अनंतप्राय होती । जीवासी गुणगुंती येथेंचि पडे ॥ १०० ॥ मस्तकीं केश चिकटले होती । ते ज्याचे त्या नुगवती । तेवीं त्रिगुणांची गुणगुंती । जीवाहातीं उगवेना ॥ १ ॥ मिळोनि सख्या मायबहिणी । हातीं घे‌ऊनि तेल फणी । उगविती चिकटल्या केशश्रेणी । तेवीं त्रिगुणांची वेणी जीवासी ॥ २ ॥ त्रिगुणांची विभागवृत्ती । जीवसामर्थ्यें जरी होती । तरी शुद्धसत्त्वी करूनि वस्ती । गुणातीतीं प्रवेशाता ॥ ३ ॥ ऐसा निजगुणांचा उगवो । जीवाचेनि नोहे निर्वाहो । यालागीं गुरुचरणीं सद्भावो । सभाग्य पहा वो राखिती ॥ ४ ॥ जे सभाग्य भाग्यवंत जनीं । ज्यांसी सद्गुरु सखी जननी । विवेक-वैराग्य घे‌ऊनि फणी । जो त्रिगुणांची वेणी उगवितू ॥ ५ ॥ ज्यांची उगविली गुणगुंती । पुढती गुंती पडे मागुती । यालागीं ते महामती । मुंडूनि सांडिती संन्यासीं ॥ ६ ॥ एकाची नवलगती । उद्धट वैराग्याची स्थिती । गुंती उगवाया न रिघते । मुळींचि मुंडिती समूळ ॥ ७ ॥ विवेकफणीचेनि मेळें । ओढितां वैराग्य बळें । जो अशक्त भावबळें । तो मध्येंचि पळे उठूनी ॥ ८ ॥ अशक्तें पळतां देखोनि दूरी । एकें पळालीं मोह‍अंधारीं । एकें गुंती राखोनि शिरीं । गुंतीमाझारी रिघालीं ॥ ९ ॥ एकें अत्यंत करंटीं । नव्हेचि गुरुमा‌उलीसी भेटी । ऐशीं संसारीं पोरें पोरटीं । गुणदुःखकोटी भोगिती ॥ ११० ॥ द्विपरार्धायु विधाता । त्याचेनि नोहे गुणभागता । मग इतरांची कोण कथा । गुण तत्त्वतां निवडावया ॥ ११ ॥ ऐशिया ज्या त्रिगुणवृत्ती । मजही निःशेष न निवडती । यालागीं ध्वनितप्राय पदोक्ती । देव श्लोकार्थीं बोलिला ॥ १२ ॥ मागिल्या तीं श्लोकार्थीं । सांगीतल्या त्रिगुणस्थिती । त्रिगुणांची मिश्रित गती । सन्निपातवृत्ती ते ऐका ॥ १३ ॥ सन्निपातस्त्वहमिति ममेत्युद्धव या मतिः । व्यवहार संनिपातो मनोमात्रेन्द्रियासुभिः ॥ ६ ॥ गुणसन्निपातप्रकारू । एकचि जो कां अहंकारू । तो गुणसंगे त्रिप्रकारू । ऐक विचारू तयाचा ॥ १४ ॥ वर्णाश्रमविहित विलास । वेदाज्ञा पाळणें अवश्य । मी आत्मा जाण चिदंश । हा अहंविलास सात्त्विक ॥ १५ ॥ मी स्वधर्मकर्मकर्ता । मी स्वर्गादि सुखभोक्ता । मज पावती नानावस्था । या नांव अहंता राजस ॥ १६ ॥ मी देहदारी सुभट नर । मीचि कर्ता शत्रुसंहार । मी सर्वार्थी अतिदुर्धर । हा अहंकार तामस ॥ १७ ॥ गुणानुसारें ममता जाण । त्रिविधरूपें स्फुरण । तेचि अर्थींचें निरूपण । विशद श्रीकृष्ण सांगत ॥ १८ ॥ माझे हृदयींचा भगवंत । तोचि सर्व भूतीं हृदयस्थ । भूतें माझींच समस्त । हे ममता शोधित सत्त्वाची ॥ १९ ॥ भक्त संत साधु सज्जन । तेचि माझे सुहज्जन । ऐशी जे ममता पूर्ण । उद्धवा जाण सत्त्वस्थ ॥ १२० ॥ जीवाहून परती । सद्गुरुचरणीं अतिप्रीती । ऐशी ममतेची जे जाती । ते जाण निश्चितीं सात्त्विक ॥ २१ ॥ ज्या देवाची उपासकता । शैवी वैष्णवी दीक्षितता । देवीं धर्मीं पूर्ण ममता । ते जाण सात्त्विकता सत्त्वस्थ ॥ २२ ॥ शैवी वैष्णवी शर्मममता । दंभरहित निष्कामता । ते ते सात्त्विकी ममता । ऐक अवस्था राजसाची ॥ २३ ॥ निवृत्तिमार्ग मानी लटिक । सत्य साचार लौकिक । लौकैषणेची ममता देख । ते आवश्यक राजसी ॥ २४ ॥ प्रवृत्तिशास्त्रीं आवडी । लौकिकाची अतिगोडी । नामरूपांची उभवी गुढी । हे ममता रोकडी राजस ॥ २५ ॥ स्त्रीपुत्रें माझीं आवश्यक । शरीरसंबंधी आप्त लोक । द्रव्याची ममता निष्टंक । हे बुद्धि वोळख राजस ॥ २६ ॥ ज्या देवाची करितां भक्ती । नाम रूप जोडे संपत्ती । तीं तीं दैवतें आवडती । हे ममता निश्चितीं राजस ॥ २७ ॥ काम्य कर्मीं आवडी देख । आप्त मानी सकामकर्मक । सत्य स्वर्गादि विषयसुख । हे ममता निष्टंक राजस ॥ २८ ॥ हे रजोगुणाची ममता । तुज म्यां सांगीतली तत्त्वतां । तमोगुणाची जे अवस्था । ऐक व्यवस्था सांगेन ॥ २९ ॥ आपुल्या देहासी जो हूंतूं करी । कां पूर्वपूर्वजांचा वैरी । त्यांच्या लेंकरांसीं वैर धरी । हे बुद्धि निष्ठुरी तामस ॥ १३० ॥ पुढे लेंकुरांचे लेंकुरीं । वृत्तिभूमि जीविकेवरी । आडवा ये‍ईल स्वगोत्री । त्यासी वैर धरी तामस ॥ ३१ ॥ ऐसे पूर्वापर माझे वैरी । मी निर्दळीन संसारी । यालागीं रिघे अभिचारीं । ते ममता खरी तामस ॥ ३२ ॥ अभिचारिकी जे मंत्रज्ञ । ते मानी माझे आप्त स्वजन । शाकिनीडाकिनी‌उपासन । हे ममता संपूर्ण तामसी ॥ ३३ ॥ असो बहुसाल व्युत्पत्ती । एकेक गुणीं अनंत शक्ती । हे तिन्ही जेथ मिश्र होती । सन्निपातवृत्ती या नांव ॥ ३४ ॥ कफ वात आणि पित्त । तिन्ही एकत्र जेथ होत । तेथ उपजे सन्निपात । तेवीं सन्निपात येथ त्रिगुणांचा ॥ ३५ ॥ संकल्पविकल्पात्मक मन । पंच विषय पंच प्राण । दशेंद्रियीं व्यवहार संपूर्ण । तेथ उपजे त्रिगुणसन्निपात ॥ ३६ ॥ तेंचि सन्निपातनिरूपण । त्रिगुणांचे मिश्रलक्षण । स्वयें सांगताहे श्रीकृष्ण । मिश्रगुणसन्निपातू ॥ ३७ ॥ धर्मे चार्थे च कामे च यदासौ परिनिष्ठितः । गुणानां सन्निकर्षोऽयं श्रद्धारतिधनावहः ॥ ७ ॥ पुरुषाच्या ठायीं क्रियाकर्म । क्षणें स्वधर्म क्षणें काम । क्षणें वाढतीं अर्थोद्यम । हा संक्रम त्रिगुणांचा ॥ ३८ ॥ गुणसंक्रमण करी काय । त्रिगुणीं धर्म त्रिविध होय । कामही त्रिविध हो‍ऊनि ठाय । अर्थस्वार्थनिर्वाह त्रिगुणात्मकः ॥ ३९ ॥ येथ कर्मासी दोष नाहीं । दोष कर्त्याचे बुद्धीच्या ठायीं । तो जे कल्पना करील कांहीं । तें फळ पाहीं स्वयें भोगी ॥ १४० ॥ सोनें वंद्य सोनेपणें । त्याचें स्वयें घडविल्या सुणें । वंद्य तेंचि निंद्य करणें । तेवीं स्वकर्म दूषणें गुणबुद्धी ॥ ४१ ॥ भूमि सहजें शुद्ध आहे । जें पेरिजे तें पीक होये । तेवीं स्वकर्म शुद्ध स्वयें । फलभोगू लाहे गुणवृत्ती ॥ ४२ ॥ वाचा सहज सरळ गोमटी । रामनामें जोडे ब्रह्मपुष्टी । वृथा जाय करितां चावटी । भोगी निंदेपाठीं महापाप ॥ ४३ ॥ तेवीं समर्थ श्रद्धायुक्त । पुरुषास करी विरक्त । तेथ त्रिगुणांचा सन्निपात । श्रद्धा छळित तें ऐक ॥ ४४ ॥ स्वधर्मकर्मीं श्रद्धा जोडे । क्षणैकें लागे विरक्तीकडे । क्षणें भोगफळाशा वाढे । क्षणैक पडे ममतासंधीं ॥ ४५ ॥ तैशीच कामाचीही रती । क्षणैक निष्कामीं अतिप्रीती । क्षणें स्त्रीभोग‍आसक्ती । क्षणें कामरती परद्वारीं ॥ ४६ ॥ याचिपरी धनाची जोडी । क्षणैक द्रव्याशा सोडी । क्षणैक अर्थाची अतिगोडी । क्षणैक आसुडी परद्रव्य ॥ ४७ ॥ त्रिविध धर्म त्रिविध कर्म । त्रिविध रूपें धनागम । या गुणवृत्तीस्तव स्वधर्म । सांडूनि अकर्म करी प्राणी ॥ ४८ ॥ एवं धर्म‍अर्थकामांआंत । गुणसन्निपात अनंत । फोडूनि सांगत एथ । वाढेल ग्रंथ अनिवार ॥ ४९ ॥ यालागीं गुणसन्निपात । सांगीतला संकलित । तेचि अर्थीं श्रीकृष्णनाथ । असे सांगत संक्षेपें ॥ १५० ॥ प्रवृत्तिलक्षणे निष्ठा पुमान्यर्हि गृहाश्रमे । स्वधर्मे चानुतिष्ठेत गुणानां समितिर्हि सा ॥ ८ ॥ पुरुषासी जो गृहाश्रम । तो जाणावा केवळ काम । तेथ नित्यनैमित्तिक कर्म । हा स्वधर्म चित्तशुद्धी ॥ ५१ ॥ गृहाश्रमीं हिंसा पंचसून । यालागीं तमोगुण प्रधान । गृहीं स्त्रीभोग पावे जाण । रजोगुण हा हेतू ॥ ५२ ॥ नित्यनैमित्तिक स्वधर्म । हें गृहस्थाचें निजक्र्म । हें चित्तशुद्धीचें निजवर्म । सत्त्व सुगम या हेतू ॥ ५३ ॥ गृहाश्रमप्रवृत्ति जाण । सदा मिश्रित तिनी गुण । गुणीं गुणवंत करून । कर्माचरण करविती ॥ ५४ ॥ न रंगतां तेणें रंगें । स्फटिक तद्रूप भासों लागे । तेवीं गुणात्मा गुणसंगें । वर्तों लागे गुणकर्मीं ॥ ५५ ॥ जेवीं कां कसवटी आपण । कसूनि दावी सुवर्णवर्ण । तेवीं पुरुषाची क्रिया जाण । दावी गुणलक्ष्णविभाग ॥ ५६ ॥ पुरुषं सत्त्वसंयुक्तमनुमीयाच्छमादिभिः । कामादिभी रजोयुक्तं क्रोधाद्यैस्तमसा युतम्‌ ॥ ९ ॥ इंद्रियनिग्रहो यथोचित । जो शमदमीं सदा क्रीडत । शांति वसे जया‌आंत । तो जाण निश्चित सात्त्विक ॥ ५७ ॥ जो सदा फळकामें कामुक । वांछी संसारभोगसुख । द्रव्यार्थी अतिदांभिक । रजोगुणी लोक तो जाण ॥ ५८ ॥ ज्यासी स्वधर्मीं नाहीं रती । आवडे अधर्मप्रवृत्ती । क्रोधलोभें गिळिली स्फूर्ती । तो जाण निश्चितें तामसू ॥ ५९ ॥ एवं देखोनि कर्माचरण । लक्षिजे पुरुषलक्षण । या नांव गा अनुमान । विवेकसंपन्न जाणती ॥ १६० ॥ सामान्यतः तिन्ही गुण । सांगीतलें निरूपण । हें न कळे म्हणेल मन । गुणवृत्ति भिन्न अवधारीं ॥ ६१ ॥ यदा बजति मां भक्त्या निरपेक्षः स्वकर्मभिः । तं सत्त्वप्रकृतिं विद्यात्पुरुषं स्त्रियमेव वा ॥ १० ॥ स्वकर्मीं वांछित फळ । तेचि मायेचें दृढ पडळ । ते फळाशा सांडोनि केवळ । जे भजनशीळ मद्रूपीं ॥ ६२ ॥ करूनि फळाशेचें शून्य । स्वधर्में करिती माझें भजन । पुरुष अथवा स्त्रिया जाण । ते सत्त्वसंपन्न निश्चित ॥ ६३ ॥ देहावयवलिंगदर्शन । तेणें स्त्रीपुरुषनामाभिधान । परी आत्मा आत्मीं नाहीं जाण । जीवत्व समान स्त्रीपुरुषीं ॥ ६४ ॥ चित्तवृत्तिक्रियाचरण । त्या नांव गा कर्म जाण । तेथ निरपेक्ष तें माझें भजन । स्वधर्म संपूर्ण या नांव ॥ ६५ ॥ ऐशिया स्वधर्मवृत्ती । जेथ प्रगटे माझी भक्ती । ते ते सात्त्विक प्रकृती । जाण निश्चितीं उद्धवा ॥ ६६ ॥ आशंका ॥ कर्म करितां फळाशा वाढे । तो फळभोग भोगणें पडे । स्वकर्में भक्ति केवीं घडे । कर्म तें कुडें अत्यंत ॥ ६७ ॥ कर्म करितां फळ बाधक । न करितां प्रत्यवाय नरक । कर्में कर्मबद्ध लोक । केले देख संसारीं ॥ ६८ ॥ जीव होता जो स्वतंत्र । तो कर्में केला परतंत्र । एवढें कर्माचें चरित्र । अतिविचित्र बाधक ॥ ६९ ॥ स्वकर्में भगवद्भक्ती । म्हणशी घडे कैशा रीतीं । तेचि अर्थींची उपपत्ती । स्वयें श्रीपती सांगत ॥ १७० ॥ सर्प धांवोनि धरिल्या तोंडीं । तो सर्वांगीं घाली आढी । तेणें धाकें जो सोडी । तरी तो विभांडी महाविखें ॥ ७१ ॥ ते सर्पबाधेची सांकडी । निवारी मंत्रवादी गारुडी । तेवीं कर्मीं कर्मबाधा गाढी । निवारी रोकडी गुरुरावो ॥ ७२ ॥ रिघतां सद्गुरूसी शरण । कर्म करावी ब्रह्मार्पण । हेंचि निरपेक्षलक्षण । उद्धवा जाण निश्चित ॥ ७३ ॥ ब्रह्म कर्माचें प्रकाशक । कर्म तितुकें ब्रह्मात्मक । हेंचि मदर्पण चोख । माझें भजन देख या रीतीं ॥ ७४ ॥ सर्वेंद्रियीं ज्ञानस्फूर्ती । ते ब्रह्मींची ब्रह्मशक्ती । ऐसोनि निश्चयें कर्मस्थिती । स्वकर्मभक्ति या नांव ॥ ७५ ॥ ऐसेनि स्वकर्में स्वाभाविक । जे मज भजती भाविक । ते ते शुद्ध सात्त्विक लोक । जाण निष्टंक उद्धवा ॥ ७६ ॥ स्वधर्म सर्वथा निष्फळ । म्हणती ते मूर्ख केवळ । स्वधर्म निरसी चित्तमळ । कर्म समूळ निर्दळी ॥ ७७ ॥ एवढी स्वधर्माची जोडी । सांडूनि वांछिती विषयगोडी । तें तें राजसें बापुडीं । केवळ वेडीं विषयार्थी ॥ ७८ ॥ विषयफळ वांछितां देख । देह धरणें आवश्यक । देहसंभव दुःखदायक । स्वर्गनरकफळ भोगी ॥ ७९ ॥ यापरी जनीं दुःखदाती । राजसतमसप्रकृती । ऐक त्या दोनी गुणवृत्ती । विशद तुजप्रती सांगेन ॥ १८० ॥ यदा आशिष आशास्य मां भजेत स्वकर्मभिः । तं रजःप्रकृतिं विद्याद्धिंसामाशास्य तामसम्‌ ॥ ११ ॥ जो कां आचरोनि स्वधर्म । वांछी नाना फळकाम । तें तें जाण काम्य कर्म । राजस धर्म या नांव ॥ ८१ ॥ जो अभ्यंतरीं अतिसकाम । तो जे जे आचरे कर्मधर्म । ते ते अवघेचि सकाम । फळसंभ्रम निजहेतू ॥ ८२ ॥ स्वरूपीं काम्य कर्म नाहीं । कामना काम्य करी पाहीं । सोनें स्वभावें असे ठायीं । लेणें उपायीं स्वयें कीजे ॥ ८३ ॥ स्वकर्म स्वभावें पवित्र जाण । स्वधर्में माझें शुद्ध भजन । तेथ कामनाफळ कामून । काम्य आपण स्वयें कीजे ॥८४ ॥ फळकामें जें माझें यजन । तें केवळ फळाचेंचि भजन । सकामें जें स्वधर्माचरण । ते प्रकृति जाण राजस ॥ ८५ ॥ ऐस‍ऐशिये प्रकृतीचा विलास । स्त्री अथवा हो कां पुरुष । तें तें जाण पां राजस । ऐक तामस गुणवृत्ति ॥ ८६ ॥ क्रोधयुक्त अंतःकरण । तेणेंसीं ज्याचें स्वधर्माचरण । फळ वांछी शत्रुमरण । ते प्रकृति जाण तामसी ॥ ८७ ॥ जेथें द्वेषें बांधलें घर । जे ठायीं क्रोध अनिवार । जो भूतमात्रीं निष्ठुर । ज्याची प्रकृति क्रूर सर्वदा ॥ ८८ ॥ ऐशिया स्वभावावरी । नर अथवा हो कां नारी । ते ते तामस संसारीं । निजनिर्धारीं उद्धवा ॥ ८९ ॥ जीव स्वरूपें चैतन्य पहा हो । त्यासी ‘मां भज’ कां म्हणे देवो । जीवासी कां सेवकभावो । सेव्य देवो कैसेनी ॥ १९० ॥ येच अर्थींचें निरूपण । कृष्ण सांगताहे आपण । सेव्यसेवकलक्षण । मायागुणसंबंधें ॥ ९१ ॥ सत्त्वं रजस्तम इति गुणा जीवस्य नैव मे । चित्तजा यैस्तु भूतानां सज्जमानो निबध्यते ॥ १२ ॥ बांधोनि नाणितां आया । जेवीं देहाधीन असे छाया । तेवीं भगवंताधीन माया । नातळोनियां वर्तवी ॥ ९२ ॥ माया वर्तविता निवर्तविता । स्वामी भगवंत तत्त्वतां । यालागीं माया‌अध्यक्षता । त्यासीचि सर्वथा वेद बोले ॥ ९३ ॥ सूर्य अंधारातें नाशी । परी तो संमुख न ये त्यापाशीं । तेवीं मायानियंता हृषीकेशी । परी माया देवासी दृष्ट नव्हे ॥ ९४ ॥ माझें जें देखणेपण । तेंचि मायेचें मुख्य लक्षण । मजपाशीं माय जाण । गुणाभिमानेंसीं नाहीं ॥ ९५ ॥ मायाबिंबित चैतन्य । त्यासी बोलिजे जीवपण । त्या जीवासी त्रिगुणीं बांधोन । देहाभिमान दृढ केला ॥ ९६ ॥ जीवासी लागतां देहाभिमान । तो झाला मायाधीन । मायानियंता श्रीनारायण । तो स्वामी जाण जीवाचा ॥ ९७ ॥ जीव गुणाभिमानें बद्धक । यालागीं झाला तो सेवक । आत्मा गुणातीत चोख । बंधमोचक नीवाचा ॥ ९८ ॥ यापरी सेव्यसेवकभावो । विभाग दावोनियां पहा हो । त्रिगुणगुणांचा अन्वयो । विशद देवो स्वयें सांगे ॥ ९९ ॥ गुण तिन्ही समसमान । त्यांमाजीं क्षोभोनियां जाण । जो जो वाढे अधिक गुण । तें तें लक्षण हरि सांगे ॥ २०० ॥ ब्रह्म निर्मळत्वें प्रसिद्ध । कर्म शोधकत्वें अतिशुद्ध । येथ कर्मीं उपजे कर्मबाध । तो चित्तसंबंध गुणक्षोभें ॥ १ ॥ कर्मब्रह्मीं दोष नाहीं । दोष चित्तवृत्तीच्या ठायीं । तोही गुणक्षोभें पाहीं । घाली अपायीं पुरुषातें ॥ २ ॥ येचि अर्थींचें निरूपण । सांगितलें मिश्रलक्षण । आतां वाढल्या एकेक गुण । गुणलक्षण तें ऐक ॥ ३ ॥ जो गुण वाढे अति‌उन्नतीं । इतर त्यातळीं वर्तती । ते काळींची पुरुषस्थिती । उद्धवाप्रती हरि सांगे ॥ ४ ॥ यदेतरौ जयेत्सत्त्वं भास्वरं विशदं शिवम्‌ । तदा सुखेन युज्येत धर्मज्ञानादिभिः पुमान्‌ ॥ १३ ॥ समूळ फळाशा त्यागूनी । निर्विकल्प निराभिमानी । जो लागे स्वधर्माचरणीं । तैं रज तम दोनी जिणे सत्त्व ॥ ५ ॥ जैं भाग्याचें भरण उघडे । तैं हरिकथाश्रवण घडे । मुखीं हरिनामकीर्ति आवडे । तेणें सत्त्व वाढे अतिशुद्ध ॥ ६ ॥ कां दैवें जोडिल्या सत्संगती । श्रवणीं श्रवण लांचावती । वाचा लांचावे नामकीर्ती । अतिप्रीतीं अहर्निशीं ॥ ७ ॥ ऐस‍ऐशिया अनुवृत्ती । रज तम दोनी क्षीण होती । सत्त्व वाढे अनुद्वेगवृत्तीं । त्यां सत्त्वाची स्थिति समूळ ऐक ॥ ८ ॥ भास्करत्वें प्रकाश बहुळ । विशदत्वें अतिनिर्मळ । शिव म्हणीजे शांत सरळ । हें सत्त्वाचें केवळ स्वरूप मुख्य ॥ ९ ॥ हे सत्त्वाची सत्त्ववृत्ती । आतुडे ज्या साधकाहातीं । ते काळींची पुरुषस्थिती । ऐक तुजप्रती सांगेन ॥ २१० ॥ तैं विवेकाचें तारूं आतुडे । वैराग्याचें निजगुज जोडे । सर्वेंद्रियीं प्रकाश उघडे । शिगे चढे स्वधर्म ॥ ११ ॥ ते काळीं जन अधर्मता । गर्व अभिमान असत्यता । बलात्कारेंही शिकवितां । न करी सर्वथा अधर्म ॥ १२ ॥ निकट असतां दुःखसाधन । सात्त्विक सदा सुखसंपन्न । बलात्कारें क्षोभवितां मन । सात्त्विक जाण क्षोभेना ॥ १३ ॥ ऐशिया निजसत्त्व दृष्टी । सुख सुख येतां भेटी । त्यासी स्वानंदें कोंदे सृष्टीं । शुद्ध सत्त्वपुष्टी या नांव ॥ १४ ॥ ऐसें विशद सत्त्व जयांपाशीं । शमदम सेविती तयांसी । वैराग्य लागे पायांसी । शुद्ध सत्त्वराशी ते उद्धवा ॥ १५ ॥ तैसेंचि सत्त्व तम जिणोन । जैं वाढे गा रजोगुण । तैं राजसाचें लक्षण । ऐक संपूर्ण हरि सांगे ॥ १६ ॥ यदा जयेत्तमः सत्त्वं रज सङ्गं भिदा चलम्‌ । तदा दुःखेन युज्येत कर्मणा यशसा श्रिया ॥ १४ ॥ रजोवृद्धीचें कारण । देहीं उपजे ज्ञानाभिमान । पदोपदीं देखे दोषगुण । वांछी सन्मान प्रतिष्ठा ॥ १७ ॥ नवल रजोगुणाची ख्याती । ज्ञातेपणें कामासक्ती । नाना भोग वांछी चित्तीं । तेणें रजाची प्राप्ती अनिवार ॥ १८ ॥ ऐसेनि रजोगुण वाढोनि वाढी । सत्त्वतमांतें तळीं पाडी । त्या रजाची स्वरूपतामोडी । ऐक निरवडी सांगेन ॥ १९ ॥ श्लोकीं त्रैपदीं प्रबळ । रज संगभिदाबळ । बोलिला रजोगुण केवळ । तेंचि विवळ हरि सांगे ॥ २२० ॥ संग म्हणिजे देहाभिमान । भेद म्हणिजे मीमाझेपण । बळ म्हणिजे काम गहन । आग्रहो पूर्ण प्रवृत्तीचा ॥ २१ ॥ देहाभिमानें दुःख उठी । भेदें भय लागे पाठी । त्या नश्वर देहाचिया पुष्टी । काम्यकामाठी कर्माची मांडी ॥ २२ ॥ ज्या कर्माचेनि कैवाडें । यश श्री उदंड जोडे । तें तें कर्म वाढवी पुढें । हें रजोगुणें घडे आचरण ॥ २३ ॥ मी एक पवित्र त्रिजगतीं । माझीच उत्तम करम्स्थिती । प्रवृत्ति मान्यता आसक्ती । जे जाणावी स्थिती राजस ॥ २४ ॥ रजाचें बळ उद्भट । कर्म आदरी अचाट । वाढवी कर्मकचाट । तो जाण श्रेष्ठ राजस ॥ २५ ॥ बाहेर दिसे सात्त्विकस्थिती । अंतरीं कर्मवासना द्रव्यासक्ती । ज्यासी प्रिय आवडे चित्तीं । तो जाण निश्चितीं राजसू ॥ २६ ॥ जेव्हां सत्त्व रज दोनी गुण । जिणोनि तम वाढे पूर्ण । ते काळींचें पुरुषलक्षण । स्वयें नारायण सांगता ॥ २७ ॥ यदा जयेद्रजः सत्त्वं तमो मूढं लयं जडम्‌ । युज्येत शोकमोहाभ्यां निद्रया हिंसयाऽऽशया ॥ १५ ॥ रज सत्त्व करूनि गूढ । जैं तमोगुण होय रूढ । तैं तो पुरुषातें सदृढ । करी जडमूढ अतिसब्ध ॥ २८ ॥ विश्वासूनि वाडेंकोडें । जैं परद्रव्य बुडवणें पडे । कां परदारागमन घडे । तैं तेणें वाढे तमोगुण ॥ २९ ॥ स्वमुखें परापवाद बोलणें । स्वयें साधुनिंदा करणें । संतसज्जनां द्वेषणें । तैं तमाचें ठाणें अनिवार ॥ २३० ॥ धु‌ईचेनि आलेपणें । पडे सूर्यासी झांकणे । तेवीं विवेकाचें जिणें । तमोगुणें ग्रासिजे ॥ ३१ ॥ सत्त्वगुण प्रकाशक । रज प्रवृत्तिप्रवर्तक । दोनींतें गिळूनि देख । तमाचें आधिक्य अधर्में वाढे ॥ ३२ ॥ करितां पूज्याचें हेळण । साधूचे देखतां दोषगुण । तेणें खवळला तमोगुण । त्याचें स्वरूप पूर्ण तें ऐक ॥ ३३ ॥ तमोगुण वाढल्या प्रौढ । स्फूर्तिमात्र होय मूढ । लयो उपजवोनि दृढ । करी जड जीवातें ॥ ३४ ॥ कार्याकार्यविवेकज्ञान । ते स्फूर्ति अंध होय पूर्ण । या नांव गा मूढपण । ऐक चिन्ह लयाचें ॥ ३५ ॥ जागृतीमाजीं असतां चित्त । अर्थ स्वार्थ परमार्थ । कांहीं स्फुरेना कृत्याकृत्य । लयो निश्चित या नांव ॥ ३६ ॥ समस्ताही इंद्रियव्रत्ती । अनुद्यमें स्तब्धगती । निःशेष लोपे ज्ञानशक्ती । जडत्वप्राप्ती या नांव ॥ ३७ ॥ मूढत्वें पावे शोक दुःख । जडत्वें मिथ्या मोह देख । मोहास्तव होय पातक । अति‌अविवेक अधर्मीं ॥ ३८ ॥ ऐक लयाचें कौतुक । अहोरात्र निद्रा अधिक । निद्रेवेगळें ब्रह्मसुख । नावडे देख तामसा ॥ ३९ ॥ पूर्ण वाढल्या तमोगुण । ऐसें हो‌अ पुरुषलक्षण । वाढल्या सत्त्वादि गुण । फळ कोण तें हरि सांगे ॥ २४० ॥ यदा चित्तं प्रसीदेत इन्द्रियाणां च निर्वृतिः । देहेऽभयं मनोऽसङ्गं तत्सत्त्वं विद्धि मत्पदम्‌ ॥ १६ ॥ वाढलिया सत्त्वगुण । चित्त सदा सुप्रसन्न । कामक्रोधलोभाचें स्फुरण । सर्वथा जाण स्फुरेना ॥ ४१ ॥ जें चित्त वणवणी विषयांलागीं । तें उदास होय विषयभोगीं । विषय आदळतांही अंगीं । तैं विषयसंगीं विगुंतेना ॥ ४२ ॥ जेवीं जळामाजीं जळस्थ । पद्मिणीपत्र जळीं अलिप्त । तेवीं विषयांमाजीं चित्त । विषयातीत मद्बोधें ॥ ४३ ॥ सदा मरणभय देहासी । तें मरणा‌अलिया देहापाशीं । भय नुपजे सात्त्विकासी । भावें मत्पदासी विनटले ॥ ४४ ॥ जंववरी भासे मीतूंपण । तंववरी अवश्य बधी मरण । सात्त्वेक मत्पदीं अभिन्न । यालागीं मरणभय त्या नाहीं ॥ ४५ ॥ सात्त्विक मत्पदीं अनन्य शरण । यालागीं बधीना जन्ममरण । या स्थितीं वर्तती सत्त्वगुण । आतां ऐक लक्षण रजाचें ॥ ४६ ॥ विकुर्वन्‌ क्रियया चाधीरनिर्वृत्तिश्च चेतसाम्‌ । गात्रास्वास्थ्यं मनो भ्रांतं रज एतैर्निशामय ॥ १७ ॥ खवळलिया रजोगुण । विषयचिंता अतिदारुण । कर्मेंद्रियीं क्रियाभरण । नाना परींचें जाण उपपादी ॥ ४७ ॥ शरीर असतांही स्वस्थ । मन चिंतातुर अतिभ्रांत । वाढवितां विषयस्वार्थ । दुःखी होत सर्वदा ॥ ४८ ॥ असतां पुत्रवित्तसंपत्ती । अधिक स्वार्थ वाढवी चित्तीं । राजसाची चित्तवृत्ती । न मनी निवृत्ती क्षणार्ध ॥ ४९ ॥ नसतां विकाराचें कारण । चित्तीं विकार चिंती आपण । हेंचि राजसाचें लक्षण । मुख्यत्वें जाण उद्धवा ॥ २५० ॥ रात्री नोहे पैं प्रबळ । ना दिवस नव्हे सोज्ज्वळ । जैसी झांबवली सांजवेळ तैसा केवळ रजोगुण ॥ ५१ ॥ सत्त्वरजांची उणखूण । तुज दाविली ओळखण । आतां ऐक तमोगुण । जड लक्षण तयाचें ॥ ५२ ॥ सीदच्चित्तं विलीयेत चेतसो ग्रहणेऽक्षमम्‌ । मनो नष्टं तमो ग्लानिस्तमस्तदुपधारय ॥ १८ ॥ चित्तीं चिंता अतिगहन । ते महामोहीं होय निमग्न । कोणेही अर्थींचें ज्ञान । हृदयीं जाण स्फुरेना ॥ ५३ ॥ सुषुप्तीवेगळें अज्ञान । सदा पळे देखोनि ज्ञान । तेथ नवल कैसें झालें जाण । त्या ज्ञानातें अज्ञान गिळूनि ठाके ॥ ५४ ॥ जागाचि परी निजेला दिसे । कर्म करी स्फुरण नसे । जेवीं कां आभाळांतिले अंवसे । रात्रीं चाले जैसें आंधळें ॥ ५५ ॥ सकळ शरीराचा गोळा । होय आळसाचा मोदळा । हा तमोग्लानीचा सोहळा । पडळ ये डोळां चित्तवृत्ती ॥ ५६ ॥ संकल्प विकल्पांची ख्याती । उपजवी सदा मनोवृत्ती । त्या मनाची जड होय स्थिती । संकल्पस्फूर्ती स्फुरेना ॥ ५७ ॥ आणिकही नवलस्थिती । चित्तासी नाठवे चित्तस्फूर्ती । एवढी वाढे तमाची ख्याती । मनोवृत्तिविनाशक ॥ ५८ ॥ यापरी तमाचें बळ होय । तैं मनातें अज्ञान खाय । ते काळीं मन नष्टप्राय । मूर्च्छित राहे मूढत्वें ॥ ५९ ॥ मन निःशेष जैं नासतें । तैं महादुःख कोण भोगितें । यालागीं तमाचेनि ऐक्यमतें । मन उरे तेथें जडमूढ ॥ २६० ॥ यापरी जे वर्तती गती । तेचि अत्यंत दुःखदाती । या नांव गा तमाची स्थिती । जाण निश्चितीं उद्धवा ॥ ६१ ॥ वाढवितां गुणवृत्ती । कोणे गुणें कोण वाढती । येचि अर्थींची उपपत्ती । स्वयें श्रीपती सांगत ॥ ६२ ॥ एधमाने गुणे सत्त्वे देवानां बलमेधते । असुराणां च रजसि तमस्युद्धव रक्षसाम्‌ ॥ १९ ॥ दैवी आसुरी राक्षसी स्थिती । हे त्रिगुण गुणांची संपत्ती । जे जे ब्रह्मांडीं इंद्रियवृत्ती । तेचि स्थिती पिंडींही ॥ ६३ ॥ ब्रह्मांदीं सकळ देव । महापुरुषाचे अवयव । पिंडींही तेचि स्वयमेव । वर्तती सर्व निज‍ऐक्यें ॥ ६४ ॥ उचित स्वधर्मशास्त्रस्थिती । निवृत्तिकर्मीं जे प्रवृत्ती । ऐशी जेथ इंद्र्यियवृत्ती । ते दैवी संपत्ती सत्त्वस्थ ॥ ६५ ॥ कामाभिलाष दृढ चित्तीं । आणि स्वधर्मीं तरी वर्तती । ऐशी जे इंद्रियस्थिती । जे आसरी संपत्ती राजसी ॥ ६६ ॥ सलोभमोहें क्रोध चित्तीं । सदा अधर्मीं प्रवृत्ती । ऐशी जे इंद्रियस्तिथी । ते राक्षसी संपत्ती तामसी ॥ ६७ ॥ क्षणें सकाम क्षणें निष्काम । ऐसा जेथ वाढे स्वधर्म । तेथ देवां असुरां परम । होय संग्राम वृत्तीसी ॥ ६८ ॥ चित्तीं वाढवूनि मोहभ्रम । अधर्मचि मानी स्वधर्म । तैं राक्षसाचा पराक्रम । देवासुरां परम निर्दाळी ॥ ६९ ॥ सकामनिष्काममोहभ्रमेंसी । वृत्ती वर्ते गा जयापाशीं । तेथ देवांअसुरांराक्षसांसीं । कल्हो अहर्निशीं अनिवार ॥ २७० ॥ क्षणैक रति परमार्थीं । क्षणैक रति अर्थस्वार्थीं । क्षणैक होय अनर्थीं । परदारारती परद्रव्यें ॥ ७१ ॥ ऐशिये गा चित्तवृत्तीं । कदा नुपजे निजशांती । मा परमार्थाची प्राप्ती । कैशा रीती हो‌ईल ॥ ७२ ॥ साधक सर्वदा पुसती । कोण बाधा असे चित्तवृत्ती । ते बाधकत्वाची स्थिती । विशद तुजप्रती सांगीतली ॥ ७३ ॥ एकचि गुण जैं पुरता जोडे । तैं एकविध वृत्ती वाढे । हें तंव सर्वथा न घडे । गुण गुणासी भिडे उपमदें ॥ ७४ ॥ एकचि न जोडे गुणावस्था । यालागीं नव्हे एकविधता । तेणें अनिवार भवव्यथा । बाधी भूतां गुणक्षोभें ॥ ७५ ॥ तम अधर्माकडे वाढे । रजोगुण देहकर्माकडे । सत्त्वगुणासी वाढी न घडे । मुक्तता जोडे कैसेनी ॥ ७६ ॥ रजतमौभयसंधीं । सत्त्व अडकलें दोहींमधीं । तें वाढों न शके त्रिशुद्धीं । नैराश्यें वृद्धी सत्त्वगुणा ॥ ७७ ॥ त्रिगुण गुणांची त्रिपुटी । आपण कल्पी आपल्या पोटीं । तेंचि भवभय हो‍ऊनियां उठी । लागे पाठीं बाधकत्वें ॥ ७८ ॥ सत्त्वें देवांसी प्रबळ बळ । रजोगुणें दैत्य प्रबळ । तमोगुणें केवळ । आतुर्बळ राक्षसां ॥ ७९ ॥ हे गुणवृत्तींची व्यवस्था । समूळ सांगीतली कथा । आतां त्रिगुणांच्या तीन अवस्था । ऐक तत्त्वतां सांगेन ॥ २८० ॥ सत्त्वाज्जागरणं विद्याद्रजसा स्वप्नमादिशेत्‌ । प्रस्वापं तमसा जन्तोस्तुरीयं त्रिषु संततम्‌ ॥ २० ॥ सत्त्वगुणाचिये स्थिति । नातळे स्वप्न आणि सुषुप्ती । जीवीं सदा नांदे जे जागृती । इंद्रियप्रवृत्ती सावध ॥ ८१ ॥ रजोगुणाचेनि आधिक्यें । चित्तवृत्तीतें स्वप्न जिंके । जागृति सुषुप्ति दूरी ठाके । बैसला देखे स्वप्नचि ॥ ८२ ॥ तमोगुण वाढल्या वाढी । जागृति स्वप्न दूरी दवडी । मग सुशुप्तीची अतिगाढी । आदळे रोकडी जीवा‌अंगीं ॥ ८३ ॥ त्यासी सबे बैसविल्या पाहे । बोलतां-बोलतां डुलकी जाये । जेवितांजेवितांही पाहे । झोंपीं जाये कडकडां ॥ ८४ ॥ क्षणां जागृति क्षणां सुषुप्ती । क्षणैक स्वप्नाची प्रतीती । हे त्रिगुणांची मिश्रित वृत्ती । जाग निश्चितीं उद्धवा ॥ ८५ ॥ जागृति स्वप्न सुषुप्ती । तिहीं अवस्थांतें प्रकशिती । यालागीं ते चौथी । तुरीय म्हणती सज्ञान ॥ ८६ ॥ जे जागृतीतें जागवित । जे स्वप्नीं स्वप्नातें नांदवित । जे सुषुप्तीतें निजवित । त्यातें तुरीय म्हणत उद्धवा ॥ ८७ ॥ जे तिहीं अवस्थांआंत । असोनि नव्हे अवस्थाभूत । जे निर्गुण निजनित्य त्यातेंचि म्हणत तुरीय ॥ ८८ ॥ जेवीं पुत्राचेनि जाहलेपणें । पुरुषें पिता नांव पावणें । तेवीं तिहीं अवस्थागुणें । तुरीय म्हणणें वस्तूसी ॥ ८९ ॥ वस्तूवरी अवस्था भासे । भासली अवस्था सवेंचि नासे । त्या नाशामाजीं वस्तु न नासे । उरे अविनाशें तुरीय ॥ २९० ॥ तुरीय त्रिकाळीं संतत । यापरी जाणावें एथ । आतां गुणवृद्धिभूमिका प्राप्त । तोही वृत्तांत हरि सांगे ॥ ९१ ॥ उपर्युपरि गच्छन्ति सत्त्वेन ब्राह्मणा जनाः । तमसाधोऽध आमुख्याद्रजसान्तरचारिणः ॥ २१ ॥ सत्त्वगुणाचें आयतन । मुख्यत्वें ब्राह्मण जन । ते न करूनि ब्रह्मार्पण । स्वधर्माचरण जे करिती ॥ ९२ ॥ त्यांसी स्वधर्माच्या कर्मशक्तीं । ऊर्ध्वलोकीं होय गती । लोकलोकांतरप्राप्ती । ब्राह्मण पावती ते ऐक ॥ ९३ ॥ स्वर्गलोक महर्लोक । क्रमूनि पावती जनलोक । उल्लंघोनियं तपोलोक । पावती सात्त्विक सत्यलोक पैं ॥ ९४ ॥ वाढलिया रजोगुण । शूद्रादि चांडाळपण । पुढती जन्म पुढती मरण । अविश्रम जाण भोगवी ॥ ९५ ॥ वाढलिया तमोगुण । पश्वादि योनि पावोन । दंश मशक वृक्ष पाषाण । योनि संपूर्ण भोगवी ॥ ९६ ॥ प्राण्यासी अंतकाळीं जाण । देहांतीं जो वाढे गुण । त्या मरणाचें फळ कोण । तेंही श्रीकृष्ण स्वयें सांगे ॥ ९७ ॥ अनन्य करितां माझी भक्ती । भक्तांसी अंतीं कोण गती । तेहीविखींची उपपत्ती । श्लोकार्थीं हरि सांगे ॥ ९८ ॥ सत्त्वे प्रलीनाः स्वर्यान्ति नरलोकं रजोलयाः । तमोलयास्तु निरयं यान्ति मामेव निर्गुणाः ॥ २२ ॥ संसारीं मुख्यत्वें त्रिगुण । तेथ वाढोनियां सत्त्वगूण । ज्यासी प्राप्त होय मरण । तो स्वर्गभोगीं जाण दिव्य देह पावे ॥ ९९ ॥ सत्त्वे निमाल्या सात्त्विक । ते पावती सर्गलोक । रजोगुणें निमाल्या देख । त्या मनुष्यलोक मानवां ॥ ३०० ॥ अंतीं वाढोनियां तमाधिक्य । तमोगुणें निमाल्या देख । ते भोगिती महानरक । दुःखदायक दारुण ॥ १ ॥ सप्रेम करितां माझी भक्ती । माझिया भक्तांसी देहांतीं । हृदयीं प्रकटे माझी मूर्ती । घवघविती निजतेजें ॥ २ ॥ शंखचक्रगदादि संपूर्ण । पीतांबरधारी श्रीकृष्ण । ध्यानीं धरूनि पावे मरण । तो वैकुंठीं जाण मी होयें ॥ ३ ॥ सर्वभूतीं मी आत्मा पूर्ण । ऐसें ज्याचें अखंड भजन । ते जितांचि तिन्ही गुण । जिणोनि निर्गुण पावती ॥ ४ ॥ त्यांचें देहासी दैवें आल्या मरण । मजवेगळें नाहीं स्थान । ते निजानंदें परिपूर्ण । निजनिर्गुण स्वयें होती ॥ ५ ॥ माझें स्वरूप निजनिर्गुण । अथवा वैकुंठींचें सगुण । दोन्ही एकचि निश्चयें जाण । सगुण निर्गुण समसाम्य ॥ ६ ॥ स्वर्ग नरक मनुष्यलोक । प्राप्ती पावले निर्गुण चोख । त्यांच्या साधनांचें कौतुक । स्वयें यदुनायक सांगत ॥ ७ ॥ मदर्पणं निष्फलं वा सात्त्विकं निजकर्म तत । राजसं फलसंकल्पं हिंसाप्रायादि तामासम्‌ ॥ २३ ॥ सकळ कर्मक्रियाचरण । सकल्पेंवीण आपण । सहजें होय ब्रह्मार्पण । हें निर्गुण साधन शोधितसत्त्वे ॥ ८ ॥ वर्णाश्रमधर्म सकळ । आचरे परी न वांछि फळ । माझे भक्तीचें प्रेम प्रबळ । हें कर्म केवळ सात्त्विक ॥ ९ ॥ माझें भजन हाचि स्वधर्म । याचि नांव गा निजकर्म । ऐसें ज्यासे कळे वर्म । सात्त्विक कर्म या नांव ॥ ३१० ॥ स्वधर्म आचरोनि सकळ । इंद्रादि देवां यजनशीळ । जो वांछी इहामुत्र फळ । हें कर्म केवळ राजस ॥ ११ ॥ जे कर्मीं प्रकट हिंसा घडे । कां आभिचारिक करणें पडे । स्वरूपें जें कर्म कुडें । तें जाण धडापुडें तामस ॥ १२ ॥ जेथ दांभिक कर्माचारू । जेथ साधूंसी अतिमत्सरू । जेथ निंदेचा प्रबळ भरू । तो कर्मादरू तामस ॥ १३ ॥ आतां त्रिगुण आणि निर्गुण । यांचें चतुर्विध लक्षण । या श्लोकीं श्रीकृष्ण । स्वमुखें आपण सांगत ॥ १४ ॥ कैवल्यं सात्त्विकं ज्ञानं रजो वैकल्पिकं च यत्‌ । प्राकृतं तामसं ज्ञानं मन्निष्ठं निर्गुण स्मृतम्‌ ॥ २४ ॥ देहीं असोनि देहातीत । भूतीं भूतात्मा भगवंत । भूतां सबाह्य सभराभरित । हें ज्ञान निश्चित सात्त्विक ॥ १५ ॥ भिन्न खाणी भिन्नाकार । भिन्न नांवें भिन्न व्यापार । तेथ वस्तु देखे अभिन्नाकार । हें ज्ञान साचार सात्त्विक ॥ १६ ॥ करूनि वेदशास्त्रपठन । निर्धारितां निजज्ञान । सवेंचि विकल्पी आपण । विकल्प पूर्ण रजाचे ॥ १७ ॥ करून वार्तिकान्त व्युत्पत्ती । अद्वैत-निश्चयो नाहीं चित्तीं । आपण विकल्पी आपुल्या युक्ती । तें ज्ञान निश्चितीं राजस ॥ १८ ॥ करूनि वेदशास्त्रश्रवण । होय शिश्नोदरपरायण । इंद्रियार्थीं श्रद्धा पूर्ण । तो केवळ जाण राजस ॥ १९ ॥ एक निश्चयो नाहीं चित्तीं । विकल्प उपजती नेणो किती । हे रजोगुणाची ज्ञानवृत्ती । ऐक निश्चितीं तमोगुण ॥ ३२० ॥ महामोहो गिळी ज्ञानस्फूर्ती । मी जड अंध मानी निश्चितीं । नश्वर पदार्थीं आसक्ती । तें ज्ञान निश्चितीं तामस ॥ २१ ॥ आहार निद्रा भय मैथुन । केवळ पशुप्राय जें ज्ञान । तें निश्चयें तामस जाण । ऐक निर्गुणविभाग ॥ २२ ॥ कार्य कर्ता आणि कारण । त्रिपुटी त्रिगुणेंसी करूनि शून्य । केवळ जें चैतन्यघन । तें निर्गुण ज्ञान उद्धवा ॥ २३ ॥ सत्त्वाचेनि निज‍उल्हासें । सर्वेंद्रियीं ज्ञान प्रकाशे । तें ज्ञानचि मानी वायवसें । मी ज्ञानरूपें असें अनादि ॥ २४ ॥ सिंधुजळें सरिता वाहती । त्या आलिया सिंधूप्रती । तेणें उल्हासेना अपांतती । तेवीं ज्ञानस्फूर्ती श्लाघेना ॥ २५ ॥ रजोगुणें आलिया सकाम । त्यासी क्षोभूं न शके काम । म्हणे माझेनि चाले काम्य कर्म । शेखीं मी निष्काम निजांगें ॥ २६ ॥ होतां काम्य कर्माचा सोहळा । जेवीं सूर्या न बाधी उन्हाळा । तेवीं काम्य कर्मीं मी जिव्हाळा । माझेनि सोज्ज्वळा काम सवेग ॥ २७ ॥ तमोगुणाच्या झडाडा । पडिला महामोहाचा वेढा । न करितां मोहाचा निझाडा । मोहनिर्णय गाढा आपण पैं जाणे ॥ २८ ॥ सूर्यो न दिसे जिकडे । अंधारू व्यापी तिकडे । तेवीं स्वरूपनिष्ठेपुढें । न बाधी सांकडें मोहाचें ॥ २९ ॥ अंगीं आदळतां तिन्ही गुण । जो गजबजीना आपण । ते निजनिष्ठा निजनिर्गुण । उद्धवा जाण निश्चित ॥ ३३० ॥ अज्ञानाच्या अवसरीं । ज्ञानाची चाड न धरी । प्रवर्ततां कामाचारीं । निष्कामाचा न करी पांगडा ॥ ३१ ॥ आदळतां मोहाचीं झटें । ज्याचा बोध कदा न पालटे । त्रिगुणीं निर्गुणत्वें राहाटे । माझिया निष्ठें मद्भक्त ॥ ३२ ॥ त्रिगुणांचा त्रिविध वास । निर्गुण निजरहिवास । येचि अर्थीं हृषिकेश । विशद विलास सांगत ॥ ३३ ॥ वनं तु सात्त्विको वासो ग्रमो राजस उद्यते । तामसं द्यूतसदनं मन्निकेतं तु निर्गुणम्‌ ॥ २५ ॥ पवित्र आणि तीर्थभूत । विजन वन एकान्त । ऐशिये वस्तीं सुखावे चित्त । तो वास निश्चित सात्त्विक ॥ ३४ ॥ वस्ती व्यवहारीं व्यापारीं । कां सद सन्मानें राजद्वारीं । विवाहामंडपामाझारीं । ज्यासी प्रीति भारी वस्तीसी ॥ ३५ ॥ ज्यासी आवडे धनसंपदा । निकटवासें वसती प्रमदा । जो नगरीं ग्रामीं वसे सदा । हे वस्ती संपदा राजस ॥ ३६ ॥ जेथ सन्मान वांछी चित्त । सदा क्षोभे विषयासक्त । ऐसा‌इसी वस्ती जेथ । ते जाण निश्चित राजस ॥ ३७ ॥ जेथ साधुनिंदा जोडे । जेथ गुणदोषीं दृष्टि वाढे । ऐशिया ठायीं वस्ती आवडे । तें तामसाचें गाढें निवासस्थान ॥ ३८ ॥ जेथ कलहाचें कारण । जेथ अविवेकी होय मन । वेश्या द्यूत मद्यसदन । हें निवासस्थान तामस ॥ ३९ ॥ देवालयीं घवघविती । देखोनि माझी निजमूर्ती । साचार सुखावे चित्तवृत्ती । ते निर्गुण वस्ती उद्धवा ॥ ३४० ॥ अभेदभक्तांचें निजमंदिर । तें मज निर्गुणाचें निजघर । तेथ सुखत्वें ज्याची वृत्ति स्थिर । ते वस्ती साचार निर्गुण ॥ ४१ ॥ निर्गुणासी घरठावो । हें बोलणें म्हणसी वावो । जेथ उपजे ब्रह्मसद्भावो । ते वस्ती पहा हो निर्गुण ॥ ४२ ॥ विषयातीत निजस्थिती । सुखें सुखरूप राहे वृत्ती । ते निर्गुणाची निजवस्ती । जाण निश्चितीं उद्धवा ॥ ४३ ॥ सांडूनि आकाराचें ज्ञान । निराकारीं सुखसंपन्न । वृत्ति स्थिरावे परिपूर्ण । ते वस्ती निर्गुण जनीं विजनीं ॥ ४४ ॥ त्रिगुणसंगें त्रिविध कर्ता । निर्गुनलक्षणीं लक्षिजे चौथा । चतुर्विध कर्त्यांची व्यवस्था । एक आतां सांगेन ॥ ४५ ॥ सात्त्विकः कारकोऽसङ्गी रागान्धो राजसः स्मृतः । तामसः स्मृतिविभ्रष्टो निर्गुणो मदपाश्रयः । २६ ॥ कांटॆनि कांटा फेडितां । जेवीं निवारे निजव्यथा । एवीं संगें संगातें छेदितां । सात्त्विक कर्ता असंगी ॥ ४६ ॥ सद्गुरुचरणसत्संगें । सकळ संग छेदी विरागें । सात्त्विक कर्ता निजांगें । विषयसंगें असंगी ॥ ४७ ॥ फळाभिलाषेच्या चित्तीं गांठी । तेणें अंध झाली विवेकदृष्टी । राजस कर्ता फळशेसाठीं । अतिदुःखकोटी स्वयें सोशी ॥ ४८ ॥ निःशेष हारपे विवेकज्ञान । स्मृति सैरा वळघे रान । नाठवे कार्य कारण । ऐसा कर्ता जाण तामस ॥ ४९ ॥ अनन्य भावें हरीसी शरण । कर्माचळक श्रीनारायण । कदा न धरी कर्माभिमान । हा कर्ता निर्गुण निश्चयें ॥ ३५० ॥ त्रिगुणांची श्रद्धा त्रिविध । निर्गुणाची श्रद्धा शुद्ध । येच अर्थींचें विशद । स्वयें गोविंद सांगत ॥ ५१ ॥ सात्त्विकयाध्यात्मिकी श्रद्धा कर्मश्रद्धा तु राजसी । तामस्यधर्मे या श्रद्धा मत्सेवायां तु निर्गुणा ॥ २७ ॥ देह इंद्रिय चेतना प्राण । येणेंसीं स्फुरे जें मीपण । तेथ विवेक करूनियां पूर्ण । आपुलें मीपण आपण पाहे ॥ ५२ ॥ देह नव्हें मी जडमूढत्वें । इंद्रियें नव्हें मे एकदेशित्वें । प्राण नव्हें मी चपळत्वें । मन चंचळत्वें कदा मी नव्हे ॥ ५३ ॥ चित्त नव्हें मी चिंतकत्वें । बुद्धि नव्हे मी बोधकत्वें । ‘अहं’ नव्हें मी बाधकत्वें । मी तों येथे अनादिसिद्ध ॥ ५४ ॥ एवं मीपणाचें निजसार । विवंचूं जाणे बुद्धिचतुर । ते अध्यात्मश्रद्धा उदार । सात्त्विक नर सदा वाहती ॥ ५५ ॥ जें जें मी नव्हें म्हणत जाये । तें मी देखल्या मीचि आहें । माझ्या मीपणाचे वंदिल्या पाये । मीचि मी ठायें कोंदोनी ॥ ५६ ॥ हे आध्यात्मिकी शुद्ध श्रद्धा । सात्त्विकापाशीं वसे सदा । आतां राजसाची श्रद्धा । ऐक प्रबुद्धा सांगेन ॥ ५७ ॥ मी एक येथें वर्णाश्रमी । मी एक येथें आश्रमधर्मीं । मी एक येथें कर्ता कर्मीं । हें मनोधर्मीं दॄढ मानी ॥ ५८ ॥ येणें भावार्थें कर्मतत्परू । कुशमृत्तिकेचा अत्यादरू । अतिशयें वाढवी शौचाचारू । विधिनिषेधां थोरू आवर्त भोंवे ॥ ५९ ॥ दोषदृष्टीच्या रंगणीं । मिरवती गुणदोषांच्या श्रेणी । पवित्रपणाच्या अभिमानीं । ब्रह्मयासी न मनी शुचित्वें ॥ ३६० ॥ देहाभिमान घे‌ऊनि खांदा । सत्य मानणें कर्मबाधा । ते हे राजसाची कर्मश्रद्धा । जाण प्रबुद्धा उद्धवा ॥ ६१ ॥ अधिक अविवेक वाढे । जेणें अकर्म अंगीं घडे । अधर्माची जोडी जोडे । हे श्रद्धा आवडे तामसी ॥ ६२ ॥ जेथ अपेयाचें पान । स्वेच्छा अभक्ष्यभक्षण । अगम्यादि घडे गमन । हे श्रद्धा संपूर्ण तामसी ॥ ६३ ॥ अधर्म तोचि मानी धर्म । हें तामसी श्रद्धेचें वर्म । आतां निर्गुणश्रद्धा परम । उत्तमोत्तम ते ऐक ॥ ६४ ॥ सर्व भूतीं भगवंत । ऐशिये श्रद्धे श्रद्धावंत । अनन्य भावें भूतां भजत । तो भजनभावार्थ निर्गुण ॥ ६५ ॥ स्त्री पुत्र वित्त जीवित । मजलागीं कुरवंडी करित । अनन्य भावें जे मज भजत । ते श्रद्धा निश्चित निर्गुण ॥ ६६ ॥ चारी पुरुषार्थ त्यागिती । उपेक्षूनि चारी मुक्ती । ऐक्यभावें मज भजती । ते श्रद्धासंपत्ती निर्गुण ॥ ६७ ॥ निष्काम नामस्मरण । निर्लोभ हरिकीर्तन । भावार्थें जें जें भजन । ते श्रद्धा निर्गुण उद्धवा ॥ ६८ ॥ त्रिगुणांचा त्रिविध आहारू । स्वयें सांगे शार्ङ्गधरू । निर्गुण आहाराचा प्रकारू । सखोल विचारू हरि सांगे ॥ ६९ ॥ पथ्यं पूतमनायस्तमाहार्यं सात्त्विकं स्मृतम्‌ । राजसं चेन्द्रियप्रेष्ठं तामसं चार्तिदाशुचि ॥ २८ ॥ पवित्र आणि हळुवार । सत्त्ववृद्धीसी हितकर । अप्रयासीं प्राप्ति साचार । सात्त्विक आहार या नांव ॥ ३७० ॥ अल्पाहार या नांव पथ्य । पवित्र म्हणिजे धर्मार्जित । तेंही अप्रयासानें प्राप्त । तो जाण निश्चित सात्त्विकाहार ॥ ७१ ॥ गोड खरपूस आंबट । तळींस घोळींव तिखट । चिरींव चोळींव तुरट । वळींव वळिवट आळिलें ॥ ७२ ॥ रसीं रसांतरमिळणी । पन्हीं कालवणीं शिखरिणी । कुडकुडीं निर्पूस सणाणी । आहारभरणी राजस ॥ ७३ ॥ नाना परींच्या आवडी । सडिवा सोलिवा परवडी । रसनासुखाची अतिगोडी । तो आहार निरवडी राजस ॥ ७४ ॥ नाना परींचे आयास । करूनि अतिप्रयास । आयास सेविती राजस । ऐक तामस भोजन ॥ ७५ ॥ सेवितां दुर्गंधि उन्मादक । परिपाकें करे मूर्ख । अशुचि आणि द्‌ःखदायक । हा आहार देख तामस ॥ ७६ ॥ भगवंताचा भुक्तप्रमाद । साधुसज्जनांचें शेष शुद्ध । हा निर्गुण आहार प्रसिद्ध । ‘च’ कारें गोविंद बोलिला ॥ ७७ ॥ ग्रासोग्रासीं गोविंद । येणें स्मरणें अन्न शुद्ध । हा निर्गुण आहार प्रसिद्ध । ‘च’ कारें गोविंद बोलिला ॥ ७८ ॥ ‘अन्नं ब्रह्म अहं च ब्रह्म’ । पंक्तीकर तोही ब्रह्म । ऐसा ज्याचा भोजनानुक्रम । तो आहार परम निर्गुणत्वें ॥ ७९ ॥ त्रिगुणांचें त्रिविध सुख । निर्गुण सुख अलोलिक । त्याही सुखा‌आ परिपाक । यदुनायक स्वयें सांगे ॥ ३८० ॥ सात्त्विकं सुखमात्मोत्थं तु राजसम्‌ । तामसं मोहदैन्योत्थं निर्गुणं मदपाश्रयम्‌ ॥ २९ ॥ सांडूनि विषयसुखाची स्फूर्तीं । आत्मसुखें सुखाचे चित्तवृत्ती । ऐशिया निजसुखाची प्राप्ती । तें सुख निश्चितीं सात्त्वेक ॥ ८१ ॥ गंगापूर भरे उन्नतीं । येणें अमर्याद वोत भरती । तेवीं आत्मसुखाचिये प्राप्ती । इंद्रियां तृप्ती स्वानंदें ॥ ८२ ॥ नाना विषयांचें कोड । इंद्रियांचा अतिधुमाड । विषयसुख लागे गोड । तें सुख सुदृढ राजस ॥ ८३ ॥ अतिनिंद्य आणि उन्मादी । तेंचि सुख आवडे बुद्धी । तामस सुखाची हे सिद्धी । जाण त्रिशुद्धी उद्धवा ॥ ८४ ॥ हृदयीं प्रकटल्या माझी मूर्ती । विसरे संसाराची स्फूर्ती । त्यावरी जे होय सुखप्राप्ती । तें सुख निश्चितीं निर्गुण ॥ ८५ ॥ सर्व भूतीं वसे भगवंत । तोचि मी हा तात्त्विकार्थ । ऐसेनि मदैक्यें सुखप्राप्त । तो निजसुखार्थ निर्गुण ॥ ८६ ॥ देखिल्या निजात्मसुखस्वरूप । स्वयें हो‌इजे सुखरूप । हे निर्गुणसुखाचे निजदीप । झडल्या पुण्यपाप पाविजे ॥ ८७ ॥ आपण सुखस्वरूप सर्वांगीं । सुखस्वरूप स्वयें भोगी । हे निर्गुण सुखाची मागी । भक्तीं अंतरंगीं भोगिजे ॥ ८८ ॥ कल्पांताचें पूर्ण भरितें । उरों नेदी नदीनदांतें । तेवीं निर्गुण सुख येथें । देहेंद्रियांतें उरो नेदी ॥ ८९ ॥ जेवीं मृगजळीं जळ नाहीं । तेवीं परब्रह्माच्या ठायीं । प्रपंच स्पर्शिलाचि नाहीं । तें सुख निर्वाहीं निर्गुण ॥ ३९० ॥ ज्या सुखासी मर्यादा । करितां न करवे कदा । सुखें सुखस्वरूप हो‌इजे सदा । हे सुखसंपदा निर्गुणा ॥ ९१ ॥ त्रिगुण आणि निर्गुण । यांचें दाविलें भेदलक्षण । आतां त्याचें उपसंहरण । ग्रंथांती जाण हरि करि ॥ ९२ ॥ द्रव्यं देश फलं कालो ज्ञानं कर्म च कारकः । श्रद्धावस्थाऽऽकृतिर्निष्ठा त्रैगुण्यः सर्व एव हि ॥ ३० ॥ द्रव्यशब्दें आहार त्रिविध । देशशब्दें वनग्रामभेद । फळशब्दें सुख‍उद्धोध । सत्त्वसंबंध विभागें ॥ ९३ ॥ काळशब्दें भगवद्भजन । कैवल्यनिष्ठा या नांव ज्ञान । कर्म म्हणिजे मदर्पण । कर्ता तो जाण असंगीं ॥ ९४ ॥ श्रद्धाशब्दें आध्यात्मिके । अवस्थाशब्दें जागरणादिकी । आकृतिशब्दें उपरिलोकीं । देवतादिकीं क्रीडन ॥ ९५ ॥ जो गुण वाढे देहांतीं । जेणें गुणें होय अंतःस्थिती । त्या नांव निष्ठा म्हणती । जाण निश्चतीं उद्धवा ॥ ९६ ॥ भिन्न भिन्न भाग अनेक । किती सांगूं एकेक । अवघें जगचि त्रिगुणात्मक । जाण निष्टंक निजभक्ता ॥ ९७ ॥ संसार समस्त त्रिगुण । यांमाजीं मी अवघा निर्गुण । हे तुज कळावया निजखूण । गुणानिरूपण म्यां केलें ॥ ९८ ॥ सर्वे गुणमया भावाः पुरुषाव्यक्तधिष्ठिताः । दृष्टं श्रुतमनुध्यातं बुद्धया व पुरुषर्षभ ॥ ३१ ॥ देखिजे अथवा ऐकिजे । कां मनें जें जें चिंतिजे । तें तें अवघेंचि जाणीजे । मायागुणकाजें त्रिगुणात्मक ॥ ९९ ॥ करावया त्रिगुणांचें मर्दन । प्रकृतिनियंता पुरुष भिन्न । तो सर्वदा सर्वांगें निर्गुण । वर्तवी गुण निजसत्ता ॥ ४०० ॥ पुरुषावेगळें समस्त । प्रकृतिकार्य मिथ्याभूत । त्यातें बोलिजे गुणवंत । जाण निश्चित उद्धवा ॥ १ ॥ नरदेह पावोनियां येथ । जे न साधिती गुणातीत । ते नाडले हातोहात । निजस्वार्थ बुडाला ॥ २ ॥ तैसी नव्हे तुझी मती । विनटलासी भगवद्भक्ती । तेव्हांचि तों गुणातीतीं । जाण निश्चितीं जडलासी ॥ ३ ॥ हरिभक्तांमध्यें वरिष्ठ । यालागीं निजमुखॆं वैकुंठ । उद्धवासी म्हणे पुरुषश्रेष्ठ । भाग्यें उत्कृष्ट तूं एक ॥ ४ ॥ त्रिगुणगुणीं सविस्तारू । दृढ वाढला संसारतरू । त्याचे छेदाचा कवण प्रकारू । तो शार्ङ्गधरू सांगत ॥ ५ ॥ एताः संसृतयः पुंसो गुणकर्मनिबन्धनाः । येनेमे निर्जिताः सौम्य गुणा जीवेन चित्तजाः । भक्तियौगेन मन्निष्ठो मद्भावाय प्रपद्यते ॥ ३२ ॥ सत्त्वादि तिन्ही गुण एथ । केवळ आणी मिश्रित । पुरुषातें संसारी करीत । गुणकर्मीं निश्चित बांधोनी ॥ ६ ॥ त्रिगुणकर्मांस्तव जाण । जीवासी झालें दृढ बंधन । जेवीं घटामाजील जीवन । दावी आडकलेपण रविबिंबा ॥ ७ ॥ घटीं भरल्या समळ जळ । त्यामाजीं रवि दिसे समळ । घटींचें डोलतांचि जळ । कापें चळचळ रविबिंब ॥ ८ ॥ तेवीं त्रिगुणांचें कर्माचरण । शुद्धासी आणी जीवपण । तें छेदावया जीवबंधन । भगवद्भजन साधावें ॥ ९ ॥ जितावया गुणबंधन । रिघावें सद्गुरूसी शरण । तेथ मद्भावें करितां भजन । वाढे सत्त्वगुण अतिशुद्ध ॥ ४१० ॥ पायीं जडली लोहाची बेडी । ते लोहेंचि लोहार तोडी । तेवीं सत्त्वगुणाचिया वाढी । त्रिगुणांतें तोडी गुरुरावो ॥ ११ ॥ तेथ प्रवेशावया गुणातीतीं । अवश्य करावी गुरुभक्ती । जे गुरुभजनीं विश्वासती । त्यांसी चारी मुक्ती आंदण्या ॥ १२ ॥ ज्यासी गुरुचरणीं भगवद्भावो । त्याचे सेवेसी ये ब्रह्मसद्भावो । तेथ ब्रह्मसद्भावेंसी पहा हो । मी देवाधिदेवो सबाह्य तिष्ठें ॥ १३ ॥ जो गुरुचरणीं अनन्य शरण । तो सहजें होय ब्रह्मसंपन्न । गुरुरूपें करितां माझें भजन । ब्रह्मसमाधान मद्भक्ता ॥ १४ ॥ उद्धवा ऐसें माझें भजन । समूळ जाणशी तूं संपूर्ण । यालागीं ‘सौम्य’ हें विशेषण । स्वमुखें श्रीकृष्ण संबोधी ॥ १५ ॥ भाग्यें नरदेह पावल्या जाण । अवश्य करावें माझें भजन । येचि अर्थींचें निरूपण । स्वमुखें श्रीकृष्ण प्रतिपादी ॥ १६ ॥ तस्माद्देहमिमं लब्ध्वा ज्ञानविज्ञानसम्भवम्‌ । गुणसङ्ग विनिर्धूय मां भजन्तु विचक्षणाः ॥ ३३ ॥ ज्या नरदेहाकारणें । अमर उत्कंठित मने । त्या देहाचे जाहलेपणें । ज्ञान पावणें निष्टंक ॥ १७ ॥ नरदेह पावल्या जाण । आपणचि नव्हे ब्रह्मज्ञान । तेथें करावें माझें भजन । देहाभिमान सांडूनि ॥ १८ ॥ करितां माझें अनन्य भजन । सहजें वाढे सत्त्वगुण । सत्त्वगुणास्तव जाण । उपजेज्ञान सविवेक ॥ १९ ॥ विवेकज्ञानाचिये वृत्ती । रज तम दोनी झडती । शोधितसत्त्वाचिये स्थिती । अभेद भक्ती उल्हासे ॥ ४२० ॥ करितां माझें अभेद भजन । होय स्वानंदाचे स्वादन । त्या नांव बोलिजे विज्ञान । तेथ तिनी गुण मिथ्यात्वें ॥ २१ ॥ नरदेह जोडलिया हातीं । प्राण्यासी एवढी प्राप्ती । यालागीं मनुष्यदेहीं भक्ती । अवश्य समस्तीं करावी ॥ २२ ॥ हें भागवतींचें अतिगुह्य ज्ञान । मुख्यत्वेंसी भक्तिप्राधान्य । भावें करितां माझें भजन । स्त्रिया शूद्रजन उद्धरती ॥ २३ ॥ नरदेह जोडल्या जाण । माझी भक्ति करिती विचक्षण । भजनें जिणोनि गुणागुण । ब्रह्म परिपूर्ण स्वयें होती ॥ २४ ॥ पूर्ण ब्रह्माचिया प्राप्ती । निरपेक्ष माझी भक्ती । तोचि भजनभाव श्रीपती । पुनः पुनः श्लोकार्थीं दृढ दावी ॥ २५ ॥ निःसङ्गो मां भजेद्विद्वानप्रमत्तो जितेन्द्रियः । रजस्तमश्चाभिजयेत्सत्त्वसंसेवया मुनिः ॥ ३४ ॥ सत्त्वं चाभिजयेद्युक्तो नैरपेक्ष्येण शान्तधीः । करूनि विषयांची विरक्ती । हृदयीं नापेक्षावी मुक्ती । ऐशी निरपेक्ष माझी भक्ती । वाढत्या प्रीतीं करावी ॥ २६ ॥ तेणें अनिवार सत्त्वशुद्धी । सर्व भूतीं भगवद्बुद्धी । दृढ वाढे गा त्रिशुद्धी । हे भजनसिद्धी साधकां ॥ २७ ॥ ऐसें करितां माझें भजन । विस्मरणासी ये मरण । सर्वेंन्द्रियीं सावधपण । सहजें जाण ठसावे ॥ २८ ॥ तेव्हां रज तम दोनी गुण । निःशेष जाती हारपोन । शुद्धसत्त्वाचें स्फुरण । तेणें स्वानंद पूर्ण साधकां ॥ २९ ॥ केवळ उरल्या सत्त्वगुण । साधकां ऐसें स्फुरे स्फुरण । जगामाजीं एक पावन । धन्य धन्य मी होयें ॥ ४३० ॥ मी पावलों शुद्ध बोध । मज प्रकटला परमानंद । ऐसा सुखाचा जो स्फुंद । तो सत्त्वबोध साधकां ॥ ३१ ॥ ऐसा उरला जो सत्त्वगुण । तो निवारावया साधन कोण । मी स्वयें सुखस्वरूप आपण । मज सुखाचें स्फुरण ते माया ॥ ३२ ॥ गूळ गोडपणें पांगे । कीं दुधा दूध गोड लागे । तैसा सुखरूप मी सर्वांगें । वृथा सुखभोगें कां फुंजें ॥ ३३ ॥ ऐशी साधकीं स्फूर्ति स्फुरे । तंव सत्त्वगुण स्वरूपीं विरे । तेव्हां सुखाचाही फुंद सरे । निजसुख उरे निजशांती ॥ ३४ ॥ ऐसे निवारल्य तिनी गुण । केवळ उरे निर्गुण । तेचि अर्थींचे निरूपण । विशद श्रीकृष्ण सांगत ॥ ३५ ॥ संपद्यते गुणैर्मुक्तो जीवो जीवं विहाय माम्‌ ॥ ३५ ॥ जीवो जीवविनिर्मुक्तो गुणैश्चाशयसम्भवैः । वाढल्या सत्त्वगुणाचा हरिख । त्यातें निर्दळी शुद्ध सत्त्वविवेक । पाठीं विवेकेंसीं सत्त्व देख । हारपे निःशेख निजात्मरूपीं ॥ ३६ ॥ ऐसे निमाल्या तिनी गुण । निमे कार्य कर्म कारण । लिंगदेह नाशे संपूर्ण । जीवासी जीवपण मिथ्या होय ॥ ३७ ॥ तेव्हा कार्य कर्म कर्ता । भोग्य भोग आणि भोक्ता । ज्ञान ज्ञेय मी एक ज्ञाता । याची वार्ता असेना ॥ ३८ ॥ ऐसें हारपल्या जीवपण । स्वयें सहजें निजनिर्गुण । हो‍ऊनि ठाके ब्रह्म पूर्ण । अहंसोहंपण सांडूनि ॥ ३९ ॥ यापरी मद्भक्त जाण । ब्रह्म होती परिपूर्ण । तेंचि जाहलेपणाचें लक्षण । श्लोकार्धें श्रीकृष्ण सांगत ॥ ४४० ॥ मयैव ब्रह्मणा पूर्णो न बहिर्नान्तरश्चरेत्‌ ॥ ३६ ॥ इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायामेकादास्कन्धे पञ्चविंशोऽध्यायः ॥ २५ ॥ प्रपंच एक पूर्वीं होता । हे समूळ मिथ्या वार्ता । पुढें हो‌ईल मापुता । हेंही सर्वथा असेना ॥ ४१ ॥ जैसे आंत बाहेरी भाग । नेणे साखरेचें अंग । तैसें सबाह्याभ्यंतर चांग । ब्रह्म निर्व्यंग निजानंदें ॥ ४२ ॥ ऐसें पावल्या ब्रह्म परिपूर्ण । साधकासी न ये मरण । प्रारब्धें देहीं उरल्या जाण । देहाभिमान बाधीना ॥ ४३ ॥ बाह्य न देखे दृश्यदर्शन । अंतरीं नाहीं विष्यस्फुरण । देहींचें न देखे देहपण । जीवन्मुक्तलक्षण या नांव ॥ ४४ ॥ बाह्य देखे दृश्यप्रतीती । अंतरीं विषयांची आसक्ती । या नांव अज्ञानाची स्थिती । अविद्याशक्ती बाधक ॥ ४५ ॥ तें निरसावया अविध्याबंधन । अवश्य करावें माझें भजन । हें जाणोनी साधुसज्जन । भक्तीसी प्राण विकिला ॥ ४६ ॥ माझिये भक्तीपरती । आणिक नाहीं उत्तम गती । तेंही भजन अभेदयुक्तीं । तैं चारी मुक्ती कामाऱ्या ॥ ४७ ॥ हृदयीं विषयाची विरक्ती । वरी अभेदभावें माझी भक्ती । तें भजन अनन्य प्रीतीं । त्याचा मी श्रीपती आज्ञाधार ॥ ४८ ॥ भक्तिनामाचा इत्यर्थ । माझे स्वरूपीं निजभावार्थ । येणेंचि लाभे परमार्थ । सुफळ शास्त्रार्थ या नांव ॥ ४९ ॥ माझिये भक्तीचेनि नांवें । पशु पक्षी उद्धरावे । मा मानवी भजनभावें । म्यां अवश्य न्यावे निजधामा ॥ ४५० ॥ यालागीं सांडोनि व्युत्पत्ती । जाणतीं नेणतीं गा समस्तीं । भावें करावी भगवद्भक्ती । तैं निजात्मप्राप्ती अनायासें ॥ ५१ ॥ भावें करितां माझें भजन । स्वयें निर्दळती तिन्ही गुण । सहजें प्रकटे निजनिर्गुण । हें सत्य श्रीकृष्ण बोलिला ॥ ५२ ॥ जेथ उगवली गुणगुंती । तेथ प्रकटे निजशांती । हेंचि ये अध्यायीं श्रीपती । उद्धवाप्रती बोलिला ॥ ५३ ॥ यालागीं जेथ भगवद्भक्ती । तेथ गुणजयो लाभे वॄत्ती । सहजें प्रकटे निजशांती । निजात्मप्राप्ती स्वतःसिद्ध ॥ ५४ ॥ ते निजभक्ती माझी जननी । ज्या पैठा केलों जनार्दनचरणीं । एका जनार्दनचरणीं । मिळोनि मिळणीं भजतचि ॥ ५५ ॥ पुढिले अध्यायीं कथा गहन । ऐल‍उर्वशी‌उपाख्यान । ज्या अध्यायाचें करितां पठण । अगम्यागमनदोष हरती ॥ ५६ ॥ ज्या पुरूरव्याची विरक्ती । स्वमुखें वर्णील श्रीपती । वैराग्यें निजात्मप्राप्ती । सभाग्य पावती वैराग्य ॥ ५७ ॥ त्या वैराग्याचें निरूपण । अतिगोड निरूपी श्रीकृष्ण । श्रोतां कृपा करावी पूर्ण । द्यावें अवधान कथेसी ॥ ५८ ॥ जे कथेचेनि अवधानें अवधानें । दुरितदोष होती दहनें । ब्रह्मीं ब्रह्मत्व पावणें । हो‍ऊनि ठाकणें चिन्मात्र ॥ ५९ ॥ एवढ्या निरूपणाची गोडी । पुढिले अध्यायीं आहे फुडी । एका जनार्दनकृपा गाढी । परापरथडीप्रापक ॥ ४६० ॥ भावें धरितां जनार्दनचरण । बांधू न शके बाधकपण । एक जनार्दना शरण । रसाळ निरूपण पुढें आहे ॥ ४६१ ॥ इति श्रीभागवते महापुराणे एकादशस्कंधे श्रीकृष्णोद्धवसंवादे गुणनिर्गुणनिरूपणं नाम पंचविंशोऽध्यायः ॥ २५ ॥ ॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ ॥ श्लोक ॥ ३६ ॥ ओव्या ॥ ४६१ ॥

Contribute to Sant Shri Eknath Maharaj Mission

You can donate to the bank account given below

Name of Account Holder:
Shantibrahma Shri Eknath Maharaj Mission, Paithan
Current Account No:
00000036694177969
Bank Name:
State Bank Of India
IFSC Code:
SBIN0003796
Branch:
Bhaji Market, Paithan

Scan to donate

Donate QR

Merchant Name : Sant Eknath Mission

UPI ID : santeknathmission@sbi

logoseperator

Contact Info :

Shantibrahma Shri Eknath Maharaj Mission,

C/O Shri Venimadhav Gosavi,
ShriNath Galli, Shrikshetra Paithan, Dist. Chhatrapati
Sambhajinagar
Pin. 431006

callMobile No : +91 - 9421411135

emailEmail : info@santeknath.org