Marathi / English

अध्याय २६

॥ श्री एकनाथी भागवत ॥

अध्याय सव्विसावा

श्रीगणेशाय नमः ॥ श्रीकृष्णाय नमः ॥ ॐ नमो देव जगन्मोहन । मोहिनेमोहना आद्यकारण । कार्यकारणातीत चिद्धन । जय जनार्दन जगद्गुरू ॥ १ ॥ जगासी पडे मायामोहन । तें तूं निर्दळिसी ज्ञानघन । जगीं जगद्रूप जनार्दन । कृपाळू पूर्ण दीनांचा ॥ २ ॥ दीनासी देवमाया स्त्रीरूपें । भुलवी हावभावखटाटोपें । तें स्त्रीमोहादि मोहक रूपें । जनार्दनकृपें निर्दळिती ॥ ३ ॥ जेथ वैराग्य वाढे संपूर्ण । तेथ जनार्दनाची कृपा पूर्ण । वैराग्य तेथ ब्रह्मज्ञान । सहजें जाण ठसावे ॥ ४ ॥ जीव सहजें ब्रह्मचि आहे । तो मायागुणें जीवत्व वाहे । जेवीं भद्रीं जिजेलेनि रायें । तो स्वप्नींचें लाहे रंकत्व ॥ ५ ॥ त्यासी राजपदा यावया जाण । सेवक करिती थापटण । तेवीं वैराग्य निर्दळी त्रिगुण । जीवा ब्रह्मपण स्वयंभचि ॥ ६ ॥ ऐसें स्वयंभ जोडल्या ब्रम्ह पूर्ण । तेव्हा स्त्री पुरुष हें मिथ्या ज्ञान । मृषा दृश्याचें दृश्यभान भोग्यभोक्तेपण असेना ॥ ७ ॥ असो साधकासी देवमाया । स्त्रीरूपें ये भुलवावया । तेथ स्मरतां भावें गुरुराया । जाय विलया स्त्रीबाधू ॥ ८ ॥ सद्गुरूचें निजनाम एक । निवारी बाधा महादोख । वैराग्य उपजवी अलोलिक । तेणें होय निजसुख साधकां ॥ ९ ॥ निर्विशेष निजसुखदाता । आम्हां सद्गुरूचि तत्त्वतां । त्याचे चरणीं ठेवितां माथा । सुखसंपन्नता साधकां ॥ १० ॥ संत साधकांची निजमा‌उली । शांति निजसुखाची सा‌उली । जनार्दनकृपेच्या पा‌उलीं । कथा चालिली यथार्थ ॥ ११ ॥ हाता आलिया निजनिर्गुण । साधक होती सुखसंपन्न । तदर्थ करावें माझें भजन । हें बोलिला श्रीकृष्ण पंचविसावां ॥ १२ ॥ भावें करितां भगवद्भजन । देव दारारूपें करिती विघ्न । तें निर्दळावया जाण । माझें नामस्मरण करावें ॥ १३ ॥ अच्युत हें स्मरतां नाम । प्रतापें निर्दळी कर्माकर्म । सकळ पातकें करी भस्म । दाटुगें नाम हरीचें ॥ १४ ॥ नामें हो‌इजे विरक्त । नामें निर्मळ होय चित्त । नामें सधे गुणातीत । नामें निर्मुक्त भवपाश ॥ १५ ॥ नामीं लोलिंगत चित्त । भवभय रिघों न शके तेथ । नामीं विश्वास ऐसा जेथ । भगवंत तेथ तुष्टला ॥ १६ ॥ दुष्टसंगें विष्यासक्त । जरी झाला लोलिंगत । अनुताप उपजलिया तेथ । होय विरक्त क्षणार्धें ॥ १७ ॥ महादोषासी प्रायश्चित्त । केवळ अनुताप निश्चित । अनुतापेंवीण प्रायश्चित्त । जाण एथ विटंबू ॥ १८ ॥ अनुतापा‌एवढा सखा । जगीं आणिक नाहीं लोकां । धडाडिल्या अनुताप देखा । सकळ पातकां निर्दळी ॥ १९ ॥ अनुतापा चढलिया हात । क्षणार्धें करी विरक्त । येचि अर्थीं ऐलगीत । हरि सांगत उद्धवा ॥ २० ॥ सव्विसाव्या अध्यायीं येथ । विषयासक्त ज्याचें चित्त । त्यासी व्हावया विरक्त । ऐलगीतप्रस्तावो ॥ २१ ॥ श्रीभगवानुवाच - मल्लक्षणमिमं कायं लब्ध्वा मद्धर्म आस्थितः । आनन्दं परमात्मानमात्मस्थं समुपैति माम्‌ ॥ १ ॥ ब्रह्म लक्षिजे परिपूर्ण । हेंचि कायेचें मुख्य लक्षण । तें हें मानवी शरीर जाण । परम पावन तिहीं लोकीं ॥ २२ ॥ मनुष्यदेहीं अधर्म । करितां नातुडे परब्रह्म । तेथ करावे भागवतधर्म । जे कां परम पावन ॥ २३ ॥ भागवतधर्में करितां भक्ती । निर्मळ होय चित्तवृत्ती । जीव तोचि ब्रह्म निश्चितीं । ऐशी शुद्ध स्फूर्ती ठसावे ॥ २४ ॥ ठसावल्या ब्रह्मस्फूर्ती । होय स्वानंदाची अवाप्ती । तेणें परमानंदीं लीन होती । हे शुद्धप्राप्ती पैं माझी ॥ २५ ॥ माझिये प्राप्तीचें लक्षण । देहीं असतां वर्तमान । सर्वथा नाहीं विषयस्फुरण । तेंचि निरूपण हरि सांगे ॥ २६ ॥ गुणमय्या जीवयोन्या विमुक्तो ज्ञाननिष्ठया । गुणेषु मायामात्रेषु दृश्यमानेष्ववस्तुतः । वर्तमानोऽपि न पुमान्‌ युज्यतेऽवस्तुभिर्गणैः ॥ २ ॥ जे मूळ अज्ञानाची खाणी । जे संसारप्रवाहाची श्रेणी । जे तिहीं गुणांची जननी । माया राणी अनादि ॥ २७ ॥ मायागुणयोगें पहा हो । सोळा कळांचा संभवो । तो वासनात्मक लिंगदेहो । जीवासी पहा हो दृढ झाला ॥ २८ ॥ ज्या लिंगदेहाचिये प्राप्ती । भोगी नाना सुखदुःखसंपत्ती । पडे स्वर्गनरक‍आवर्तीं । मिथ्यामरनपंक्ती स्वयें सोशी ॥ २९॥ वंध्यापुत्राचा घराचार । तैसा जीवासी संसार । देहाभिमानें केला थोर । अपरंपार अनिवार्य ॥ ३० ॥ तेथ गुरुवाक्यें ज्ञानानुभावो । पाहतां मायेचा अभावो । लिंगदेह झाला वावो । जीवा जीवभावो तो मिथ्या ॥ ३१ ॥ जेवीं उगवलिया गभस्ती । अंधारेंसीं हारपे राती । तेवीं गुरुवाक्यें ज्ञानप्राप्ती । मायेची स्थिती मावळे ॥ ३२ ॥ एवं नासल्या गुणविकार । जीवन्मुक्त होती नर । जेवीं कां कुलालचक्र । भंवे साचार पूर्वभ्रमणें ॥ ३३ ॥ तेवीं प्रारब्धशेषवृत्तीं । ज्ञाते निजदेहीं वर्तती । वर्ततांही देहस्थिती । देह‍अहंकृती असेना ॥ ३४ ॥ जेवीं कां छाया आपुली । कोणीं गांजिली ना पूजिली । परी कळवळ्याची न ये भुली । तेवीं देहींची चाली सज्ञाना ॥ ३५ ॥ तो देहाचेनि दैवमेळें । जरी विषयांमाजीं लोळे । परी विकाराचेनि विटाळें । वृत्ति न मैळे अणुमात्र ॥ ३६ ॥ त्यासी विषयांचें दर्शन । समूळत्वें मिथ्या जाण । करितां मृगजळाचें पान । करा वोलेपण बाधीना ॥ ३७ ॥ गगनकमळांचा आमोद । जैं भ्रमर सेवी सुगंध । तैं सज्ञाना विषयसंबंध । निजांगीं बाध लागतां ॥ ३८ ॥ असो अतर्क्य मुक्तांची स्थिती । परी मुमुक्षांलागीं श्रीपती । नियमाची यथानिगुती । निजात्मप्राप्तीलागीं सांगे ॥ ३९ ॥ सङ्ग न कुर्यादसतां शिश्नोदरतृपां क्वचित्‌ । तस्यानुगस्तमस्यन्धे पतत्यन्धानुगान्धवत्‌ ॥ ३ ॥ शिश्नोदरार्थ आसक्त । स्वधर्मत्यागें अधर्मरत । ऐसे जे विषयासक्त । ते जाण निश्चित असाधू ॥ ४० ॥ ऐसे जे असाधू जन । त्यांसीं सर्वथा आपण । संगती न करावी जाण । कायावाचामनःपूर्वक ॥ ४१ ॥ वोढाळेचे संगतीं पाहें । क्षणभरीं गेलिया धर्मगाये । त्या क्षणसाठीं पाहें । लोढणें वाहे निरंतर ॥ ४२ ॥ यालागीं दुर्जनाची संगती । क्षणार्धें पाडी अनर्थीं । मुमुक्षीं ऐशियाप्रती । अणुमात्र वस्ती न वाचावें ॥ ४३ ॥ लोहाराची आगिठी जैसी । सहजें पोळी भलत्यासी । दुर्जनाची संगति तैशी । पाडीं अपभ्रंशीं भाविकां ॥ ४४ ॥ अवचटें असाधुसंगती । जोडल्या वाढे विषयासक्ती । तेणें उठी अधर्मरती । विवेक-स्फूर्तिघातक ॥ ४५ ॥ मावळल्या विवेकवृत्ती । अंध होय ज्ञानस्फूर्ती । आपण आपली न देखे गते । जेवीं आभाळीं राती अंवसेची ॥ ४६ ॥ जेवीं अंधें अंध धरिल्या हातीं । दोघां पतन महागर्ती । तेवीं अविवेकाचिया स्थितीं । अंधतमा जाती विषयांध ॥ ४७ ॥ कुसंगाचा जो सांगत । तेणें वोढवें नरकपात । अनुताप सोडविता तेथ । तें ‘ऐलगीत’ हरि सांगे ॥ ४८ ॥ ऐलः सम्राडिमां गाथामगायत बृहच्छ्रवाः । उर्वशीविरहान्मुह्यन्निर्विण्णः शोकसंयमे ॥ ४ ॥ समुद्रवलयांकित क्षिती । सकळ रायांचा राजपती । पुरूरवा चक्रवर्ती । ज्याचे ख्याती पुराणीं ॥ ४९ ॥ तेज प्रभाव महाशौर्य । उचित वदान्य गांभीर्य । महिमा महती अतिवीर्य । धर्मधैर्य पुरूरवा ॥ ५० ॥ राजधर्माचिया नीतीं । स्वधर्में प्रतिपाळी क्षिती । ब्राह्मण तितुका ब्रह्ममूर्ती । हा भाव निश्चितीं रायाचा ॥ ५१ ॥ प्राणान्तेंही आपण्‌ । न करी ब्राह्मणहेळपण । गा‌ईलागीं वेंची प्राण । करी संरक्षण दीनाचें ॥ ५२ ॥ ऐसा धार्मिक ऐल-चक्रवर्ती । तोही उर्वशीचे आसक्तीं । भुलोनि ठेला भूपती । निजात्मगती विसरला ॥ ५३ ॥ तेणें अनुतापें गा‌इली गाथा । ते तुज मी सांगेन आतां । परी त्याची पूर्वकथा । कामासक्तता ते ऐक ॥ ५४ ॥ विसरोनि निजमत्त्वासी । अतिदीन झाला वेश्येसी । काम पिसें लावी मनुष्यासी । तें ऐल-इतिहासीं हरि सांगे ॥ ५५ ॥ ऐल-उर्वशीकामासक्ती । सवेंचि अनुतापें विरक्ती । हे कथा बोलिली वेदोक्तीं । तेचि यदुपति स्वयें सांगे ॥ ५६ ॥ उर्वशीपुरूरव्याचा संबंध । नवम स्कंधीं असे विशद । तेणें जाणोनियां गोविंद । एथ कथा‌अनुवाद न करीच ॥ ५७ ॥ पूर्वकथासंबंधः ॥ उर्वशी स्वर्गभूषण । नारायणें धाडिली आपण । तो उर्वशीसी गर्व पूर्ण । श्रेष्ठपण मानूनी ॥ ५८ ॥ तया गर्वाचिये स्थिती । ताल चुकली नृत्यगतीं । तेणें ब्रह्मशापाची प्राप्ती । तुज मानवी भोगिती भूतळीं ॥ ५९ ॥ उच्छाय मागतां तिसी । ब्रह्मा सांगे तियेपाशीं । नग्न देखिल्या पुरूरव्यासी । स्वर्गा येसी मेषप्रसंगें ॥ ६० ॥ ऐशा लाहोनि शापासी । भूतळा आली उर्वशी । देखोनि तिचिया स्वरूपासी । पुरूरवा तिसी भूलला ॥ ६१ ॥ विसरोनि आपुली महती । वश्य झाला वेश्येप्रती । रूपा भुलला भूपती । विचारस्फूर्ती विसरला ॥ ६२ ॥ नग्न देखिल्या रायासी । सांडूनि जावें उर्वशीं । ऐशी भाक दे‌ऊनि तिसी । निजभोगासी आणीली ॥ ६३ ॥ तिणें आपुलिया उच्छापासी । आणिलें दोघां एडक्यांसी । पुत्रस्नेहें पाळावें त्यांसी । तेविखीं दिधलें रायें ॥ ६४ ॥ ते उर्वशीच्या कामप्राप्ती । अतिशयें वाढली कामासक्ती । तो नेणे उदयास्त-दिवसराती । ऐशा अमित तिथी लोटल्या ॥ ६५ ॥ भोगितां उर्वशीकाम । विसरला स्वधर्मकर्म । विसरला नित्यनेम । कामसंभ्रम वाढला ॥ ६६ ॥ तेथ मेषरूपें दोघे जण । झाले अश्विनीकुमार आपण । उर्वशीभोगक्षया कारण । इंद्रें जाण पाठविले ॥ ६७ ॥ पुरूरव्याचा भोगप्रांतीं उर्वशी न्यावया स्वर्गाप्रती । दोनी फडके चोर नेती । मध्यरातीं मेमात ॥ ६८ ॥ ऐकोनि मेषांच्या शब्दासी । दुःखें हडबडली उर्वशी । रागें निर्भर्त्सी रायासी । नपुंसक होसी तूं एक ॥ ६९ ॥ वृथा वल्गसी पुरुषबळें । चोरें नेलीं माझीं बाळें । जळो तुझें तोंड काळें । म्हणोनि कपाळें ते पिटी ॥ ७० ॥ ऐकोनि स्त्रियेचा शोक थोरु । शस्त्र घे‌ऊनि सत्वरु । विद्युल्लता झळकली थोर । तंव नग्न शरीर रायाचें ॥ ७२ ॥ नग्न देखोनि रायासी । सांडूनि निघाली उर्वशी । तिचोनि वियोगें मानसीं । अतिशोकासी पावला ॥ ७३ ॥ त्यक्त्वाऽऽत्मानं व्रजन्तीं तां नग्न उन्मत्तवन्नृपः । विलपन्नन्वगाज्जाये घोरे तिष्ठेति विक्लवः ॥ ५ ॥ पृथ्वीपरिपालानीं वरिष्ठ । स्वधर्मीं धार्मिक श्रेष्ठ । शत्रुदमनीं अतिसुभट । प्रतापें उद्भट महावीर ॥ ७४ ॥ जाणे वेदशास्त्रविवेक । ज्यासी वंदिती सकळ लोक । तोही वेश्येचा केवळ रंक । झाला देख निजांगें ॥ ७५ ॥ सुरां असुरां न खालवी मान । जो अल्पही न साहे अपमान । तो वेश्येलागीं झाला दीन । निजसन्मान विसरोनी ॥ ७६ ॥ उर्वशी जातां देखोनि दिठीं । नग्न उन्मत्त उठा‌उठीं । रडत पडत लागे पाठीं । स्फुंदतां पोटीं श्वास न रिघे ॥ ७७ ॥ डोळेभरी पाहूं दे दिठीं । सांगेन जीवींच्या गुह्य गोष्टी । प्राण रिघों पाहे उठा‌उठी । क्षणभर भेटी न देतां ॥ ७८ ॥ आपुल्या पूर्वजांची आण । कदा नुल्लंघीं तुझें वचन । सत्य मानीं माझें प्रमान तुज काय कारण रुसावया ॥ ७९ ॥ तुज चालतां अवलाहीं । झणीं खडे रुततील पायीं । तुज जाणें कोणे ठायीं । तरी सवें मीही ये‍ईन ॥ ८० ॥ जा‌ऊं नको उभी राहें । परतोनी मजकडे पाहें । म्हणोनि धरूं धांवे पाये । तंव ते जाये उपेक्षुनी ॥ ८१ ॥ ज्यासी राजे मुकुटमणी । सदा येती लोटांगणीं । तो लागे वेश्येचे चरणीं । बाप करणी कामाची ॥ ८२ ॥ तुझी मज अति कळवळ । तुजलागीं मन माझें कोमळ । तूं कठिण झालीस केवळ । कोप प्रबळ कां धरिला ॥ ८३ ॥ यापरी रायाचें चित्त । विरहातुर शोकाकुलित । अतिशयें ग्लानियुक्त । ते ग्लानि सांगत श्रीकृष्ण ॥ ८४ ॥ कामानतृप्तोऽनुजुषन्‌ क्षुल्लकान्वर्षयामिनीः । न वेद यान्तीर्नायान्तीरुर्वश्याकृष्टचेतनः ॥ ६ ॥ उर्वशीकामीं कामासक्त । एकाग्र झालें रायाचें चित्त । नेणे सूर्याचें गतागत । केला भ्रांत कंदर्पें ॥ ८५ ॥ भोगिलीचि कामिनी । भोगितांही अनुदिनीं । अधिक प्रेम वाढलें मनीं । ऐसा तिजलागूनी आसक्त ॥ ८६ ॥ भोगितां उर्वशीकामासी । नेणे दिवसमासवर्षांसी । व्ययो झाला आयुष्यासी । हेंही त्यासी स्मरेना ॥ ८७ ॥ जेवीं अग्निमाजीं घृत पडे । तंव तंव ज्वाळा अधिक वाढे । तेवीं कांता भोगितां वाडेंकोडें । काम पुढें थोरावे ॥ ८८ ॥ विचारितां स्त्रीकामासी । अतितुच्छत्व दिसे त्यासी । तोही भोगितां अहर्निशीं । विरक्ती रायासी नुपजेचि ॥ ८९ ॥ प्रीति गुंतली उर्वशीसीं । अतिग्लानी करितां तिसी । परतोनि न येचि रायापाशीं । निघे वेगेंसीं सांडूनि ॥ ९० ॥ उर्वशी न देखूनि पुढें । राजा विरहें मूर्च्छित पडे । पाहों धांवे इकडेतिकडे । आक्रोशें रडे अतिदुःखी ॥ ९१ ॥ अटण करितां दाही दिशीं । अवचटें आला कुरुक्षेत्रासी । तंव अंतरिक्षीं उर्वशी । देखे दृष्टीसी नृपनाथ ॥ ९२ ॥ देखोनि म्हणे धांव पाव । मजलागीं दे कां वेगीं खेंव । येरी म्हणे मूढभाव । सांडीं सर्व विषयांधा ॥ ९३ ॥ आम्हां स्त्रियांची आसक्ती । कदा धड नव्हे गा भूपती । सदा स्त्रियांची दुष्ट जाती । जाण निश्चितीं महराजा ॥ ९४ ॥ विशेषें आम्ही स्वैरिणी । स्वेच्छा परपुरुषगामिनी । आमुचा विश्वास मनीं । झणीं न मानीं नृपनाथा ॥ ९५ ॥ आम्हां प्रमदांच्या संगतीं । राया ठकले नेणों किती । आतां सांडूनि आमची आसक्ती । हो‌ईं परमार्थीं विरक्त ॥ ९६ ॥ बहु काळ भोगितां माझा भोग । अद्यापि नुपजे तुज विराग । कामासक्ति सांडूनि साङ्ग । साधीं चांग निजस्वार्थ ॥ ९७ ॥ राजा ग्लानि करी अनेग । एकवेळ निजांगें अंग । मज दे‍ई अंगसंग । सुखसंभोग भामिनी ॥ ९८ ॥ निलाग देखोनि ग्लानीसी । कृपेनें द्रवली उर्वशी । मग ते आपुल्या पूर्व वृत्तांतासी । रायापाशीं निवेदी ॥ ९९ ॥ मी स्वर्गांगना अतिसुरूप । मज घडला ब्रह्मशाप । तूं महाराजा पुण्यरूप । संगें निःशाप मी झालें ॥ १०० ॥ तुझेनि संगें मी निर्धूत । शाप निस्तरले समस्त । मज तुज संग न घडे एथ । मी असें जात स्वर्गासी ॥ १ ॥ ऐकोनि उर्वशीचें वचन । राजा विरहें करी रुदन । तेव्हां कळवळलें तिचें मन । त्या उपाय पूर्ण दाविला ॥ २ ॥ प्रार्थूनियां गंधर्वांसी । अग्निस्थाली दिधली रायासी । यावरी करूनि यागासी । मज पावसी महाराजा ॥ ३ ॥ उर्वशीवियोगें व्यथाभूत । अग्निस्थाली उपेक्षूनि तेथ । राजा निजमंदिरा येत । शोकाकुलित अतिदुःखी ॥ ४ ॥ उर्वाशीची व्यथा रायासी । स्वप्नीं देखिलें तियेसी । त्वरेनें पाहूं आला स्थालीसी । तंव देखे अश्वत्थासी शमीगर्भा ॥ ५ ॥ त्याच्या अरणी करूनि देख । यज्ञाग्नि पाडिला चोख । यजूनि पावला उर्वशीलोक । कामसुखभोगेच्छा ॥ ६ ॥ भोग भोगितां उर्वशीसीं । विरक्ति उपजली रायासी । तो जें बोलिला अनुतापेंसीं । तें ऐक तुजसी सांगेन ॥ ७ ॥ अठरा श्लोकांचें निरूपण । राजा बोलिला आपण । आठे श्लोकीं अनुताप पूर्ण । तेंचि श्रीकृष्ण स्वयें सांगें ॥ ८ ॥ ऐल उवाच-अहो मे मोहविस्तारः कामकश्मलचेतसः । देव्या गृहीतकण्ठस्य नायुःखण्डा इमे स्मृताः ॥ ७ ॥ ऐलगीताचा अनुताप । नाशी अगम्यागमनपाप । करी श्रोत्यांसी निष्पाप । साधकां कंदर्प बाधीना ॥ ९ ॥ जेवीं मदगज गजीसंगीं । नाना आपत्ति स्वयें भोगी । तेवीं उर्वशीच्या संभोगीं । झाला विरागी पुरूरवा ॥ ११० ॥ जो उर्वशीलागीं अनुरक्त । तोचि तिसीं झाला विरक्त । तेणें वैराग्यें अनुतापयुक्त । स्वयें बोलत ऐलरावो ॥ ११ ॥ माझ्या मोहाचा विषय्विस्तार । कामासक्त कामातुर । कुश्चित कंदर्पाचें घर । म्यांचि साचार सेविलें ॥ १२ ॥ उर्वशीकामें अति‌आसक्त । कामातुर झालें चित्त । तेणें म्यां जोडिला अनर्थ । थितें केलें व्यर्थ आयुष्य ॥ १३ ॥ उर्वशी कंठसल्लग्न शस्त्र । आयुष्यच्छेदनीं सतेजधार । छेदिलें आयुष्य अपार । तें मी पामर स्मरेना ॥ १४ ॥ कांता‌आलिंगन विषवल्ली । म्यां कंठीं घातली सकाम भुलीं । तिणें आयुष्याची होळी केली । विवेक समूळी गिळिला ॥ १५ ॥ कामिनीकाम‍आलिंगनीं । कंठीं पेटविला दावाग्नी । तो धडाडिला आयुष्यवनीं । विवेक‍अवनी जाळित ॥ १६ ॥ नरदेहींचें उत्तमोत्तम । अमूल्य आयुष्य केलें भस्म । जळो जळो माझें कर्म । निंद्य अधर्म तो एक ॥ १७ ॥ नरदेहींच्या आयुष्यपुष्टी । साधक रिघाले वैकुंठीं । ज्ञाते ब्रह्म होती उठा‌उठीं । तें म्यां कामासाठीं नाशिलें ॥ १८ ॥ नाहं वेदाभिनिर्मुक्तः सूर्यो वाभ्युदितोऽमुया । मुषितो वर्षपूगानां बताहानि गतान्युत ॥ ८ ॥ नरदेहाचा आयुष्यक्षण । न मिळे देतां कोटी सुवर्ण । तें म्यां नाशिलें संपूर्ण । आपणया आपण नाडिलें ॥ १९ ॥ साधूंचिया निजस्वार्था । साधूनि द्यावया उगवे सविता । निमेषोन्मेषें परमार्थ । साधक तत्त्वतां साधिती ॥ १२० ॥ तोचि सविता सकामासी । आयुष्य हरी अहर्निशी । हें न कळे ज्याचें त्यासी । नरकपातसी निजमूळ ॥ २१ ॥ पुढिलांची गोठी ते कायसी । मीच नाडलों उर्वशीपासीं । ऱ्हास झाला आयुष्यासी । हे हानि कोणासी सांगावी ॥ २२ ॥ जनांचिया हितासी वहिला । सूर्यो अनुदिनीं उगवला । तें मी नेणेंचि दादुला । उर्वशीकामें भुलला उन्मत्त ॥ २३ ॥ सूर्याचा उदयो अस्तमान । वर्षेही लोटल्या नाहीं ज्ञान । करितां उर्वशी-अधरपान । तेणें मदें संपूर्ण मातलों ॥ २४ ॥ मद्यमदु उतरे दिनांतीं । धनमदु जाय निधनस्थितीं । तारुण्यमदु जाय क्षीणशक्ती । स्त्रीमदप्राप्ती कदा नुतरे ॥ २५ ॥ नरदेहीची आयुष्यकथा । पुढती दुर्लभ न लभे हाता । जळो हे उर्वशी देवकांता । इणेंचि तत्त्वत्तां नागविलों । २६ ॥ मी निर्भय रक्षिता सर्वांसी । त्या मज नागविलें उर्वशीं । हे लाज सांगों कोणापाशीं । उकसाबुकसीं स्पुंदत ॥ २७ ॥ माझ्या निजहिताचा चोरू । हे उर्वशी जीवें मारूं । सवेंचि उपजला विचारू । येथ मीचि पामरू अविवेकी ॥ २८ ॥ मग म्हणे कटकटा । सृष्टीमाजीं मी करंटा । आयुष्य नाशिलें कामचेष्टा । अपाव मोठा मज झाला ॥ २९ ॥ मग आक्रंदे अतिगर्जोनी । कामें नागविलों आयुष्य हरोनी । याहीहोनि आधिक हानी । पाहतां ये जनीं असेना ॥ १३० ॥ अहो मे आत्मसंमोहो येनात्मा योषितां कृतः । क्रीडामृगश्चक्रवर्ती नरदेवशिखामणिः ॥ ९ ॥ राजे मुकुटांचे प्रतापी पूर्ण । माझ्या चरणा येती शरण । तो मी वेश्येचे धरीं चरण । हें निर्लज्जपण म्यां केलें ॥ ३१ ॥ मज पुरूरव्याचे आज्ञेंकरीं । राजे नाचती चराचरीं । तो मी वेश्येचे आज्ञेवरी । श्वानाचेपरी वर्तलों ॥ ३२ ॥ जैसें वानर गारुड्याचें । तैसा स्त्रियेचेनि छंदें नाचें । माझ्या चक्रवर्तीपणाचें । अतिनिंद्य साचें फळ झालें ॥ ३३ ॥ सकळ राजे मज देती सन्मान । भूपति सदा वंदिती चरण । तो मी झालों स्त्रिये‌आधीन । हीनदीन अतिरंक ॥ ३४ ॥ राखतां स्त्रियेचा रसरंगप्रेम । पायां पडणें हें उचित कर्म । म्हणती ते जळो जन सकाम । हेचि धाडी परम कामाची ॥ ३५ ॥ मी वलयांकित चक्रवर्ती । तोही योषिता घातलों आवर्तीं । त्याचि आवर्ताची स्थिती । स्वमुखें भूपति अनुवादे ॥ ३६ ॥ सपरिच्छदमात्मानं हित्वा तृणमिवेश्वरम्‌ । यान्तीं स्त्रियं चान्वगमं नग्न उन्मत्तवद्रुदन्‌ ॥ १० ॥ केवळ साकार मायाभ्रम । यालागीं ‘प्रमदा’ स्त्रीचें नाम । संगें ठकिले उत्तमोत्तम । स्त्रीसंभ्रम वाढवितां ॥ ३७ ॥ प्रमदा अंबरें अलंकार । हें मायेचें सोलीव सार । एथ भुलले थोरथोर । मीही पामर स्त्रीसंगें ॥ ३८ ॥ माझीच मज करणी । दिसतसे दैन्यवाणी । उर्वशी वेश्या कामचारिणी । जे बहुजनीं भोगिली ॥ ३९ ॥ ऐशियेच्या कामासक्तता । मी स्वर्वस्वें भुललों सर्वथा । ते भुललेपणाची कथा । अनुतापतां स्वयें बोले ॥ १४०॥ धर्मपत्नीसीं भोगितां काम । सहसा नासेना स्वधर्म । मज वोढवलें दुष्ट कर्म । वेश्येसी परम भुललों ॥ ४१ ॥ परदारा अभिलाषिती । ते अवश्य नरका जाती । मा स्वदारा-कामासक्ती । तेथही अधोगती सोडीना ॥ ४२ ॥ स्त्रियां भुलविले हरिहर । स्त्रियां भुलविले ऋषीश्वर । स्त्रियां भुलविले थोरथोर । मीही किंकर स्त्रियां केलों ॥ ४३ ॥ राज्य आणि राजवैभव । वेश्ये‌अधीन केलें सर्व । याहीहूनि केलें अपूर्व । तीलागीं जीव अर्पिला ॥ ४४ ॥ मी राजवर्यां मुकुटमणे । तो दास झालों तिचे चरणीं । बाप कंदर्पाची करणी । केलों कामिनी अधीन ॥ ४५ ॥ ऐशिया मज राजेश्वरातें । वेश्येनें हाणोनि लातें । उपेक्षूनियां तृणवतें । निघाली निश्चितें सांडोनी ॥ ४६ ॥ तीसी जातां देखोनियां पुढें । मी नागवा धांवें लवडसवडें । लाज सांडोनियां रडें । तरी ते मजकडे पाहेना ॥ ४७ ॥ जेवीं कां लागलें महद्भूत । नातरी पिशाच जैसें उन्मत्त । तेवीं नागवा धांवे रडत । तरी तिचे चित्त द्रवेना ॥ ४८ ॥ तरी रडत पडत अडखळत । मी निर्लज्ज तीमागें धांवत । माझे मोहाचा अति‌अनर्थ । अपमानग्रस्त मज झाला ॥ ४९ ॥ कुतस्तस्यानुभावः स्यात्तेज ईशत्वमेव वा । योऽन्वगच्छं स्त्रियं यान्तीं खरवत्पादताडितः ॥ ११ ॥ मी म्हत्त्वें राजराजेश्वरु । ऐसा गर्व होता अति दुर्धरु । तो मी वेश्येचा अनुचरु । झालों किंकरु निजांगें ॥ १५० ॥ एवढाही मी राजेश्वरु । मांगे धांवें हो‍ऊनि किंकरु । तरी ते न करी अंगीकारु । जेवीं वोसंडी खरी जैशी ॥ ५१ ॥ जेवीं खरी देखोनियां खरु । धांवोनि करी अत्यादरु । येरी उपेक्षूनि अरी मारु । अतिनिष्ठरु लातांचा ॥ ५२ ॥ तिच्या लाता लागतां माथां । खरु निघेना मागुता । त्या खरा‌ऐशी मूर्खता । माझें अंगीं सर्वथा बाणली ॥ ५३ ॥ स्त्री उदास कामदृष्टीं । मीं आसक्त लागें पाठीं । माझ्या समर्थपणाची गोठी । सांगतां पोटीं मी लाजें ॥ ५४ ॥ ऐसें स्त्रीकामीं ज्याचें मन । त्याचें योग याग अनुष्ठान । अवघेंचि वृथा जाण । तेंचि निरूपण निरूपी ॥ ५५ ॥ किं विद्यया किं तपसा किं त्यागेन श्रुतेन वा । किं विविक्तेन मौनेन स्त्रीभिर्यस्य मनो हतम्‌ ॥ १२ ॥ स्त्रीकाममय ज्याचें मन । त्याची वृथा विद्या वृथा श्रवण । वृथा तप वृथा ध्यान । त्याग मुंडण तें वृथा ॥ ५६ ॥ वृथा एकांतसेवन । वृथा जाण त्याचें मौन । राखेमाजीं केलें हवन । तैसें अनुष्ठान स्त्रीकामा ॥ ५७ ॥ कामासक्त ज्याचें चित्त । त्याचे सकळही नेम व्यर्थ । आपुलें पूर्ववृत्त निंदित । अनुतापयुक्त नृप बोले ॥ ५८ ॥ स्वार्थस्याकोविदं धिङ्‍मां मूर्ख पण्डितमानिनम्‌ । योऽहमीश्वरतां प्राप्य स्त्रीभिर्गोखरवज्जितः ॥ १३ ॥ चहूं पुरुषार्थाचें अधिष्ठान । नरदेह परम पावन । जेणें देहें करितां भजन । ब्रह्म सनातन पाविजे ॥ ५९ ॥ नरदेहींचा क्षण क्षण । समूळ निर्दळी जन्ममरण । भावें करितां हरिस्मरण । महापापें जाण निर्दळती ॥ ६० ॥ त्या नरदेहाची लाहोनि प्राप्ती । नरवर्य झालों चक्रवर्ती । त्या माझी जळो जळो स्थिती । जो वेश्येप्रती भुललों ॥ ६१ ॥ मानी श्रेष्ठ मी सज्ञान । परी अज्ञानांहूनि अज्ञान । नेणेंचि निजस्वार्थसाधन । वेश्ये‌आधीन मी झालों ॥ ६२ ॥ लाभोनि नरदेहनिधान । म्यां देहीं धरिला ज्ञानभिमान । न करींच निजस्वार्थसाधन । हें मूर्खपण पैं माझे ॥ ६३ ॥ जैसा गायीमागें कामयुक्त । धांवतां बैल न मानी अनर्थ । कां खरीमागें खर धांवत । तैसा कामासक्त मी निर्लज्ज ॥ ६४ ॥ खरी खरास हाणी लाताडें । तरी तो धसे पुढें पुढें । तैसाचि मीही वेश्येकडे । कामकैवाडें भुललों ॥ ६५ ॥ ‘कामभोगांतीं विरक्ती’ । ऐसे मूर्ख विवेकी बोलती । ते अधःपातीं घालिती । हे मज प्रतीति स्वयें झाली ॥ ६६ ॥ सेवतो वर्षपूगान्मे उर्वश्या अधरासवम्‌ । न तृप्यत्यात्मभूः कामो वह्निराहुतिभिर्यथा ॥ १४ ॥ सत्ययुगींचें आयुष्य माझें । ऐश्वर्य सार्वभौमराज्यें । उर्वशी स्वर्गमंडनकाजें । सर्वभोगसमाजें भोगितां ॥ ६७ ॥ भोगितां लोटल्या वर्षकोटी । परी विरक्तीची नाठवे गोठी । मा ‘वैराग्य भोगाचे शेवटीं’ । हे मिथ्या चावटी मूर्खांची ॥ ६८ ॥ स्त्रियेचें म्हणती अधरामृत । तेही मूर्ख गा निश्चित । तें उन्मादमद्य यथार्थ । अधिकें चित्तभ्रामक ॥ ६९ ॥ वनिता‌अधरपानगोडी । त्यापुढें सकळ मद्यें बापुडीं । तत्काळ अनर्थीं पाडी । निजस्वार्थकोडीनशक ॥ १७० ॥ घालितां कोटि घृताहुती । अग्नीसी कदा नव्हे तृप्ती । तेवीं वनिताकामासक्ती । कदा विरक्ती उपजेना ॥ ७१ ॥ ऐसा आठ श्लोकीं अनुताप । स्वयें बोलोनियां नृप । हृदयीं उपजला विवेकदीप । जेणें झडे कंदर्प तें स्मरलें ॥ ७२ ॥ सकामासी विषय त्यागितां । वासना न त्यागे सर्वथा । कां आदरें विषय भोगितां । विरक्ती सर्वथा उपजेना ॥ ७३ ॥ ऐशिये अर्थींचा उपावो । विचारोनि बोले रावो । कामत्यागाचा अभिप्रावो । साचार पहा हो संबोधी ॥ ७४ ॥ पुंश्चल्यापह्तं चित्तं को न्वव्यो मोचितुं प्रभुः । आत्मारामेश्वरमृते भगवन्तमधोक्षजम्‌ ॥ १५ ॥ पुरुष सदा स्त्री‌अनुराग । परी सहसा न करवे प्रसंग । त्यासी पुंश्चलीचा घडल्या संग । ते बाधी निलाग हावभावीं ॥ ७५ ॥ पुंश्चलीचे कटाक्ष गुण । तेंचि पुरुषासी दृढ बंधन । स्त्रीकामबंधन सोडवी कोण । एक नारायणावांचूनि ॥ ७६ ॥ कामिनीकामापासूनि निर्मुक्त । कर्ता ईश्वर समर्थ । जो कां आत्माराम भगवंत । तोचि निश्चित सोडविता ॥ ७७ ॥ मायागुणें कामसंचार । अविद्या वाढवी साचार । मायानियंता जो ईश्वर । तो कामकरकर निर्दळी ॥ ७८ ॥ स्वस्वरूपीं रमण आराम । ऐसा जो कां आत्माराम । जो निवारी सकळ काम । करी निर्भ्रम निजात्मता ॥ ७९ ॥ जो भोग भोगूनि अभोक्ता । त्या शरण रिघाल्या अनंता । बाधूं न शके विषयावस्था । स्त्रीसंगीं सोडविता तो एक ॥ १८० ॥ तो निवारी अधोगती । तो अधोक्षज असतां भक्तपती । त्यासी शरण रिघाल्या निश्चितीं । कामासक्ती निवारी ॥ ८१ ॥ राजा कामासक्तीं अतित्रासला । सबाह्य विषयीं उदास झाला । त्याचा वासनाकाम जो उरला । तो न वचे त्यागिला त्याचेनीं ॥ ८२ ॥ सर्वभावेंसीं संपूर्ण । हरीसि रिघालिया शरण । सकळ कामाचें निर्दळण । सहजें जाण स्वयें होय ॥ ८३ ॥ एकाचा मतवाद निश्चितीं । करितां श्रुतिवाक्य व्युत्पत्ती । यजितां इंद्रादि देवांप्रती । कामनिवृत्ति हृदयस्थ ॥ ८४ ॥ ऐसें बोलती जे सज्ञान । ते सर्वथा ग अज्ञान । हरीसी न रिघतां शरण । कामसंचरण शमेना ॥ ८५ ॥ इंद्रादि देव कामासक्तीं । विटंबले नेणों किती । त्यांचेनि भजनें कामनिवृत्ति । जे म्हणती ते अतिमूर्ख ॥ ८६ ॥ बोधितस्यापि देव्या मे सूक्तवाक्येन दुर्मतेः । मनोगतो महामोहो नापयात्यजितात्मनः ॥ १६ ॥ काम्य कर्मीं हो‌ईल सुख । हें बोलणें समूळ लटिक । काम्य कर्मीं अधिक दुःख । हें नेणती मूर्ख सकाम ॥ ८७ ॥ प्रत्यक्ष म्यां याग करून । इंद्रादि देवांतें यजून । उर्वशीसंभोग लाधून । अतिदुःखी जाण मी झालों ॥ ८८ ॥ नारायण‌ऊरूसीं जन्मली । यालागीं ‘उर्वशी’ नांव पावली । त्या मज श्रुतिवाक्यें बोधिलीं । निष्काम बोली अतिशुद्ध ॥ ८९ ॥ ऐकतां श्रुतिनिष्कामबोली । माझी न वचेच सकाम भुली । जंव गोविंदें कृपा नाहीं केली । तंव कामाची चाली खुंटेना ॥ १९० ॥ भावें हरीसी निघाल्या शरण । हृदयीं प्रकटे नारायण । तेव्हा सर्व काम सहजें जाण । जाती पळोन हृदयस्थ ॥ ९१ ॥ उर्वशीकामसंगें जाण । थोर कष्टलें मी आपण । असो तिचा अपराध कोण । मीचि हरिस्मरण विसरलों ॥ ९२ ॥ जरी मी करितों हरीचें स्मरण । तरी काम बापुडें बाधी कोण । मज माझी असती आठवण । तैं तुच्छ जाण उर्वशी ॥ ९३ ॥ किमेतया नोऽपकृतं रज्ज्वा वा सर्पचेतसः । रज्जुस्वरूपाविदुषो योऽहं यदनितेन्द्रियः ॥ १७ ॥ मूढमतिचा प्रबोध । मानी उर्वशीचा अपराध । विवेकें पाहतां शुद्ध । मीच मतिमंद सकाम ॥ ९४ ॥ उर्वशी देखतां दृष्टीं । मी कामासक्त झालों पोटीं । माझिये लंपटतेसाठीं । मज म्या शेवटीं नाडिलें ॥ ९५ ॥ जेवीं सांजवेळे पडिला दोरु । भेडा सर्प भासे थोरु । जंव नाही केला निर्धारु । तंव महा‌अजगरु भयानक ॥ ९६ ॥ तेणें सर्पभयें लवडसवडीं । पळों जातां पैं तांतडी । दुपावुलीं पडली आढी । त्याची कल्पना नाडी तयासी ॥ ९७ ॥ तेवीं माझिये कामभ्रांतीं उर्वशी सुंदर युवती । एथ माझिया कामासक्ती । सुरत-रतीं भुललों ॥ ९८ ॥ यापरी मी अविवेकात्मा । भुललों उर्वशीच्या कामा । तीवरी कोपणें जें आम्हां । हेंचि अधर्माचें मूळ ॥ ९९ ॥ दृष्टीं देखतां कामिनी । कामासक्ता ते अतिरमणी । विवेकिया पोहणघाणी । नरकमाथणी ते कांता ॥ २०० ॥ जेवीं सूकरा विष्ठेची प्रीती । तेवीं सकामा कामिनीची रती । विवेकी देखोनि थुंकिती । तेंचि श्लोकार्थीं नृप बोले ॥ १ ॥ क्कायं मलीमसः कायो दौर्गन्ध्याद्यात्मकोऽशुचिः । क्क गुणाः सौमनस्याद्या ह्यध्यासोऽविद्यया कृतः ॥ १८ ॥ स्त्री-पुरुष नामाभिधान । केवळ देहासीचि जाण । ते स्त्रीदेहीं पाहतां गुण । मलिनपणा अत्यंत ॥ २ ॥ जे नीच नव्या विटाळाची खाणी । जे रजस्वलेची प्रवाहन्हाणी । जे कां दुर्गंधाची पोहणी । जे उतली चिडाणी विष्ठेची ॥ ३ ॥ जे कां दोषांचें जन्मस्थान । जे विकल्पाचें आयतन । जे महादुःखाचें भाजन । अधःपतन जिचेनी ॥ ४ ॥ जे वाढवी अति‌उद्वेग । जिचेनी मनासी लागे क्षयरोग । जिचा बाधक अंगसंग । अतिनिलाग निंद्यत्वें ॥ ५ ॥ जेवीं नीचाचा कांठपरा । गळां अडकल्या मांजरा । तें रिघोनि शुचीचिया घरा । नाना रसपात्रां विटाळी ॥ ६ ॥ तेवीं कामिनीची संगती । गळां पडली न निघे मागुती । कामिनीकामें कामासक्तीं । नेणों किती विटंबिले ॥ ७ ॥ तें मांजर जेथें घाली मुख । तेथ कांठपरा रोधी देख । तेवीं स्त्रीसंगें अतिदुःख । मानिती सुख सकाम ॥ ८ ॥ मृगजळीं कमळ मनोहर । तैसें अंगनावदन सुंदर । सुस्मित चारु सुकुमार । सकाम नर वानिती ॥ ९ ॥ अंगनावदनाची निजस्थिती । निखळ शेंबुडाची तेथ वस्ती । तें मुख चंद्रेसीं उपमिती । जेवीं अमृत म्हणती विखातें ॥ २१० ॥ वनिता‌अधरीं झरे लाळ । ते म्हणती अधरामृत केवळ । बाप अविद्येचें बळ । भुलले सकळ सुरासुर ॥ ११ ॥ स्त्रीपुरुषीं आत्मा एक । स्त्रीरूप तेथ आविद्यक । मिथ्या स्त्रीकामीं भुलले लोक । बाप कवतिक मायेचें ॥ १२ ॥ आत्मा भोक्ता म्हणावा स्त्रीसंभोगीं । तंव तो नित्यमुक्त असंगी । देह भोक्ता म्हणावा स्त्रीसंयोगीं । तंव देहाचे अंगीं जडत्व ॥ १३ ॥ तेथ विषयभोगासी कारण । मुख्यत्वें देहाभिमान । त्या देहाभिमानासी जाण । बहुत जण विभागी ॥ १४ ॥ पित्रोः किं स्वं नु भार्यायाः स्वामिनोऽग्रेः श्वगृध्रयोः । किमात्मनः किं सुहदाचिति यो नावसीयते ॥ १९ ॥ गर्भधारण पोषण । स्वयें श्रमोनियां आपण । माता करी परिपालन । तो हा देह जाण ‘मातेचा’ ॥ १५ ॥ एकलेपणें माता । स्वप्नीं न देखे पुत्रकथा । जो निजवीर्यनिक्षेपिता । तो हा देहो तत्त्वतां ‘पित्याचा’ ॥ १६ ॥ जे अग्नि ब्राह्मण साक्षी करूनी । भार्या आणिली भाक देवोनी । जे जीवित्व समर्पोनी । सेवेलागोनी विनटली ॥ १७ ॥ जीसी याचेनि सुखश्रृंगार । जीसी याचेनि ऐहिक पर । ऐसा सूक्ष्म करितां विचार । देहो साचार ‘स्त्रियेचा’ ॥ १८ ॥ या देहाचीं आवश्यकें । ‘सुहृद बंधू’ जे कां सखे । देहाचेनि सुखावती सुखें । देह एके पाखें त्यांचाही ॥ १९ ॥ स्वयें घे‌ऊनियां वेतन । देहो विकिला आपण । आज्ञेवीण न वचे क्षण । देहो जाण ‘स्वामीचा’ ॥ २२० ॥ ‘श्वानशृंगालगिधांचें’ खाजें । तरी हा देहो त्यांचा म्हणिजे । जीवास्तव देहीं कर्म निफजे । यालागीं देह बोलिजे ‘जीवाचा’ ॥ २१ ॥ पिता-माता-स्त्री-पुत्र-स्वजन । देहाचें अवश्य करिती दहन । यालागीं देह ‘अग्नीचा’ पूर्ण । विचक्ष्ण बोलती ॥ २२ ॥ यापरी देहाचे जाण । विभागी असती आठ जण । तेथ ‘मी भोक्ता’ हा अहिमान । तो केवळ जाण मूर्खत्वें ॥ २३ ॥ एथ ‘मी’ विशिष्ट भोक्ता । ‘माझा’ देह ऐशी ममता । हेचि जाण तत्त्वतां । अधःपाता नेताती ॥ २४ ॥ तस्मिन्कलेवरेऽमेध्ये तुच्छनिष्ठे विषज्जते । अहो सुभद्रं सुनसं सुस्मितं च मुखं स्त्रियः ॥ २० ॥ देहो तितुका अशुचिकर । त्यांत स्त्रीदेह अति‌अपवित्र । केवळ विटाळाचें पात्र । निरंतर द्र्वरूपें ॥ २५ ॥ स्वयें भोक्ता अतिकुश्चित । ऐसे अविवेकी कामासक्त । कामिनीकामीं लोलंगत । ते मूर्ख वानीत स्त्रियांतें ॥ २६ ॥ अहो हे सुंदर सुरेख । चंद्रवदना अतिसुमुख । सरळ शोभे नासिक । सुभग देख सुकुमार ॥ २७ ॥ ऐशिये सुंदर स्त्रियेतें । पावलों आम्ही सभाग्य एथें । ऐशीं कामासक्तचितें । भुललें भ्रांतें प्रमदांसी ॥ २८ ॥ स्त्रीदेहाचे विवंचनें । विवंचितां ओकारा ये मनें । जळो स्त्रियेचें निंद्य जिणॊं । मूर्खीं रमणें ते ठायीं ॥ २९ ॥ त्वङ्‍मांसरुधिरस्न्नायुमेदोमज्जास्थिसंहतौ । विण्मूत्रपूये रमतां कृमीणां कियदन्तरम्‌ ॥ २१ ॥ स्त्रीदेहाचा उभारा । केवळ अस्थींचा पांजरा । त्याचें आवरण तें स्न्नायु शिरा । बांधोनि खरा दृढ केला ॥ २३० ॥ तेथ रुधिरमांसाचें कालवन । करूनि पांजरा लिंपिला पूर्ण । अस्थीवरील जें वेष्टण । ‘मज्जा’ म्हणती त्या नांव ॥ ३१ ॥ अस्थिमाजील रसबद्ध । त्या नांव बोलिजे ‘मेद’ । वरी चर्म मडिलें सुबद्ध । ‘त्वचा’ शुद्ध ती नांव ॥ ३२ ॥ त्या देहामाजीं सांठवण । विष्ठा मूत्र परिपूर्ण । ते स्त्रीदेहीं ज्याचें रमण । ते ‘कृमि’ जाण नररूपें ॥ ३३ ॥ विष्ठेमाजीं कृमि चरती । तैशी स्त्रीदेहीं ज्यां आसक्ती । तेही कृमिप्राय निश्चितीं । संदेह ये अर्थीं असेना ॥ ३४ ॥ वनितादेह यापरी एथ । विचारितां अतिकुश्चित । तो वस्त्रालंकारीं शोभित । करूनि आसक्त नर होती ॥ ३५ ॥ घंटापारधी पाश पसरी । त्यावरी तो मृगांतें धरी । पुरुष स्त्रियेतें श्रृंगारी । त्या पाशाभीतरीं स्वयें अडके ॥ ३६ ॥ यालागीं स्त्रियाची संगति । कदा न करावी विरक्तीं । गृहस्थीं सांडावी आसक्ती । येचि अर्थीं नृप बोले ॥ ३७ ॥ अथापि नोपसज्जेत स्त्रीषु स्त्रैणेषु चार्थवित्‌ । विषयेन्द्रियसंयोगान्मनः क्षुभ्यति नान्यथा ॥ २२ ॥ स्त्रीदेह शोभनीय असता । तरी स्वस्त्रालंकारेंवीण शोभता । तो अतिनिंद्य कुश्चितता । उघडा सर्वथा शोभेना ॥ ३८ ॥ यालागीं वस्त्राभरणीं । देह गुंडिती कामिनी । जेवीं मैंद ब्राह्मणपणीं । विश्वासूनी घात कीजे ॥ ३९ ॥ तैशी स्तियांची संगती । सेवा लावी नाना युक्तीं । शेखीं संगें पाडी अधःपातीं । तेथ विरक्तीं न वचावें ॥ २४० ॥ जरी स्त्रियेची विरक्तस्थिती । तरी साधकीं न करावी संगती । अग्निसंगें घृतें द्रवती । तेवीं विकारे वृत्ति स्त्रीसंगें ॥ ४१ ॥ अमृत म्हणोनि खातां विख । आवश्य मरण आणी देख । स्त्री मानूनि सात्त्विक । सेवितां दुःख भोगवी ॥ ४२ ॥ अग्नीमाजीं घृताची वस्ती । जरी बहुकाळ निर्वाहती । तरी स्त्रीसंगें परमार्थीं । निजत्मस्थिती पावते ॥ ४३ ॥ घृत वेंचल्या वर्षे झालीं साठी । तरी अग्निसंगें द्रव उपजे घटीं । तेवीं प्रमदासंगपरिपाठीं । वार्धकींही उठी अतिकामु ॥ ४४ ॥ जरी कापूर अग्नी‌आंत । नांदो लाहता न पोळत । तरीच स्त्रीसंगें परमार्थ । पावते समस्त परब्रह्म ॥ ४५ ॥ अग्नी पोळी धरितां हातीं । तैशी स्त्रियांची संगती । संगे वाढवी आसक्ती । पाडी अनर्थीं पुरुषांतें ॥ ४६ ॥ स्त्रियेपरीसही स्त्रैण । संगती मीनलिया जाण । कोटि अनर्थांचें भाजन । अधःपतन तत्संगें ॥ ४७ ॥ स्त्रैणेंसीं झाल्या भेटी । ब्रह्मानंद स्त्रीसुखाच्या पोटीं । ऐशा विरक्तां प्रबोधी गोठी । करी उठा‌उठी स्त्रीकाम ॥ ४८ ॥ तेथ स्वदारा आणि परदारा । या करूं नेदी विचारा । प्रवर्तवी स्वेच्छाचारा । स्त्रैण खरा अतिघाती ॥ ४९ ॥ स्त्रैण जेथें प्रवेशला । तेथ अनाचार वेलीं गेला । अधर्म सर्वांगीं फुलला । बाधकत्वें फळता अनर्थफळीं ॥ २५० ॥ यालागीं जो परमार्थीं । तेणें स्त्री आणि स्त्रैणाची संगती । सर्वथा न धरावी हातीं । पाडी अनर्थीं तो संग ॥ ५१ ॥ मुख्य स्त्रैणचि वळिला आहे । तेथें स्त्रीसंग कोठें राहे । हे संगतीचि पाहें । सेव्य नोहे परमार्थ ॥ ५२ ॥ यालागीं साधकीं आपण । स्त्रीनिरीक्षण संभाषण । सर्वथा न करावें जाण । एकांतशील न केव्हांही व्हावें ॥ ५३ ॥ म्हणशी विवेकी जो अहे । त्यासी स्त्रीसंग करील काये । स्त्रीसंगास्तव पाहें । सोशिले अपाये सुज्ञांनीं ॥ ५४ ॥ पराशरासी अर्ध घडी । नावेसी मीनली नावाडी । ते अर्ध घटिकेसाठीं रोकडी । अंगीं परवडी वाजली ॥ ५५ ॥ ऋष्यशृंग अतितापसी । तोही वश झाला वेश्येसी । इतरांची गोठी कायसी । मुख्य महादेवासी भुलविलें ॥ ५६ ॥ विषय‍इंद्रियांचे संगती । अवश्य क्षोभे चित्तवृत्ती । तेथ सज्ञानही बाधिजती । मा कोण गती अज्ञाना ॥ ५७ ॥ हेही असो उपपत्ती । नसतां स्त्रियांची संगती । काम क्षोभे एकांतीं । तेंचि विशदार्थीं नृप बोले ॥ ५८ ॥ अदृष्टादशुताद्भावान्न भाव उपजायते । असंप्रयुञ्जतः प्राणान्‌ शाम्यति स्तिमितं मनः ॥ २३ ॥ जें देखिलें ऐकिलें नाहीं । ऐशिया विषयांचे ठायीं । पुरुषाचें मन पाहीं । सर्वथा कहीं क्षोभेना ॥ ५९ ॥ जे पूर्वभुक्त विषय असती । तेचि स्मरण झालिया चित्तीं । कामौद्रेकें क्षोभे वृत्ती । नसतां संगती स्त्रियेची ॥ २६० ॥ एवं पूर्वापर विषयासक्ती । पुरुषासी बाधक निश्चितीं । तो बैसल्याही एकांतीं । वासनासंस्कारें वृत्ति सकाम क्षोभे ॥ ६१ ॥ पूर्वदिवशींचीं पक्कान्नें । जीं ठेविलीं अतियत्नें । तीं न करितांही रांधणें । पहांटे भक्षणें स्वयें जेवीं ॥ ६२ ॥ तेवीं वासनासंस्थित काम पुरुषास करी सकाम । कामक्षोभें पाडी भ्रम । कर्माकर्म स्मरेना ॥ ६३ ॥ एवं वासना कामसंगती । बाधक होय परमार्थीं । यालागीं साधकीं समस्तीं । स्त्रीकामासक्ती त्यागावी ॥ ६४ ॥ मनीं क्षोभल्या कामासक्ती । साधकीं तेथें करावी युक्ती । आवराव्या बाह्य इंद्रियवृत्ती । तैं मनासी शांति हळूहळू होय ॥ ६५ ॥ कर्मेंद्रियीं राखण । दृढ वैराग्य ठेविलिया जाण । मनीं क्षोभल्या काम पूर्ण । आपल्या आपण उपशमे ॥ ६६ ॥ जेणें पडिजे अनर्थीं । ते त्यागावी संगती । संगत्यागाची निजस्थिती । दृढ श्लोकार्थीं नृप बोले ॥ ६७ ॥ तस्मात्सङ्गो न कर्तव्यः स्त्रीषु स्त्रैणेषु चेन्द्रियेः । विदुषां चाप्यविश्रब्धः षड्‌वर्गः किमु मादृशाम्‌ ॥ २४ ॥ जेणें सज्ञाना उठी छळ । सकाम भुलवी तत्काळ । ऐसा स्त्रीसंग अनर्थशीळ । त्याहूनि प्रबळ स्त्रैणाचा ॥ ६८ ॥ यालागीं कर्मेंद्रियांचे स्थितीं । स्त्री आणि स्तैणाची संगती । घडों नेदावी परमार्थीं । जे निजस्वार्थीं साधक ॥ ६९ ॥ जरी विषयीं क्षोभेल मन । तरी इंद्रियें आवरावीं आपण । तरी मनींचा विषयो जाण । मनींचि आपण स्वयें विरे ॥ २७० ॥ निकट विषय स्त्रीसंगती । मन क्षोभे विषयसक्तीं । क्षणार्ध स्त्रीसंगप्राप्ती । पडले अनर्थीं सज्ञान ॥ ७१ ॥ स्त्रीदर्शनें कामासक्त । देवेंद्र झाला भगांकित । चंद्र कळंकिया एथ । केला निश्चित गुरुपत्न्या ॥ ७२ ॥ सौभरी तपस्वी तपयुक्त । तो मत्स्यमैथुनास्तव एथ । करूनि सांडिला कामासक्त । ऐसा संग अनर्थभूत स्त्रियांचा ॥ ७३ ॥ निजकन्येचिया संगतीं । ब्रह्मा भुलला कामासक्ती । मा इतरांची कोण गती । संग अनर्थीं स्त्रियांचा ॥ ७४ ॥ कामिनीसंग अतिदारुण । शिवासी झालें लिंगपतन । प्रमदांसंगें सज्ञान । ठकले जाण महायोगी ॥ ७५ ॥ नारदें विनोददृष्टीं । कृष्णपत्नी मागितल्यासाठीं । तो नारदी केला गंगातटीं । तेथ जन्मले पोटीं साठी पुत्र ॥ ७६ ॥ कौतुकें स्त्रीयांप्रति जातां । सज्ञान पावे बाधकता । मा मजसारिख्या मूर्खाची कथा । कोण वार्ता ते ठायीं ॥ ७७ ॥ क्षणार्ध स्त्रियांची संगती । सज्ञान ठकले ऐशा रीतीं । जे स्त्रीसंगा विश्वासती । ते दुःखी होती मज‍ऐसे ॥ ७८ ॥ यालागीं विश्वासतां स्त्रीसंगासी । इंद्रियषड्‍वर्ग ठकी सर्वांसी । एथ आवरूनि इंद्रियांसी । सर्वथा स्त्रियांसी त्यागावें ॥ ७९ ॥ त्यागूनि स्त्रियांची संगती । उपरमूनि इंद्रियवृत्ती । राजा पावला परम शांती । तेंचि श्रीपति स्वयें सांगे ॥ २८० ॥ श्रीबगवानुवाच - एवं प्रगायन्‌ नृपदेवदेवः स उर्वशीलोकमथो विहाय । आत्मानमात्मन्यवगम्य मां वै उपारमञ्ज्ञानविधूतमोहः ॥ २५ ॥ जो उर्वशीस्वर्गभोग पावोनी । ज्यासी देव मानिती श्रेष्ठपणीं । जो सकळराजचूडामणी । ज्यासी येती लोटांगणीं भूपाळ ॥ ८१ ॥ ऐसा पुरूरवा चक्रवर्ती । लाहोनि उर्वशीभोगप्राप्ती । स्वर्गभोगीं पावला विरक्ती । सभाग्य नृपति तो एक ॥ ८२ ॥ अप्राप्तविषयें योगी । बहुत देखिले विरागी । परी प्राप्तस्वर्गांगनाभोगीं । धन्य विरागी ॥ ८३ ॥ पुरूरव्या‌ऐशी विरक्ती । नाहीं देखिली आणिकांप्रती । धन्य पुरूरवा त्रिजगतीं । स्वमुखें श्रीपति वाखाणी ॥ ८४ ॥ तेणें अनुतापाच्या अनुवृत्तीं । निंदोनियां निजात्मस्थिती । क्षाळिली कामिनीकामासक्ती । धुतला निश्चितीं महामोहो ॥ ८५ ॥ अनुतापा‌अगिठीं अभंग । वैराग्यपुट दे‌ऊनि चांग । विवेकें दमितां साङ्ग । काममोहाचे डाग क्षळिले तेणें ॥ ८६ ॥ जेवीं सोनें पुटीं पडे । तुक तुटे वानीं चढे । तेवीं निजात्मप्राप्तीसिनिवाडें । वृत्ति वाडेंकोडॆं क्षळिली ॥ ८७ ॥ ऐशिये अतिशुद्ध निजवृत्तीं । विवेकवैराग्यसंपत्ती । पूर्ण अनुतापाचे स्थितीं । माझी कृपाप्राप्ती पावला ॥ ८८ ॥ माझिया कृपेवीण कांहीं । कदा अनुताप नुपजे देहीं । शुद्ध अनुताप ज्याच्या ठायीं । ते माझी कृपा पाहीं परिपूर्ण ॥ ८९ ॥ माझी कृपा झलिया जाण । जीव होय ब्रह्म पूर्ण । निःशेष गळे देहाभिमान । मीतूंपण भासेना ॥ २९० ॥ तेथ कार्य कर्म आणि कर्ता । भोग्य भोग आणि भोक्ता । दृश्य दर्शन द्रष्टता । हे त्रिपुटी सर्वथा असेना ॥ ९१ ॥ त्रिगुणत्रिपुटीचें कारण । मूळभूत निज‍अज्ञान । तें सद्गुरुकृपेस्तव जाण । गेलें हरपोन मिथ्यात्वें ॥ ९२ ॥ जेवीं दोराचें सापपण । निर्धारितां हारपे पूर्ण । तेवीं गुणेंसी अविद्या जाण । जाय हारपोन गुरुबोधें ॥ ९३ ॥ सद्गुरुबोधें पाहतां जाण । दिसेना द्वैताचें भान । तेथ उर्वशी भोगी कोण । राजा स्वानंदें पूर्ण निवाला ॥ ९४ ॥ राजा निवाला ब्रम्हरसीं । मग सांडूनियां उर्वशी । त्यजोनियां स्वर्गलोकासी । निजबोधेंसीं निघाला ॥ ९५ ॥ इतर ज्ञाते स्त्रिया त्यागिती । परी त्यागेना कामासक्ती । तैसी नव्हे रायाची स्थिती । परमार्थविरक्ती पावला ॥ ९६ ॥ जे परम विरक्तीचे पोटीं । कामिनीकामवार्ता नुठी । ब्रह्मानंदें कोंदली सृष्टी । स्वानंदपुष्टीं निवाला ॥ ९७ ॥ ऐसा सुखरूपें सहज । मी हो‍ऊनि पावला मज । जिणोनि कल्पनाकामकाज । नाचत भोज स्वानंदें ॥ ९८ ॥ ऐसा निश्चयेंसीं निश्चित । माझें निजस्वरूप झाला प्राप्त । तेणें हा इतिहास एथ । निजसुखार्थ गायिला ॥ ९९ ॥ अनुताप‍आवडीं इतिहास । गातां प्रकटे पूर्ण परेश । तेथ सहजें अविद्येचा नाश । निजसुखें क्षितीश निवाला ॥ ३०० ॥ एवढी पावावया निजप्राप्ती । त्यागावी कामिनीकामासक्ती । मुख्यत्वें धरावी सत्संगती । हेंचि उद्धवाप्रती हरि बोले ॥ १ ॥ ततो दुःसङ्गमुत्सृज्य सत्सु सज्जेत बुद्धिमान्‌ । सन्त एतस्य छिन्दन्ति मनोव्यासङ्गमुक्तिभिः ॥ २६ ॥ अवश्य त्यागावी दुःसंगता । तो दुःसंग कोण म्हणशी आतां । तरी स्त्री आणि स्तैणावरता । दुःसंग सर्वथा असेना ॥ २ ॥ जो मानीना वेदशास्त्रार्था । जो अविश्वासी परमार्थ । ज्यामाजीं अतिविकल्पता । तोही तत्त्वतां दुःसंग ॥ ३ ॥ जो बोल बोले अतिविरक्त । हृदयीं अधर्मकामरत । कामरोधें द्वेषा येत । तोही निश्चित दुःसंग ॥ ४ ॥ कां स्वधर्मकर्मविनीतता । बाह्य दावी सत्त्विकता । हृदयीं दोषदर्शी संतां । हे दुःसंगता अतिदुष्ट ॥ ५ ॥ जो मुखें न बोले आपण । परी देखे साधूंचे दोषगुण । तेंचि संवादिया दावी उपलक्षण । तो अतिकठिण दुःसंग ॥ ६ ॥ मुख्य आपली जे सकामता । तोचि द्‌ःसंग सर्वथा । तो काम समूळ त्यागितां । दुःसगता त्यागिली ॥ ७ ॥ कामकल्पनेचा जो मार । तोचि दुःसंग दुर्धर । ते कामकल्पना त्यागी जो नर । त्यासी संसार सुखरूप ॥ ८ ॥ कामकल्पना त्यागावया जाण । मुख्य सत्संगचि कारण । संतांचे वंदितां श्रीचरण । कल्पनाकाम जाण उपमर्दे ॥ ९ ॥ संग सर्वथा बाधक । म्हणशी त्यजावा निःशेख । तरी सत्संग न धरितां देख । केवीं साधक सुटतील ॥ ३१० ॥ सत्संगेंवीण जें साधन । तेंचि साधकां दृढ बंधन । सत्संगेंवीण त्याग जाण । तेंचि संपूर्ण पाषांड ॥ ११ ॥ चित्तविषयांचा स्‌ंबंध । गांठीं बैसल्या सुबद्ध । त्यांचा करावया छेद । विवेकें विशद निजसाधु ॥ १२ ॥ संताच्या सहज गोठी । त्याचि उपदेशांच्या कोटी । देहात्मता जीवगांठी । बोलासाठीं छेदिती ॥ १३ ॥ भावें धरिल्या सत्संगती । साधकां भवपाशनिर्मुक्ती । यालागीं अवश्य बुद्धिमंतीं । करावी संगती संतांची ॥ १४ ॥ त्या संतलक्षणांची स्थिती । अतिसाक्षेपें श्रीपती । आदरें सांगे उद्धवाप्रती । यथानिगुती निजबोधें ॥ १५ ॥ सन्तोऽनपेक्षा मच्चित्ताः प्रशान्ताः समदर्शिनः । निर्ममा निरहङ्कारा निर्द्वन्द्वा निष्परिग्रहाः ॥ २७ ॥ साधूंचे अमित गुण । त्यांत मुख्यत्वें अष्टलक्षण । निवडूनि सांगे श्रीकृष्ण । ते कोण कोण अवधारीं ॥ १६ ॥ प्राप्ताप्राप्त-लाभावस्था । बाधूं न शके साधूंच्या चित्ता । चित्त रातलें भगवंता । ‘निरपेक्षता’ या नांव ॥ १७ ॥ पैल विषयो मज व्हावा । ऐसा आठव नाठवे जीवा । हा साधूचा निरपेक्षा ठेवा । जाण उद्धवा गुण पहिला ॥ १८ ॥ चित्तें चिंतावें चैतन्य । याचि नांवे ‘मचित्त’ पण । याचि नांवें निरपेक्ष पूर्ण । इतर चिंतन भवबंधु ॥ १९ ॥ निरपेक्ष व्हावया एथ । जागृति स्वप्न सुषुप्ती‌आंत । चिन्मात्रीं जडलें चित्त । या नांव ‘मच्चित्त’ गुण दुजा ॥ ३२० ॥ देह झालिया लक्ष्मीयुक्त । अथवा हो कां आपद्भूत । चित्त परमानंदीं निश्चित । या नांव ‘मच्चित’ उद्धवा ॥ २१ ॥ कामलोभादिदोषरहित । परमानंदीं जडलें चित्त । शांति सुखवासें वसे तेथ । यालागीं ‘प्रशांत’ बोलिजे त्यासी ॥ २२ ॥ जरी प्राणान्त केला अपकार । तरी न म्हणे हा ‘दुष्ट’ नर । अपकाऱ्या करी अति‌उपकार । प्रशांतिप्रकार या नांव ॥ २३ ॥ जरी ठकूनि सर्वस्व नेलें । तरी क्षोभेना दोष बोले । तें जाण ब्रह्मार्पण झालें । येणें अंगा आलें प्रशांतत्व ॥ २४ ॥ ब्रह्मभावेंचि तत्त्वता । विश्वासणें सर्व भूतां । कदा विकल्प नुपजे चित्ता । हे प्रशांतता गुण तिजा ॥ २५ ॥ ऐसा हा प्रशांत गुण । अंगीं बाणावया हेंचि कारण । जगीं देखे ‘समदर्शन’ । ब्रह्मपरिपूर्ण समसाम्यें ॥ २६ ॥ जग पाहतां दिसे विषम । परी विषमीं देखे सम ब्रह्म । तोचि ‘समदर्शी’ परम । हा गुण निरुपम पैं चौथा ॥ २७ ॥ हे समदृष्टी यावया हाता । भावें भजोनि भगवंता । निःशेष त्यजावी अहंममता । तेही कथा अवधारीं ॥ २८ ॥ देहीं धरितां देहाभिमान । ते अहंता वाढवी ‘मीपण’ । मीपणें ‘ममता’ जाण । वाढे संपूर्ण देहसंबंधें ॥ २९ ॥ जे वाडली अहंअममता । ते वर्तवी महादुःखावर्ता । तेचि निवारावया निजव्यथा । सद्भावें गुरुनाथा शरण जावें ॥ ३३० ॥ गुरुकृपा झालिया पूर्ण । माझ्या देहींचें जें मीपण । तें उकलोनि दावितां जाण । जग संपूर्ण मी एक ॥ ३१ ॥ जें जें सान थोर दिसे दृष्टीं । तें तें अवघें मीचि सृष्टीं । माझ्या मीपणाची निजपुष्टी । घोंटीत उठी त्रैलोक्य ॥ ३२ ॥ ऐसा मीपणें परिपूर्ण । तेथ ‘मी’ म्हणावया म्हणतें कोण । निःशेष निमालें मीतूंपण । ‘निरभिमान’ या नांव ॥ ३३ ॥ ऐसें माझें मीपण पाहतां । समूळ हारपली ममता । हें ‘माझें’ म्हणावया पुरता । ठाव रिता नुरेचि ॥ ३४ ॥ माझ्या पीपणाबाहिरें । जैं ममतास्पद दुजें उरे । तैं तेथ पूर्ण ममता स्फुरे । ते म्यां चिन्मात्रें घोंटिली ॥ ३५ ॥ तेथ मीपणेंसीं मी माझें । नुरेचि तूंपणेंसीं तुझें । ऐसे परब्रह्माचेनि निजें । झाले सहजें ‘निर्मम’ ॥ ३६ ॥ निर्मम निरभिमान । तें हें उद्धवा गा संपूर्ण । पांचवें सहावें लक्षण । संताचें जाण निजगुह्य ॥ ३७ ॥ ऐसे निर्मम निरहंकार । जे हो‍ऊनि ठेले साचार । त्यांसी द्वंद्वदुःखडोंगर । अणुमात्र न बाधी ॥ ३८ ॥ देह अदृष्टाच्या वांटा । लागतां सुखदुःखांच्या झटा । तो ब्रह्मसुखाचे चोहटा । देहाचा द्रष्टा हो‍ऊनि वसे ॥ ३९ ॥ देहासी पदवी आली थोरी । तो श्लाघेना जीवाभीतरीं । देह घोळसितां नरकद्वारीं । तो अणुभरी कुंथेना ॥ ३४० ॥ देह व्याघ्रमुखीं सांपडे । तेणें दुःखें तो न सांकडे । देह पालखीमाजीं चढे । तैं वाडेंकोडें श्लाघेना ॥ ४१ ॥ छाया विष्ठेवरी पडे । कां पालखीमाजीं चढे । तेणें पुरुषा सुखदुःख न जोडे । मुक्तासी तेणें पाडें देहभोग ॥ ४२ ॥ त्याचे दृष्टीखालीं एका‌एक । दुःखापणा मुके दुःख । सुखपणा विसरे सुख । ‘निर्द्वंद्व’ देख या हेतू ॥ ४३ ॥ जो निर्मम निरभिमान । त्यासी नाहीं भेदभान । अभेदीं मिथ्या द्वंद्वबंधन । हा सातवा गुण निर्द्वंद्व ॥ ४४ ॥ जो निर्द्वंद्व निरभिमान पहा हो । त्यासी समूळ मिथ्या निजदेहो । तेथ देहसंबंधें परिग्रहो । उरावया ठावो मग कैंचा ॥ ४५ ॥ स्वजनधनस्त्रीपुत्रांसी । नांदोनि तो नातळें त्यांसी । स्वप्नींची घरवात जागृता जैशी । तैसा साधूसी संसारु ॥ ४६ ॥ एवां परिग्रही असोन । साधु ‘अपरिग्रही’ पूर्ण । हें आठवें मुख्य लक्षण । अतर्क्य जाण जगासी ॥ ४७ ॥ साधु परिग्रही दिसती । परी ते परीग्रही नसती । हेचि संतांची पावावया स्थिती । त्यांची निजभक्ती करावी ॥ ४८ ॥ हें साधूचें अष्टलक्षण । तें ब्रह्मींचें अष्टांग जाण । कीं अष्टमहासिद्धी निर्गुण । ते हे अष्टगुण साधूंचे ॥ ४९ ॥ चैतन्यसरोवरींचें कमळ । विकासलें अष्टदळ । तें हें संतलक्षण केवळ । स्वानंदशीळ साधूंचें ॥ ३५०॥ ऐसे हे अष्ट महागुण । सकळ भूषणां भूषण । ज्यांचे अंगीं बाणले पूर्ण । ते साधु सज्जन अतिशुद्ध ॥ ५१ ॥ इतर संगाचिये प्राप्ती । संग बाधक निश्चितीं । तैशी नव्हे सत्संगती । संगे छेदी आसक्ती देहसंगा ॥ ५२ ॥ तेथ उपदेश नलगे कांहीं । संगेंचि देही करी विदेही । तेचि साते श्लोकीं पाहीं । संतांची नवा‌ई हरि सांगे ॥ ५३ ॥ तेषु नित्यं महाभाग महाभागेषु मत्कथाः । संभवन्ति हिता नृणां जुषतां प्रपुनन्त्यघम्‌ ॥ २८ ॥ इंद्रपदादि ब्रह्मसदन । ये प्राप्ती नांव ‘भाग्य’ गहन । तेही सत्संगासमान । कोट्यंशें जाण तुके ना ॥ ५४ ॥ ऐशी जे कां सत्संगती । सभाग्य भाग्याचे पावती । भगवद्भावें साधु वर्तती । माझे कथाकीर्ति-अनुवादें ॥ ५५ ॥ जे कथा अवचटें कानीं । पडतां कलिमलाची धुणी । करूनि सांडीत तत्क्षणीं । जे गंगेहूनी पवित्र ॥ ५६ ॥ जेथ माझी निजकथा गाती । तीर्थें तेथे पवित्र होती । ऐशिया भगवत्कथाकीर्ती । साधु गर्जती सर्वदा ॥ ५७ ॥ स्वयें आपण भागीरथी । सर्वदा ऐसें जीवीं चिंती । कोणी साधु ये जैं मजप्रती । तैं माझीं पापें जाती निःशेष ॥ ५८ ॥ पार्वतीचा द्वेष मनीं । तें बद्धपाप मजलागुनी । तेंही झडे संतचरणीं । सकळ पापा धुणी सत्संगें ॥ ५९ ॥ कां ज्याचें मुखीं हरिनामकीर्ती । त्याचे पाय जैं मजमाजीं येती । तैं सकळ पापें माझीं जाती । ऐसें भागीरथी स्वयें बोले ॥ ३६० ॥ ऐसी संतांची संगती । सदा वांछी भागीरथी । अवचटें गेलिया संतांप्रती । पापें पळतीं प्राण्यांचीं ॥ ६१ ॥ ते संतमुखींची माझी कथा । जैं अत्यादरें ऐके श्रोता । तैं त्याचें निजभाग्य तत्त्वतां । मजही सर्वथा न वर्णवे ॥ ६२ ॥ माझे कथेची अति‌आवडी । नित्य नूतन नवी गोडी । सादरें ऐकतां पापकोडी । जाळोनि राखोडी उरवीना ॥ ६३ ॥ माझी कथा कां माझे नाम । सकळ पातकां करी भस्म । हेंचि चित्तशुद्धीचें वर्म । अतिसुगम उद्धवा ॥ ६४ ॥ नाना यागो योग वेदाध्ययन । करितां पवित्र नव्हे मन । तें करितां हरिकथाश्रवण । होय अंतःकरण पुनीत ॥ ६५ ॥ अबद्व पढतां वेद । दोष बाधिती सुबद्ध । नाम पढतां अबद्ध । श्रोते होती शुद्ध परमार्थतां ॥ ६६ ॥ नाना योग याग वेदाध्ययन । तेथ अधिकारी द्वीज संपूर्ण । कथाश्रवणें चारी वर्ण । होती पावन उद्धवा ॥ ६७ ॥ ऐसा लाभ कथाश्रवणीं । तरी कां ना‌इकिजे सकळ जनीं । तें भाग्य भगवत्कृपेवांचूनी । सर्वथा कोणी लाहेना ॥ ६८ ॥ भगवत्कृपा पावले साङ्ग । त्यांसी कथाकीर्तनीं अनुराग । तेचि निजभाग्यें महाभाग । स्वमुखें श्रीरंग बोलिला ॥ ६९ ॥ जगातें पवित्र करिती । माझी जाण नामकीर्ती । ऐसा कळवळोनि श्रीपती । उद्धवाप्रती बोलिला ॥ ३७० ॥ ऐशी भगवत्कृपेची प्राप्ती । केवीं आतुडे आपुले हातीं । तेचि अर्थीं श्रीपती । विशद श्लोकार्थीं सांगत ॥ ७१ ॥ ता ये श्रृण्वन्ति गायन्ति ह्यनुमोदन्ति चादृताः । मत्पराः श्रद्दधानाश्च भक्तिं विन्दन्ति ते मयि ॥ २९ ॥ आपुलिया गृहकार्यार्था विषयव्यापारीं जातां जातां । कानीं पडली हरिकथा । स्वभावतां प्रसंगें ॥ ७२ ॥ कृष्णकीर्तिकथनाक्षरें । रिघतांचि कर्णद्वारें । भीतरील पाप एकसरें । निघे बाहिरें गजबजोनि ॥ ७३ ॥ जेवीं पंचाननाची आरोळी । करी मदगजां रांगोळी । तेवीं हरिकथेच्या मेळीं । होय रंवदळी महापापा ॥ ७४ ॥ ऐसा निघाल्या पापाचा केरु । कथेसी उपजे अत्यादरु । कथावधानीं धरितां धीरु । हर्षे निर्भरु नर होय ॥ ७५ ॥ जंव जंव कथारहस्य जोडे । तंव तंव अनुमेदनीं प्रीति वाढे । वाढले प्रीतीचेनि पाडें । ते कथा कैवाडें स्वयें गाय ॥ ७६ ॥ फेडूनि लोकलाजेचें बिरडें । गातां हरिकीर्तिगुण पवाडे । न पाहे तो कर्माकडे । न सांकडें सुहृदासी ॥ ७७ ॥ निजभावें भगवत्कथा गातां । स्वयंभ उपजे सादरता । तेणें अत्यादरें हरिकथा । होय सांगता अतिश्रद्धा ॥ ७८ ॥ जंव जंव कथा सांगे निवाडें । तंव तंव श्रद्धा अधिक वाढे । प्रेमाचा पूर चढे । त्यामाजीं बुडे निज श्रद्धा ॥ ७९ ॥ कथाकीर्तन अनुकीर्ती । वाढत्या श्रद्धेचिये प्रीतीं । बाधूं न शके विषयासक्ती । तेणें मत्पर स्थिति साधकां ॥ ३८० ॥ न करितां भगवद्भजन । वेदाध्ययन यज्ञ दान । येणेंचि आम्ही जा‌ऊं तरोन । म्हणती ते जन महामूढ ॥ ८१ ॥ एथ मुख्यत्वें भगवद्भक्ती । हा विश्व्वास धरितां चित्तीं । भगवत्पर झालिया वृत्ती । सर्व भूतीं मद्भाव ॥ ८२ ॥ ऐसा भाव धरोनि हृदयीं । माझे भक्तीवेगळें कांहीं । सर्वथा स्वयें करणें नाहीं । ‘मत्पर’ पाहीं या रीतीं ॥ ८३ ॥ ऐशिया मत्परा वृत्तीं । सावधान निजस्थिती । तेणें उपजे ‘चौथी भक्ती’ । तेंचि श्रीपति स्वयें सांगे ॥ ८४ ॥ तेथ न करितां आठवण । अखंड होय हरिचें स्मरण । क्रियामात्रें भगवद्भजन । सहजें जाण सर्वदा ॥ ८५ ॥ जें जें ‘दृष्टीं’ देख आपण । थोर अथवा सूक्ष्म सान । तें तें होय हरीचें निजदर्शन । सहजें भजन अहेतुक ॥ ८६ ॥ जें जें ‘वाचा’ वदे वचन । तेंतें होय हरीचें स्तवन । स्तव्य स्तविता उणखूण । हेही आठवण विसरोनी ॥ ८७ ॥ शब्दीं शब्दातें शब्दवितां । ते शब्दरूपें हरीची सत्ता । शब्द द्योती ज्या शब्दार्था । ते अर्थग्राहकता हरीची ॥ ८८ ॥ यापरी ‘शब्दश्रवण’ । श्रवणीं श्रवण होतां जाण । तो शब्दार्थ संपूर्ण । होय ब्रह्मार्पण श्रवणेंसीं ॥ ८९ ॥ ‘गंध’ घ्राणां होतां भेटी । भोक्तेपणें हरीचि उठी । तो घ्रेय घ्राता घ्राण त्रिपुटी । स्वयें घोंटी चिदत्वें ॥ ३९० ॥ ‘रस’ रसना रसत्वबोघ । तेथ निजभोक्ता गोविंद । तो भोग्य भोक्ता भोजनसंबंध । करी परमानंद निजबोधें ॥ ९१ ॥ ‘शीत-उष्ण-मृदु-कठीण’ । निजांगीं लागतां जाण । तें अंगेंचि होय आपण । मृदु कठिण मिथ्यात्वें ॥ ९२ ॥ ‘करां’ ची जे कर्तव्यता । तीतें चालवी अकर्तता । यालागीं घेतां देतां । अकर्तात्मतां हरिभजन ॥ ९३ ॥ निश्चळ निजरूपावरी । चपळ पा‌उलांच्या हारी । चालवी जैशा लहरी । सूर्यकरीं मृगजळाच्या ॥ ९४ ॥ जागृति-स्वप्न-सुषुप्तीं । चिन्मात्रीं जडली वृत्ती । चित्त चित्तत्वाची विसरे स्फूर्ति । या नांव ‘मद्भक्ति’ उद्धवा ॥ ९५ ॥ हे माझी आवडती भक्ती । इचें नांव म्हणिजेत ‘चौथी’ । हें भाग्य आतुडे ज्याचे हातीं । तैं चारी मुक्ती निजदासी ॥ ९६ ॥ भक्तिं लब्धवतः साधोः किमन्यदवशिष्यते । मय्यनन्तगुणे ब्रह्मण्यानन्दानुभवात्मनि ॥ ३०॥ अत्यंत माझी पढियंती । ते हे जाण चौथी भक्ती । निजभाग्यें लाधल्या हातीं । चारी मुक्ती तृणप्राय ॥ ९७ ॥ निरपेक्ष जेथ माझी भक्ती । तेथ पायां लागती चारी मुक्तीं । त्यांतें भक्त न धरिती हातीं । एथवरी प्रीति मद्भजनीं ॥ ९८ ॥ माझिया निजभजनप्रीतीं । स्वप्नींही बद्धता नेणिजे भक्तीं । बद्धतेवीण मिथ्या मुक्ती । जाणोनि न घेती निजभक्त ॥ ९९ ॥ जेथ बद्धता समूळ कुडी । तेथ मुक्ति कायशी बापुडी । माझिया निजभजना‌अवडीं । स्वानंदकोडी मद्भक्तां ॥ ४०० ॥ निरपेक्षा निजप्रीतीं । भावें करितां अनन्य भक्ती । भक्तांसी स्वानंदाची प्राप्ती । भजनस्थितीमाझारीं ॥ १ ॥ जेवीं गर्भेंसीं वर्ते गुर्विणी । कां तरुणपणेंसीं तरुणी । तेवी स्वानंदाच्या पूर्णपणें । माझे निजभजनीं मद्भक्त ॥ २ ॥ तेथ सगुण अथवा निर्गुण । उभयरूपें मीचि ब्रह्म पूर्ण । तेथ भावें करितां भजन । ब्रह्मसंपन्न मद्भक्त ॥ ३ ॥ भावें करितां माझी भक्ती । भाविकां कोण पां अप्राप्ती । विवेकवैराग्यज्ञानसंपत्ती । पायां लागती मद्भक्तांच्या ॥ ४ ॥ माझे निजभजनें तुटे भेद । स्वयेंचि प्रकटे अभेदबोध । तेणें वोसंडे परमानंद । स्वानंदकंद स्वयंभ ॥ ५ ॥ माझे स्वरूपा नाहीं अंत । यालागीं नांवें मी ‘अनंत’ । बाप भक्तभाव समर्थ । तिहीं मी अनंत आकळिलों ॥ ६ ॥ ऐसें ज्यांचे प्रेम गोड । त्यांचे सेवेचें मज कोड । त्यांचें सोशीं मी सांकड । निचाडा चाड मज त्यांचि ॥ ७ ॥ देव सप्रेमें भुलला । म्हणे मी त्यांचाचि अंकिला । जीवेंभावें त्यांसी विकिला । मी त्यांचा जाहला तिहीं लोकीं ॥ ८ ॥ एथवरी भक्तां माझी प्राप्ती । अवचटें झाल्या सत्संगती । मा सद्भावें जे साधु सेविती । त्यांची निजगती मज न बोलवे ॥ ९ ॥ ऐसा संतमहिमा वानितां । धणी न पुरे श्रीकृष्णनाथा । तोचि संतमहिमा मागुता । होय वानिता चौं श्लोकीं ॥ ४१० ॥ यथोपश्रयमानस्य भगवन्तं विभावसुम । शीतं भयं तमोऽप्येति साधून्‌ सम्सेवतस्तथा ॥ ३१ ॥ जेवीं वैश्वानर तेजोमूर्ती । त्याची सेवा जे करूं जाणती । त्यांचें शीततमभयनिवृत्ती । तो करी निश्चितीं उद्धवा ॥ ११ ॥ शीत निवारी संनिधी । तम निवारी तेजोवृद्धी । भय निवारी भगवद्बुद्धी । जेवीं त्रिशुद्धी विभावसु ॥ १२ ॥ तैशीच जाण सत्संगती । संगें त्रिविध ताप निवारती । तेचि अर्थींची निजयुक्ती । ऐक उपपत्ती उद्धवा ॥ १३ ॥ शीत म्हणिजे द्वंद्वबाधु । तो समूळ निवारिती साधु । तम म्हणिजे अज्ञानांधु । त्यासी करिती प्रबोधु निजज्ञानें ॥ १४ ॥ भयांमाजीं श्रेष्ठ मरण । भय निवारी साधु विचक्षण । निवारिती जन्ममरण । कृपाळु पूर्ण दीनांचे ॥ १५ ॥ अग्नीसमान म्हणों साधु । हाही बोल अति‌अबद्धु । अग्नीहूनि अधिक साधु । तोचि प्रबोधु हरि सांगे ॥ १६ ॥ अग्नीपाशीं प्रबळ धूम । साधु निष्क्रोध निर्धूम । अग्नि पोळी अधमोत्तम । साधु सर्वसम सुखदाते ॥ १७ ॥ साधूंची धन्य संगती । संगे जडजाड्य तोडिती । कर्माचें कर्मत्व मोडिती । बुडत्या तारिती निजसंगें ॥ १८ ॥ निमज्ज्योन्मज्जतां घोरे भवाब्धौ परमायनम्‌ । सन्तो ब्रह्मविदः शान्ता नौर्दृढेवाप्सु मज्जताम्‌ ॥ ३२ ॥ प्रतिक्षणीं अधिक वृद्धी । अमर्याद वाढे भवाब्धी । तेथ उबकल्या चुबकल्या त्रिशुद्धी । अधर्मबुद्धि ॥ १९ ॥ अधर्में निमज्जन नरकांत । स्वधर्में उन्मज्जन स्वर्गांत । ऐसे भोगिती आवर्त । स्वर्गनरकांत संसारी ॥ ४२० ॥ यापरी संसारी जन । पावतां उन्मज्जन निमज्जन । त्यासी तरावया भवाब्धि जाण । साधु सज्जन दृढ नाव ॥ २१ ॥ पडल्या जळार्णवामाझारीं । जेवीं अच्छिद्र नाव तारी । तेवीं बुडतां भवसागरीं । सुखरूप तारी सज्जननाव ॥ २२ ॥ कामक्रोधरहित शांती । हेचि नावेची अच्छिद्र स्थिती । ब्रह्मज्ञानें सपुरती । सुखरूप निश्चितीं या हेतु ॥ २३ ॥ कामक्रोधादि सावजांसी । बळें घ्यावया आंविसासी । कदा न येववे नावेपाशीं । संगें सकळांसी तारक ॥ २४ ॥ नवल ये नावेची स्थिती । जुनी नव्हे कल्पांतीं । बुडवूं नेणे धारावर्तीं । तारक निश्चितीं निजसंगें ॥ २५ ॥ परी ये नावेची नवल गती । वरी चढले ते बुडती । तळीं राहिले ते तरती । जाण निश्चितीं उद्धवा ॥ २६ ॥ दीनांचा कळवळा पहा हो । हाचि मुख्यत्वें तरणोपावो । त्या कळवळ्याचा अभिप्रावो । स्वयें देवो सांगत ॥ २७ ॥ अन्नं हि प्राणिनां प्राण आर्तानां शरणं त्वहम्‌ । धर्मो वित्तं नृणां प्रेत्य सन्तोऽर्वाग्बिभ्यतोऽरणम्‌ ॥ ३३ ॥ जेवीं अन्नेवीण प्राण । सर्वथा न वांचती जाण । प्राण्यांचें प्राणपोषण । करावया सामर्थ्य पूर्ण अन्नीं नांदे ॥ २८ ॥ जोडली धर्माची संपत्ती । ते इहलोकीं होय रक्षीती । तेचि धर्मधन देहांतीं । उत्तम गतिदायक ॥ २९ ॥ संसारीं पीडिले दारुण । त्रिविध तापें तापले पूर्ण । ऐशिया शरणागता शरण्य । मी नारायण रक्षिता ॥ ४३० ॥ माझें करितां नामस्मरण । सहजें निवारे जन्ममरण । त्या मज रिघालिया शरण । बाधी दुःख कोण बापुडें ॥ ३१ ॥ दुःखभय न पावतां आधीं । जिंहीं साधु सेविले सद्बुद्धीं । त्यांसी भवभयाची आधिव्याधी । जाण त्रिशुद्धी बाधिना ॥ ३२ ॥ प्राणियांसी होतां पतन । भाग्यें भेटल्या सज्जन । निवारूनि अधोगमन । जन्ममरण छेदिती ॥ ३३ ॥ संसार तरावया जाण । सत्संगतीचि प्रमाण । त्यांचे भावें धरितां चरण । दीनोद्धरण त्यांचेनी ॥ ३४ ॥ सन्तो दिशन्ति चक्षूंषि बहिरर्कः समुत्थितः । देवता बान्धवाः सन्तः सन्त आत्माहमेव च ॥ ३४ ॥ जेवीं आंधारेंसीं सगळी राती । निजतेजें निरसी गभस्ती । तेवीं सत्संगसूर्यप्राप्ती । अविद्येची निश्चितीं निरसी निशा ॥ ३५ ॥ बाह्य उगवल्या गभस्ती । चोरभयाची होत निवृत्तीं । तेवीं जोडल्या सत्संगती । भवभय कल्पांतीं असेना ॥ ३६ ॥ बाह्य सूर्योदयकाळीं । पक्षी सांडिति आविसाळीं । सत्संगसूर्याचे मेळीं । देहाचीं आविसाळीं सांडिती जीव ॥ ३७ ॥ बाह्य सूर्याचा किरणीं । हर्षें विकासे कमळिणी । सत्संगसूर्याचे मिळणीं । निर्विकल्प कमळणी विकासे ॥ ३८ ॥ सूर्य उगवलिया गगनीं । चक्रवाकें मिळती मिळणीं । तेवीं सत्संग पावोनि । जीव शिव दोनी एकवटती ॥ ३९ ॥ बाह्य सूर्याचे पहांटेसी । पांथिक चालती स्वग्रामासी । सत्संगसूर्याचे प्रकाशीं । मुमुक्षु निजधामासी पावती ॥ ४४० ॥ बाह्य सूर्याचे उदयस्थितीं । कर्माची चाले कर्मगती । सत्संगसूर्याचे संगतीं । निष्कर्मप्रवृत्ति प्रवर्ते ॥ ४१ ॥ सूर्यबिंबाचे उदयसंधी । अर्घ्यदान दीजे वेदविदीं । सत्संगसूर्याचे संबंधीं । दीजे देहबुद्धी तिलांजळी ॥ ४२ ॥ सूर्यौदयचिया प्राप्ती । याज्ञिक होमातें हविती । तेवीं सत्संगसूर्यस्थिती । अहंता हविती ज्ञानग्नीं ॥ ४३ ॥ सूर्य उगवूनि आकाशीं । जगाची जड निद्रा निरसी । संत उगवूनि चिदाकाशीं । जीव चित्प्रकाशीं प्रबोधी ॥ ४४ ॥ हो कां साधु सूर्यासमान । हें बोलणें निलग हीन । सूर्यो पावे अस्तमान । साधु प्रकाशमान सर्वदा ॥ ४५ ॥ सूर्यासी आच्छादी आभाळ । साधु सदा निजनिर्मळ । सूर्यासी सदा भ्रमणकाळ । साधु अचंचळ भ्रमणरहित ॥ ४६ ॥ ग्रहणकाळाचा लवलाहो । पावतां सूर्यातें ग्रासी राहो । साधु ग्रहांचा पुसोनि ठावो । स्वानंदें पहा हो नांदती ॥ ४७ ॥ दु‌ई दाटतां प्रबळ । तेणें आच्छादे रविमंडळ । तम धूम मोहपडळ । साधूंसी अळुमाळ बाधीना ॥ ४८ ॥ सूर्य निजकिरणें सर्वांतें तावी । साधु निजांगें जग निववी । सूर्य सर्वांतें क्षयो दावी । साधु अक्षयी करी निजबोधें ॥ ४९ ॥ सूर्यो साह्य झालिया दृष्टीं । दृश्याकारें उघडे सृष्टी । सत्संग साह्य झालिया दृष्टीं । चिन्मात्रें सृष्टी ठसावे ॥ ४५० ॥ विवेकें विचारितां देख । सूर्याहूनि साधु अधिक । साधु धरातळीं ज्ञानार्क । भवाब्धितारक निजसंगियां ॥ ५१ ॥ पृथ्वीतळीं देवता साधु । साधु दीनांचे सखे बंधु । साधुरूपें मी परमानंदु । जाण प्रसिद्ध परमात्मा ॥ ५२॥ देवां दीजे बळि‌अवदान । तेव्हां देवा होती प्रसन्न । कृपातारक निजसज्जन । दयाळु पूर्ण दीनांचे ॥ ५३ ॥ सुहद सखे सगोत्र बंधु । द्रव्यलोभें भजनसंबंधु । निर्लोभें कृपाळू साधु । सखे बंधु दीनांचे ॥ ५४ ॥ संत केवळ कृपेचे दीप । संत ते माझें निजस्वरूप । यालागीं सत्संगें फिटे पाप । होती निष्पाप साधक ॥ ५५ ॥ निष्पाप करूनि साधकांसी । ब्रह्मस्वरूपता देती त्यांसी । ऐसें कृपाळुत्व साधूंपाशीं । जाण निश्चयेंसीं उद्धवा ॥ ५६ ॥ मी निर्गुणत्वें ब्रह्म पूर्ण । साधु चालतेंबोलतें ब्रह्म जाण । साधूंसी रिघालिया शरण । तैं जन्ममरण असेना ॥ ५७ ॥ साधूंसी सद्भावें शरण । रिघाल्या नुरे जन्ममरण । साधु शरणागतां शरण्य । सत्य जाण उद्धवा ॥ ५८ ॥ भावें धरिलिया सत्संगती । संसारिया होय निर्मुक्ती । हें प्रतिज्ञापूर्वक श्रीपती । उद्धवाप्रती बोलिला ॥ ५९ ॥ सद्भावेंसीं सत्संगती । धरितां घरा ये ब्रह्मस्थिती । हें निजवर्म उद्धवाप्रती । देवें अध्यायांतीं निरूपिलें ॥ ४६० ॥ परम विरक्तीचें कारण । तें हें पुरूरवाप्रकरण । उपसंहार श्रीकृष्ण । अध्यायांतीं जाण संपवी ॥ ६१ ॥ वैतसेनस्ततोऽप्येवमुर्वश्या लोकनिःस्पृहः । मुक्तसङ्गो महीमेतामात्मारामश्चचार ह ॥ ३५ ॥ इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमंहस्यां संहितायामेकादशस्कन्धेषङ्‍विंशोऽध्यायः ॥ २६ ॥ पूर्वीं सूर्यवंश प्रसिद्ध । तेथ सोमवंशाचा संबंध । ‘वैतसेन’ श्लोकींचें पद । लावूनि गोविंद बोलिला ॥ ६२ ॥ उमावनीं अति‌एकांत । तेथ उमा आणि उमाकांत । विगतवासेंसीं क्रीडत । स्वानंदयुक्त स्वलीला ॥ ६३ ॥ तेथ शिवाचे दर्शनासी । अवचटें आले सप्त‌ऋषी । लज्जा उपजली पार्वतीसी । तिणें त्या वनासी शापिलें ॥ ६४ ॥ ‘जो पुरुष या वना‌आंत । ये‍ईल तो हो हो स्त्रीरूप एथ’ । ऐसा शाप क्रोधयुक्त । वदली निश्चित जगदंबा ॥ ६५ ॥ तेथ राजा ‘सुद्युम्न’ सूर्यवंशी । नेणॊनियां शापप्रभावासी । पारधी आला त्या वनासी । सकळ सेनेसीं सन्नद्ध ॥ ६६ ॥ रिघतांचि त्या वना‌आंत । पुरुषत्व पालटलें तेथ । बाप शापाचें सामर्थ्य । झाले समस्त स्त्रीरूप ॥ ६७ ॥ तेथ पुरुषत्वाची आठवण । निःशेष विसरलें मन । आपण पूर्वीं होतों कोण । हेंही संपूर्ण विसरले ॥ ६८ ॥ अश्व झाले अश्विनी । हस्ती झाले हस्तिणी । पुरुषा झाले कामिनी । तत्क्षणीं त्या वनांव ॥ ६९ ॥ तेथ पुरुषकामें कामासक्ती । अनुकूल पुरुषांप्रती । स्त्रिया गेलिया त्या समस्ती । अतिकामरतीं संभोगा ॥ ४७० ॥ राजा सुद्युम्न झाला नारी । अतिसुकुमार सुंदरी । तो सोमपुत्र बुधातें वरी । अतिप्रीतीकरीं भाळोनि ॥ ७१ ॥ बुधें सुद्युम्न देखोनि नारी । तो भुलला स्त्रीकामेकरीं । एवं अतिप्रीतीं परस्परीं । येरयेरावरी भाळलें ॥ ७२ ॥ बुध महाराजचूडामणी । तो सुद्युम्नातें स्त्रीत्वें पर्णी । केली पटाची निजराणी । बाप करणी कर्माची ॥ ७३ ॥ सुद्युम्नबुधवीर्येंकरीं । पुरूरवा जन्मे त्यांचे उदरीं । एवं सूर्यवंशामाझारीं । सोमवंश यापरी संचरला ॥ ७४ ॥ हे सोमवंशींची आद्यकथा । एथूनि सोमवंश वाढता । श्रीकृष्ण बोलिला ध्वनितार्था । तेचि म्यां कथा उपलविली ॥ ७५ ॥ सुद्युम्न झाला बुधाची नारी । मागें सूर्यवंशामाझारीं । नाहीं राज्यासी अधिकारी । संकट भारी वोढवलें ॥ ७६ ॥ ते सूर्यवंशींचा कुळगुरु । वसिष्ठ महायोगीश्वरु । तेणें करूनि अत्यादरु । गौरी-हरु प्रार्थिलीं ॥ ७७ ॥ प्रसन्न करूनि पार्वतीसी । मागे सुद्युम्नाच्या उच्छापासी । येरी सांगे महादेवासी । तुम्हीं वसिष्ठासीं बुझवावें ॥ ७८ ॥ जें भवानीचें शापवचन । कदा अन्यथा नव्हे जाण । धरावया वसिष्ठाचें मन । नवलविंदान शिवें केलें ॥ ७९ ॥ शुक्ल पक्षीं सुद्युम्नासी । पुरुषत्व प्राप्ते‌अ हो‌ईल त्यासी । कृष्णपक्षीं बुधापाशीं । स्त्रीभावेंसीं वर्तेल ॥ ४८० ॥ पक्षें पुरुष पक्षें नारी । ऐशिया उच्छापाची परी । शिवें करूनि कृपेकरीं । केला अधिकारी निजराज्या ॥ ८१ ॥ पुरुषत्व पावल्या सुद्युम्नासी । तें पुरुषत्व नावडे त्यासी । स्त्रीसंभोगें बुधापाशीं । अतिप्रीतीसीं लोधला ॥ ८२ ॥ स्वर्ग‍अप्सरा आलिया पाशीं । त्याही नावडती सुद्युम्नासी । त्याहूनि प्रीति बुधापाशीं । स्त्रीभावेंसीं अनिवार ॥ ८३ ॥ बुधासीही स्वर्गांगना । संभोगीं न येती मना । ऐसी अतिप्रीति सुद्युम । स्त्रीभोगें जाण विगुंतली ॥ ८४ ॥ पुरुषीं पुरुषत्वाची रती । भोगूं जाणें मी श्रीपती । इतर बापुडीं तीं किती । स्त्रीदेहासक्तीं भुललीं ॥ ८५ ॥ स्त्रीदेहीं जो आत्मा असे । तो भोगिजे म्यां हृषीकेशें । इतरांसी स्त्रीदेहींचें पिसें । विषयावेशें भुलोनी ॥ ८६ ॥ असो हें सांगावें किती । कामीं निष्कामतेची रती । ते मी जाणें रमापती । कां जाणती निजानुभवी ॥ ८७ ॥ पुरुत्वापरीस कामरती । स्त्रीदेहीं अति‌आसक्तीं । त्या स्त्रीकामाची निवृत्ती । जाण निश्चितें सत्संगें ॥ ८८ ॥ वसिष्ठाचिये सत्संगतीं । झाली स्त्रीभावाची निवृत्ती । सुद्युम्न पावला पुरुषत्वप्राप्ती । धन्य त्रिजगतीं सत्संग ॥ ८९ ॥ पुरुषत्व पावोनि सुद्युम्न । निजनगरा येतां जाण । स्त्रीभावें नष्टलें सैन्य । एकला आपण स्वयें आला ॥ ४९० ॥ एवं निःशेष विगतसैन्य । यालागीं नांवें ‘वीतसेन’ । त्या वीतसेनाचा पुत्र जाण । ‘वैतसेन’ पुरूरवा ॥ ९१ ॥ तेणें निजात्मता अतिविरक्ती । सांडूनि स्वर्गभोगसंपत्ती । त्यजूनि उर्वशीकामासक्ती । आत्मारामस्थिती पावला ॥ ९२ ॥ आत्माराम निजस्थिती । मिथ्या देहसंग सांगाती । निजात्मबोधें त्रिजगतीं स्वानंदें नृपति विचरत ॥ ९३ ॥ जेथें जेथें पा‌उल उठी । तेथें तेथें होती सुखाच्या कोटी । स्वानंदें कोंदली सृष्टी । ब्रह्मदृष्टीं विचरतु ॥ ९४ ॥ ब्रह्मीं विचरतां ब्रह्मपणें । ब्रह्मरूप झालें जिणें । विसरला जिणेंमरणें । पूर्णीं पूर्णपणें परिपूर्ण ॥ ९५ ॥ हें उर्वशी-पुरूरवोपाख्यान । जो स्वयें ऐके सावधान । तैं दोष जाती अगम्यागमन । विरक्ती संपूर्ण साधकां ॥ ९६ ॥ यापरी वैराग्ययुक्तीं । राजा पावला ब्रह्म प्राप्ती । वैराग्य उपजे सत्संगतीं । सत्संगें विरक्ती मद्भजनें ॥ ९७ ॥ ‘सद्भावें करितां माझी भक्ती । साधकां उपजे विरक्ती’ । ऐसें बोलिला श्रीपती । तें उद्धवें चित्तीं दृढ धरिलें ॥ ९८ ॥ ते भजनक्रियेचा प्रश्न । पुढिले अध्यायीं जाण । उद्धव पुसेल आपण । जेणें श्रीकृष्ण संतोषे ॥ ९९ ॥ उद्धव पुसेल गोड गोठी । जेणें श्रीकृष्ण सुखावें पोटीं । तेणें स्वानंदें निजपुष्टी । भजनहातवटी सांगेल ॥ ५०० ॥ उपासनाकांडरहस्य पूर्ण । मुख्य क्रियायोगनिरूपण । समूळ आगमलक्षण । स्वमुखें श्रीकृष्ण सांगेल ॥ १ ॥ ते कथेसी अवधान । श्रोतां द्यावें सावधान । एका तुष्टला जनार्दन । स्वानंदघन निजबोधें ॥ ५०२ ॥ इति श्रीमद्भागवते महापुराणे एकादशस्कंधे श्रीकृष्णोद्धवसंवादे एकाकारटीकायां ऐलगीतोपाख्यानं नाम षड्‌विंशोध्यायः ॥ २६ ॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ श्लोक ॥ ३५ ॥ ओव्या ॥ ५०२ ॥

Contribute to Sant Shri Eknath Maharaj Mission

You can donate to the bank account given below

Name of Account Holder:
Shantibrahma Shri Eknath Maharaj Mission, Paithan
Current Account No:
00000036694177969
Bank Name:
State Bank Of India
IFSC Code:
SBIN0003796
Branch:
Bhaji Market, Paithan

Scan to donate

Donate QR

Merchant Name : Sant Eknath Mission

UPI ID : santeknathmission@sbi

logoseperator

Contact Info :

Shantibrahma Shri Eknath Maharaj Mission,

C/O Shri Venimadhav Gosavi,
ShriNath Galli, Shrikshetra Paithan, Dist. Chhatrapati
Sambhajinagar
Pin. 431006

callMobile No : +91 - 9421411135

emailEmail : info@santeknath.org